गावयात्रा

मिरचीचे भिवापूर

भिवापूर हे गाव चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेलगत आहे. 18 व्या शतकात तलावाचे खोदकाम सुरू असताना भीमा देवीची मूर्ती सापडली, असा उल्लेख "निर्वाण प्रियतम चरित्र' या ग्रंथात आहे. या देवीच्या नावावरून या वस्तीला भीमापूर हे नाव पडले. भीमापूर नावाचा अपभ्रंश भिवापूर झाला, असा समज आहे. या मंदिरात असलेल्या मातेच्या मूर्तीची स्थापना पाच पांडवांपैकी भीमाने केली म्हणून भीमा माता हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. या देवीचे मंदिर असून, नवरात्रीत यात्रा भरते. आसपासच्या जिल्ह्यांतले लोक या यात्रेला येतात. येथे गवळी समाजाचे राज्य होते. कालांतराने गोंड राजांनी सत्ता स्थापन केली. तेव्हा भीमशाह हा राजा होता. त्याच्या नावावरून गावाला नाव पडले असावे, असेही सांगितले जाते. नागपूरपासून 70 किमी अंतरावर असलेले हे गाव मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वांत मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भिवापुरात मिरची कटाई (दंडीकट)वर लोकांचा उदरनिर्वाह चालतो. आठ मे 2015 रोजी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाल्याने विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

अपेक्षा
शहराची लोकसंख्या 20 हजारांवर आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायतीची जागा नगरपंचायतीने घेतली. नगरपंचायत अस्तित्वात येईपर्यंत वॉर्डाची संख्या सहा आहे. 2004 पासून जलशुद्धीकरण केंद्राची मागणी अद्याप शासनदरबारी धूळखात आहे. त्यामुळे नागरिकांना आजही क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी नळयोजना कुचकामी ठरल्याने पाणीसमस्या आहे. उद्योग उभारण्याच्या नावावर नाममात्र शुल्कावर भूखंढ मिळविले. मात्र, उद्योगाचा अद्याप पत्ता नाही. उद्योग न उभारणाऱ्या भूखंडधारकांकडून ही जागा परत घेऊन नवीन इच्छुक उद्योजकांना द्यावे.

विकासकामे
शहरातील विकासकामाची मुहूर्तमेढ तत्कालीन आमदार वसंतराव इटकेलवार यांनी रोवली. या विकासकामांना मूर्त रुप प्राप्त करून देण्याचे काम माजी आमदार राजेंद्र मुळक यांच्या कार्यकाळात झाले. यात ग्रामीण रुग्णालय, शासकीय औद्योगिक संस्था, दिवाणी व फौजदारी न्यायालयाची स्थापना झाली.

भिवापुरी मिरची
हा तालुका मिरची उत्पादनात आघाडीवर होता. भिवापूरच्या आसपासच्या गावांतही मिरचीचे उत्पादन व्हायचे. भिवापूर येथे मिरची "फुलकट' करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. फुलकट म्हणजे मिरचीचे देठ तोडणे होय. या कामासाठी आंध्र प्रदेश राज्यातूनही येथे मिरची येते. भिवापूरहून मिरची व हळद विदेशातही जाते. भिवापूरचे मजूर तिखट मिरची फुलकट करण्यात वाकबगार आहेत. भिवापूर मिरचीच्या नावाखाली बनावट मिरची पावडरही बाजारात खपविले जाते. येथील नामशेष होऊ पाहणाऱ्या मिरचीला संजीवनी देण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा या उपक्रमातून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात आहे. मात्र, त्या विषयी शासंकता आहे. या क्षेत्रात प्रसिद्ध अशा "वायगाव' हळदीचे उत्पादन होते. वायगाव हळद तिच्यातील "क्‍युरकुमिन' या विशेष घटकामुळे प्रथम क्रमांकावर आहे, असा मुंबई मसाला बोर्डाचा अभिप्राय आहे.

शैक्षणिक
गावात जिल्हा परिषदेच्या पाच शाळा, चार महाविद्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. भिवापूर एज्युकेशन सोसायटीची शाळा ही सर्वांत जुनी शाळा आहे. या गावात एक सरकारी आयटीआयदेखील आहे.

