10 Aug 2016

खबऱ्यांचे स्ट्रॉंग नेटवर्क असणारा पोलिस हवालदार

प्रकाश वानखेडे
9823015003


पोलिस दलात खबऱ्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग असल्यास अनेक गुन्ह्यांवर प्रतिबंध करता येतो. अनेकदा गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिस ऍक्‍शन घेतात आणि मोठा अ
नर्थ टळतो. केवळ खबऱ्यांचे नेटवर्क चांगले असल्यामुळेच मोठमोठ्या आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश येते. क्राईम ब्रॅंचमध्ये कार्यरत असलेले प्रकाश वानखेडे या पोलिस हवालदाराची ओळखसुद्धा अशीच आहे. त्यांचे केवळ नागपूर शहरातच नव्हे तर अन्य राज्यातीलही गुन्हेगारी जगतात खबऱ्यांचे जाळे जबरदस्त आहे. त्यांनी आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त हत्याकांडातील आरोपींचा शोध घेतल्याचा रेकॉर्ड आहे. बट्‌टू-प्रकाश या जोडीला क्राईम ब्रॅंचचे "जय-वीरू' म्हणून ओळखल्या जाते.
प्रकाश अर्जुन वानखेडे हे मूळचे अमरावतीचे. वडील मेडीकल हॉस्पिटलमध्ये नोकरीला. आई शांताबाई या शिस्तप्रीय असल्यामुळे घरात भावासह अभ्यासाला बसावे लागे. अंगावर वर्दी चढावी म्हणून स्वतःच आटापीटा. कॉलेजला असताना निघालेल्या पोलिस भरतीत 1992 मध्ये निवड झाली. तेथून आतापर्यंत दलात अविरत सेवा व कर्तव्यावर तैनात. पत्नी जयश्री हिने संसारात मुलांच्या आईसह वडीलाची भूमिका सक्षमपणे निभावली. त्याचेच फलीत म्हणून मुलगी अश्‍विनी आयआयटी खकडपूरमध्ये तर साक्षी दहावीत 95 टक्‍के घेऊ शकली. 2008 मध्ये जिल्हा न्यायालयातील तिजोरीतील 60 लाख रूपये आणि अर्धा किलो सोने चोरट्यांनी लंपास केले होते. ही घटनेमुळे राज्यात खळबळ माजली. या घटनेमुळे पोलिस दलाची तारांबळ उडाली. हवालदार प्रकाश वानखडे यांच्या अथक प्रयत्नामुळे आरोपीला अटक केली. कोतवालीतील ज्योती ही दारूविक्रेती होती तर जाफरचे गुन्हेगारी जगतात मोठे नाव. या युगलाचा घरात घुसून खून केला होता. या प्रकरणात वानखेडेंच्या नेटवर्कमुळे बाल्या हरणेसह 14 आरोपींना अटक केली. माथाडी नेता गिरीश ढाले यांच्यावर बडकस चौकात आपसी वादातून साजन महल्ले याने गोळीबार केला. ढाले यांच्या शरीरात दोन गोळ्या शिरल्या. प्रकाश यांनी लगेच ढाले यांना खांद्यावर घेऊन पळतच हॉस्पिटल गाठले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला तर चार तासात आरोपींना त्यांनी ठाण्यात हजर केले. बिडगावमध्ये गवताच्या व्यावसायिक वादातून जावाई-साळ्याचा चौघांनी मर्डर केला होता. धागादोरा नसताना प्रकाश यांनी सहा आरोपींचा शोध घेतला. 2008 मध्ये राहुल धारपुडे आणि पंकज रहाटे या कुख्यात दरोडेखोर काटोलमधील एका घरात लपून बसले होते. टीप मिळताच प्रकाश यांनी पथकासह सापळा रचला. आरोपींकडे पिस्तुल होते, त्यामुळे घरात प्रवेश करण्याची पंचाईत. प्रकाश हे व्हेंटीलेटरच्या छिद्रातून घुसले आणि सरळ दोघांच्याही अंगावर उडी घेतली. कराटे चॅम्पीयन असलेल्या प्रकाश यांनी दोघांचीही पाठ बघितली. मात्र, थोडीही चूक झाली असती तर प्रकाश यांचा जीव गेला असता. त्यांच्याकडून 4 पिस्टल, 19 बुलेट, 40 सोनसाखळ्या जप्त केल्या होत्या. बब्बू काल्या मर्डर, नाशिक पाटील मर्डर, चंदू पोवार, बिस्किट मर्डर, रिकू बोरकर मर्डर, प्रशांत चलपे मर्डर, जग्गू उके मर्डर पप्पू देशभ्रतार मर्डर, प्रदीप भोयर मर्डरमधील आरोपींना अटक करण्याची कामगिरी प्रकाश मेजर यांनी केली.
-अनिल कांबळे

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates