मनपा-'डीसीएफ'च्या सर्वेक्षणात स्पष्ट ः 71 टक्के नागरिक समाधानी
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 10 ः शहरातील रुंद रस्ते, शहराच्या बहुतेक भागात रस्त्यांच्या बाजूला हिरवीगार झाडे यामुळे बाहेरून येणाऱ्या अनेकांना नागपुरातील रस्ते प्रशस्त व स्वप्नवत वाटले तर आश्चर्य नाही. परंतु रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ओरड करणाऱ्या नागपूरकरांसाठीही शहरातील रस्त्यांवरून प्रवास करणे आनंददायी अनुभव ठरतो आहे. ही बाब नुकताच महापालिका व डिलिवरिंग चेंज फाऊंडेशनने (डीसीएफ) केलेल्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाली.
'स्मार्ट सिटी मिशन'साठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याने महापालिकेने 'डीसीएफ'च्या सहकार्याने 13 ते 25 ऑक्टोबरदरम्यान नागरिकांचा सहभाग अभियान राबविला. संपूर्ण शहरासाठी (पॅन सिटी) राबविलेल्या या अभियानात कुमार वयापासून तर 60 वर्षांवरील एकूण 2 लाख 99 हजार नागपूरकरांनी मत नोंदविले. यात विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, उद्योगपती, नोकरवर्ग, निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. महापालिका व 'डीसीएफ'ने तयार केलेल्या फॉर्ममध्ये नागरिकांना 'नागपुरात वाहनाने फिरणे किंवा पायी चालणे सुखद अनुभव आहे' यावर सहमत, पूर्णतः सहमत, अशतः सहमत, असहमत व पूर्णतः असहमत अशा पर्यायावर फूली मारण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात 2 लाख 99 हजार नागपूरकरांपैकी दीड लाख फॉर्मचे विश्लेषण करण्यात आले. यात 71 टक्के नागरिकांनी शहरातील रस्त्यांवरून फिरणे किंवा पायी चालणे सुखद असल्याचे नोंदविले. केवळ 21 टक्के नागरिकांनी शहरातील रस्ते योग्य नसल्याचे सांगितले. यात प्रामुख्याने शहराचा सिमेचा भाग अधिक असलेल्या आशीनगर व नेहरूनगर झोनचा समावेश आहे. 11 टक्के नागरिकांनी ठामपणे तर 28 टक्के नागरिकांनी उत्तम तर 34 टक्के नागरिकांनी समाधानी असल्याचे मत नोंदवित शहरातील रस्त्यांवरून प्रवास किंवा पायी फिरणे सुखद असल्यावर शिक्कामोर्तब केले. 20 टक्के नागरिकांनी असहमती दर्शविली तर 9 टक्के नागरिकांनी ठामपणे प्रवास करणे सुखद नसल्याचे सांगितले. शहरातील दहाही झोनमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात आशीनगर व नेहरूनगर झोनमधील 36 टक्क्यांवर नागरिकांनी रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. या झोनमधील वाठोडा, हसनबाग, बिडीपेठ प्रभागातील नागरिकांत रस्त्यांबाबत नाराजी दिसून येत आहे. आशीनगर झोनमध्ये गरीब नवाजनगरातील नागरिकांची रस्त्यांसाठी ओरड आहे. लकडगंज झोनमधील पारडी या प्रभागात सर्वाधिक 55 टक्के नागरिकांनी रस्त्यांवरील प्रवासाबाबत नाराजी व्यक्त केली. आठ झोनमध्ये मात्र समाधानी नागरिकांची संख्या या दोन झोनच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे.
बॉक्स....
झोनस्तरावर रस्त्यांवरील प्रवासाबाबत केलेले सर्वेक्षण
- झोन समाधानी नागरिक असमाधानी नागरिक
- लक्ष्मीनगर 76 टक्के 24 टक्के
- धरमपेठ 75 टक्के 25 टक्के
- हनुमाननगर 73 टक्के 27 टक्के
- धंतोली 73 टक्के 27 टक्के
- नेहरूनगर 64 टक्के 36 टक्के
- गांधीबाग 75 टक्के 25 टक्के
- सतरंजीपुरा 76 टक्के 24 टक्के
- लकडगंज 67 टक्के 33 टक्के
- आशीनगर 61 टक्के 39 टक्के
- मंगळवारी 72 टक्के 28 टक्के