बसस्थानक
राज्य मार्ग क्रमांक सहावर असलेल्या भिवापुरात अद्याप बसस्थानक बांधण्यात आले नाही. त्यामुळे नागपूरहून गडचिरोली, सिरोंचा, चंद्रपूर, मूल, पवनी या मोठ्या शहराकडे जाणाऱ्या बसगाड्यांना रस्त्यावरच थांबा द्यावा लागतो. येथे फार पूर्वीपासून टिनाचे शेड आहे. याच निवाऱ्यात प्रवाशी थांबतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत मोठी गैरसोय होते. महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. शिवाय प्रवाशी निवाऱ्याच्या भोवताल अतिक्रमण झाले आहे. अवैध वाहतूक जोरात सुरू असल्याने बसगाड्यांना फटका बसतो. या मार्गावरून पवनी, वडसा, मूल आणि गडचिरोली येथे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स थांबतात. त्यातून पोलिसांचे चांगलेच फावत आहे.

आठवडीबाजार
धर्मापूरपेठेत आठवडीबाजार भरतो. मात्र, नियोजित जागा सोडून हमरस्त्यावर विक्रेते बसत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. राज्य महामार्गावरही किरकोळ विक्रेते व्यवसाय करतात. या प्रकारामुळे पायी जाणाऱ्यांसह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. बाजार रस्त्यावर भरत असल्याने ग्राहकांना थेट रस्त्यावरच उभे राहून खरेदी करावी लागते. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

साधनसंपत्ती
हा परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे. 1965 पासून येथे गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी होईपर्यंत भूसर्वेक्षण व अन्वेषण विभागाने केवळ संशोधनाचे काम केले. भूगर्भाच्या आत सोने, तांबे, मॅग्नीज, अँटीमनी यांचा साठा असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पुढे उत्खननाच्या दृष्टीने काहीही झाले नाही. तसे झाल्यास परिसराचा कायापालट होईल. पण, तालुक्‍यात गोसेखुर्द प्रकल्प अस्तित्वात आल्याने हा मौल्यवान साठा जमिनीत गडप झाला. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्यात, ज्यांची गावे बुडालीत त्यांच्याही पुनर्वसनाचा मुद्दा रेंगाळत आहे. तालुक्‍यातील 136 गावे असून, 30 गावे रिठी आणि आठ गावांचे अंशत: पुनर्वसन झाल्यामुळे शासनकर्त्यांनी नवीन विकासकामे करण्याची गरज आहे.

प्रेक्षणीय ठिकाणे
भिवापूरच्या जवळ रानाळा हे निसर्गरम्य स्थळ आहे. विशेषतः हिवाळ्यामध्ये लोक येथे जातात. याशिवाय, उदासीन मठ, राधाकृष्ण मंदिर, रामधन चौक, विठ्ठल मंदिर, कुंभारपुरा, गणेश मंदिर इत्यादी ठिकाणे येथे प्रसिद्ध आहेत.

----------------
प्रतिक्रिया
भिवापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारत बांधकामासाठी मंजूर झालेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटवून ती जागा मोकळी करून घेतली. मात्र, सहा महिन्यांचा काळ उलटला. त्यानंतरही बांधकामाचा पत्ता नाही.
- विवेक हेडाऊ, शहरप्रमुख शिवसेना

शहरात 90 टक्के रोजगार केवळ मिरची कटाईवर आहे. आरोग्यावर परिणाम होत असलातरी जगण्यासाठी मजुरांना नाइलाजाने हे काम करावेच लागते. त्यासाठी मजुरांना आरोग्यविषयक सुविधा देण्यात याव्या. परिसरातील बेकार तरुणांना काम देण्यासाठी औद्योगिकरणाचे नियोजन करण्यात यावे.
- गिता नागपुरे, तनिष्का समन्वयक

ट्रॉमा केअर युनिटला मंजुरी प्राप्त झाली असली तरी त्यातील मंजूर पदांना मान्यता मिळवून तत्पुरत्या स्वरूपात सेवेला प्रारंभ करण्यात यावा. ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यविषयक सेवेत वाढ करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ताकद खर्ची घालावी.
- योजना भानारकर, माजी ग्रामपंचायत सदस्य

शहरातील ज्या शिक्षण संस्था राज्य मार्गावर आहेत. त्या सुरू व बंद होण्याच्या वेळेवर पोलिस शिपाई तैनात करण्यात यावा. असा प्रयोग झाल्यास रहदारीची समस्या नियंत्रणात येईल.
- सुनील ठाकूर

नागरिकांना अनेक वर्षांपासून फ्लोराइड व क्षारयुक्त पाणी पितात. त्यामुळे अनेक आजार जडले आहेत. जलशुद्धीकरण योजना शासनस्तरावर पडून आहे. ती पूर्ण झाल्यास शहरातील नागरिकांना पाण्याचा शुद्ध पाणीपुरवठा होईल.
- मेघराज हुडकन

शहरात जिल्हा परिषदांच्या शाळेच्या तसेच इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र, या स्पर्धांच्या आयोजनाकरिता क्रीडांगण उपबल्ध करून देण्यासाठी खासगी शिक्षण संस्थांची हाजीहाजी करावी लागते. प्रत्येक तालुक्‍यात क्रीडा संकुलाची निर्मिती होत असताना हे शहर त्यापासून वंचित आहे.
- नंदू पाचभाई

शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे होत असलेले भारनियमन बंद व्हावे, कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेत पारदर्शकता असावी. भिवापुरात क्रीडांगण उभारण्यात यावे. भूमिगत नाल्या व गटारांचे निर्माण व्हावे. एमआयडीसीत उद्योग सुरू करून रोजगार देण्यात यावा.
- कैलास कोमरेल्लीवार, उपजिल्हाप्रमुख शिवसेना

शहरात अनेक सांस्कृतिक मंडळे आहेत. या मंडळाच्या माध्यमातून हौशी कलावंत आपली कला प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध होते. त्याकरिता सुसज्ज सांस्कृतिक भवन आवश्‍यक आहे. शहरात अनेकांच्या विकासनिधीतून कानाकोपऱ्यात सभागृहे उभारली गेलीत. मात्र, आज त्यांची दुरवस्था झाली आहे.
- शंकर डडमल

धर्मापूरपेठेत 1965 मध्ये सुरू झालेले केंद्रीय सार्वजनिक वाचनालय ज्ञानसंपदेच्या साठ्याचे मोठे भांडार आहे. या वाचनालयाचा वापर शहरातील लहान-मोठ्यांना होतो. आता या वाचनालयाच्या आधुनिकीकरणाची गरज आहे.
- संदीप निंबार्ते

शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्‍न व भूगर्भातील पाणीपातळी संतुलित राखण्यासाठी जलयुक्त शिवार उपयुक्त कार्यक्रम आहे. शासनाचा हेतू साकार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबत लोकसहभाग महत्त्वाचा आहे.
- माया डडमल

भिवापूर नगरपंचायतीची स्थापना आठ मे 2015 रोजी झाली. प्रशासकपदी तहसीलदाराला नियुक्त केले. मात्र, कामाच्या व्यापामुळे अनेक विकासकामांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ अधिकारी देण्यात यावा.
- हितेंद्र लांजेवार, उप शहरप्रमुख शिवसेना

वडसा-गडचिरोली, वर्धा-नांदेड अशा अलीकडच्या रेल्वे मार्गाचे नवीन प्रश्‍न मार्गी लागत आहेत. मात्र, नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजची जुनी मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. हा प्रश्‍न केंद्राच्या अखत्यारित येतो. त्यामुळे खासदारांनी केवळ आश्‍वासने दिली. मात्र, प्रश्‍न मार्गी लागलेले नाही.
- विजय डंभारे
-------------
समस्या यांना सांगा
आमदार सुधीर पारवे - 9422820164
तहसीलदार शीतल यादव - 8275402949
पोलिस निरीक्षक मनीष दिवटे - 8390066544
नगर पंचायत प्रशासक - 8275402949
----------------
संकलन : दिलीप जाधव (9823493004)
-----------------------------------------------------------
गुफा आणि प्राचीन अवशेषांचे वेलतूर

सी. पी. ऍण्ड बेरार आणि इंग्रजांच्या काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने या भागाचा दौरा केला. त्यांना हा परिसर अतिशय भावला. डोंगरांमधील गुफा आणि प्राचीन अवशेष पाहून त्यांनी या भागाबद्दल "वेल-टूर' असे उद्‌गार काढले. तेव्हापासून या भागाला वेलतूर असे संबोधणे सुरू झाले. भोसले काळातही तेच नाव कायम राहिले. उमरेड तहसील असताना इंग्रज अधिकारी सुट्या घालविण्यासाठी वेलतूर परिसरात येत असल्याची माहिती गोपाळ पाटील डेंगे यांनी दिली. मुंबईतील भारतीय इतिहास संशोधक मंडळासाठी शरद सहारे यांनी लिहिलेल्या "वैनगंगा खोरे एक अभ्यास' या शोधनिबंधात वैनगंगेच्या काठावरील अंभोऱ्यासंबंधी माहिती देताना बेलसरी भागाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे वेलतूरचे मूळ नाव बेलसरी असावे, असे मत दिलीप तितरमारे यांनी एका व्याख्यानात मांडले.
.....

ग्रामपंचायत स्थापना : 1948
सदस्य : 13
प्राथमिक आरोग्य केंद्र : 1
पोलिस ठाणे : 1
अंगणवाडी : 4
जि. प. शाळा : 1
खासगी शाळा : 2
कनिष्ठ महाविद्यालय : 2
वरिष्ठ महाविद्यालय : 1
वाचनालय : 1
प्राचीन संस्कृतीचे अवशेष
विकासाच्या विविध टप्प्यांवर वैनगंगा नदीपासून दूर गेलेले गाव म्हणजे वेलतूर. वेलतूरसभोवती पाषाण युगापासून समृद्ध गुप्त वाकाटक काळापर्यंतचे पुरावे सापडतात. येथील डोंगरांमध्ये नैसर्गिक गुहांसह मानवनिर्मित गुहा आहेत. त्या ठिकाणी मनुष्याचा वावर असल्याचे पुरावेही आहेत. या गुहांमध्ये दगडी शस्त्रेही सापडली आहेत. त्यात दगडी कुऱ्हाडींची संख्या मोठी आहे. परिसरात विविध कालखंडातील धातूंची नाणी सापडली आहेत. मातीची भांडी, दगडी भांडी, दागिने यांचाही त्यात समावेश आहे.
..............
अन्यायाविरुद्ध लढणारे गाव
तालुक्‍याच्या स्वातंत्र्य संग्रामात वेलतूरचा सहभाग आहे. रामभाऊ अतकरी, ढेंगे पाटील, रामभाऊ अवझे यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्याची मशाल पेटविली. सततच्या वीज भारनियमनाला कंटाळून नागरिकांनी वीज वितरण कार्यालय पेटविले. तर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी 31 डिसेंबर 1997 रोजी बैलबंडी, जनावरांसह साखळी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांवर गैरसमजुतीतून पोलिसांनी लाठीमार केला. बिथरलेल्या नागरिकांनी त्यांचा प्रतिकार करीत पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. यावेळी मोठ्या प्रमाणात जनावरे हरवली होती. पोलिस कोठडीत दगावलेल्या भूषण हुमणे हल्ला प्रकरणाने हिंसक वळण घेतले. 1996-97 मध्ये वेलतूर विदर्भासह महाराष्ट्राच्या नकाशावर संवेदनशील गाव घोषित करण्यात आले.
....
पोलिस ठाण्याची प्रशस्त इमारत
1969 साली एका प्रकरणात ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याची इमारत जाळली, अशी माहिती येथील जुन्या लोकांकडून मिळते. त्यानंतर आता अस्तित्वात असलेली नवी वास्तू बांधण्यात आली. संपूर्णता स्लॅप- सिमेंट कॉंक्रीटचे बांधकाम असलेली ही इमारत नागपूर ग्रामीण पोलिसांची शान आहे. नागपूर ग्रामीणमध्ये पूर्वी सिमेंट-कॉंक्रीटची ही एकमेव इमारत होती, हे विशेष.
.....
ग्रामविकासात राजकारण भारी
ग्रामविकासात नेहमीच वेलतूरचे राजकारण भारी पडले. राजकारण्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे वेलतूर विकासकामांपासून दूर असल्याचे दिसून येते. आपापसातील मतभेदांमुळे विकासकामे रखडल्याचे दिसते. मग ते ग्राम सचिवालयाचे संकुल असो, बाजार ओटे असोत किंवा व्यावसायिक बांधकाम. सर्वबाबतीत स्थानिक राजकारण्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या अनेक योजना रखडल्या आहेत. अंतर्गत रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या, स्वच्छतागृहे, नळयोजनांची कामे प्रलंबित आहेत. त्याचा सर्वसामान्यांना सर्वाधिक त्रास होतो.

घरकुल योजनेतून आठ वर्षांपासून एकही घर नाही. यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाने एप्रिल 2015 रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर यांना पत्र पाठविले. त्यावर प्रकल्प संचालक कार्यालयाने 17 एप्रिल रोजी रमाई आवास योजनेचे सध्यास्थितीत उद्दिष्ट नाही, तर इंदिरा आवास योजनेत अन्य लाभार्थ्यांचा समावेश करण्याचे शासनाचे निर्देश असल्याचे नमूद केले. नागपूर - आंभोरा राज्य मार्गाला जोडणारा बायपास रस्ता नसल्यामुळे जडवाहने गावातून जातात. अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. वेलतूरची लोकसंख्या वाढली. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वारंवार मागणी करूनही 30-35 वर्षात आबादी गावठाण केलेले नाही. येथील वीज कार्यालयाजवळ सुमारे 20 वर्षापासून 200च्या जवळपास कुटुंब राहतात. मात्र, वारंवार मागणी करूनही पट्टे मिळाले नाही. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधून देण्यासाठी शासनाने वेलतूर परिसरातील शेतकऱ्यांची जमिन अधिग्रहित केली. मात्र, त्यांना 2 लाख 90 हजारांचे पॅकेज मिळाले नाही.
....
विजेचा लपंडाव
विजेच्या लपंडावाला कंटाळून काही वर्षांपूर्वी वेलतूरवासींनी कार्यालयाला आग लावली होती. या संतापामुळे वीज वितरणचे अधिकारी धडा घेतील, अशी आशा नागरिकांना होती. परंतु, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांची चालढकल यामुळे परिस्थिती जैसे थे आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. गावातील वीज व्यवस्था सांभाळणाऱ्या तरुणांना अनुभव नसल्यामुळे लहानसा बिघाड त्यांच्या लक्षात येत नाही. अधिकारी मुख्यालयी नसल्याने ते थातूरमातूर काम करतात. त्याचा फटका नागरिकांना बसतो. तसेच वीज जनित्राचे नुकसान होते. पावसाळ्याचे दिवस असूनही वीज तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या कापलेल्या नाहीत. अनेक विद्युत जनित्रे उघड्यावर आहेत.
....
गंगादेवी मंदिर श्रद्धास्थान
येथील गंगादेवी मंदिरावर नागरिकांची श्रद्धा आहे. मंदिराला अलीकडेच "क' दर्जाचे देवस्थान म्हणून शासनमान्यता मिळाली. नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. मुन्ना बाबा नामक एका साधूने 50 वर्षांपूर्वी देवीची प्राणप्रतिष्ठा केली. या ठिकणी महायज्ञही झाला. गाव तलावाच्या काठावरील मारुती मंदिर खास आहे. याशिवाय बालगीर बाबा मंदिर, विठ्ठल- रुखमाई मंदिर, नाग मंदिर, माता माय येथील महत्त्वाची श्रद्धास्थाने आहेत. कुणबी वॉर्डातील आखाड्याला दुर्गा मंदिर म्हणून ओळख मिळाली. आता ते जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. काही वर्षांपूर्वी येथे डोमा पहेलवानाचा आखाडा होता. कुस्ती, दांडपट्टा यासारखे खेळ येथे शिकविले जायचे. आखाड्याला मिळालेल्या दानातून दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. नवरात्रात दरवर्षी घटस्थापना करून दुर्गोत्सव साजरा केला जातो. कालौघात येथील अनेक समाधी नष्ट झाल्या असल्या तरी काही कायम आहेत. त्या समाधी नागा साधूंच्या असाव्या, असा कयास लावला जातो. गावालगत हजरत मेहबूब खान अली ऊर्फ वली बाबांची टेकडी म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक. येथे सर्व जातीपंताच्या लोकांचा वावर असतो.
....
जलसमृद्धीकडे वाटचाल
गोसीखुर्द धरणाअंतर्गत आकारास आलेल्या आंभोरा उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून वेलतूरची जलसमृद्धीकडे वाटचाल सुरू आहे. वैनगंगेच्या काठावरून पुढे सरकलेली गावे पुन्हा तिच्या पाण्याने न्हाऊन निघताना दिसत आहेत. या योजनेत वेलतूरची 90 टक्‍के जमीन ओलिताखाली आली. नजर जाईल तिकडे हिरवीकंच शेते बहरताना दिसतात. शेतातून वाहत जाणारे पाणी पुढे जंगल फुलविते. दिवसेंदिवस जंगलातील वनसंपदा वाढत असून, सामाजिक वनीकरणअंतर्गत झालेल्या वनीकरणाने चांगले बाळसे धरले आहे. सागवन, बांबू, निलगिरी, शिसमसह काही फळझाडे बहरताना दिसतात. जंगली जनावरे पशुपक्षी मुक्‍त वावरताना नजरेत भरताहेत. शासकीय योजनेतून वेलतूर वनवृत्तातील दीडशे हेक्‍टर जमिनीवर विविध वृक्षांची लागवड केली. त्यांचे संगोपन करून त्यांच्या वाढीचे विशेष प्रयत्न येथे केले जात असल्याची माहिती वनरक्षक, वनपाल व वनमजुरांनी दिली.
पाणीकरात वाढ
ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी असलीतरी उपसासिंचन विभागाने भरमसाठ वीज बिल भरावे लागत असल्याने पाणीकरात वाढ केली आहे. हा भूर्दंड शेतकऱ्यांवर पडतो. या कार्यालयात कर्मचारी कमी असल्यामुळे पाणीवाटप करताना प्रत्यक्ष बांधावर कर्मचारी राहत नाही. त्यामुळे अनेकदा पाण्याचा अपव्यय होत असल्याने शेतीला मिळणारे पाणी अपुरे पडण्याची शक्‍यता आहे. यावर आळा घालण्यासाठी नकाशा आराखडा तयार केला आहे. पाणीपुरवठा सहकारी संस्था स्थापन करून त्याचे वितरण होईल.
...
अधिकारी - कर्मचाऱ्यांची मुख्यालयास ना
तालुक्‍याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी स्वत:चे निवासस्थान व पाल्यांना नामांकित शाळेत दाखल करून येथे नामधारी सेवा देत अप-डाऊन करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे येथील समस्या वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर शासनाकडून लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय होते. ग्रामीण भागात विशिष्ट वेळेत काम करणारे हे अधिकारी- कर्मचारी एखाद्या घरमालकाला विश्‍वासात घेऊन त्याच्याकडून घरभाडे पावती घेऊन पैशाची उचल करतात. विशेष म्हणजे हा गोरखधंदा अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालत असतो.
....
खाजगी गाड्यांनी ये-जा
शाळा, बॅंक, रुग्णालये, सिंचन कार्यालय, वनविभाग, कृषी, तलाठी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी मुख्यालयी न राहता दररोज ये-जा करतात. रोजच्या प्रवासासाठी त्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या जीप गाड्या सवलतीच्या दरात करार पद्धतीवर ठरवून घेतल्या आहेत. या गाड्या इतरांपेक्षा कमी पैसे घेऊन कमी वेळात त्यांना इच्छित स्थळी पोहोचवितात. पोलिसांचेही हात ओले होत असल्याने तेही या वाहतुकीकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांच्याच गाड्याही या व्यवसायात असल्याची बाब सर्वश्रुत आहे.
...
लोकोत्सवी वेलतूर
वेलतुरात 23 जानेवारीचा शंकरपट, दिवाळीनंतर भरणारी मंडई, पावसाळ्याच्या सुरुवातीला होणारी गावपूजा, सार्वजनिक भागवत सोहळा आदी लोकोत्सव साजरे केले जातात. यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. दंडार, गोंधळ, खडीगंमत, नाटक, जलसा, लावणी अशा कार्यक्रमांनी परिसर गजबजून जातो. वॉर्डावॉर्डात मैफिल रंगते. संगीत नाटकांचा काळ ज्यांनी गाजविला त्या नाटकांचे प्रयोग मशाली, गॅसबत्तीच्या प्रकाशात विना लाऊडस्पीकर केले आहेत. अरुण बाकरे, शालिक रकतसिंगे, गंगाधर रकतसिंगे, मेश्राम बाबू, विजू ठाकरे, गुणवान बारई असे अनेक स्थानिक कलावंत प्रसिद्ध आहेत. त्यांचे संवाद आजही भूरळ घालतात. दंडार मंडळ, गोंधळ, खड्या गमतीचे फड त्यातील शाहीर, नाचे अद्याप आपली कला जोपासत आहेत. शाहीर गोविंद चाचेरकर, बाजीराव नाच्या, देवानंद रामटेके, संजय डोंगरे, राजू डोंगरे लोककलावंत म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहेत. हजरत बाबा वलींचा ऊर्सही सार्वजनिकरीत्या साजरा केला जातो. भागवत सप्ताह तर प्रत्येकाच्या घरचा कार्यक्रम असतो. अलीकडे होणारा भीम मेळावा सर्वसमभावाचे प्रतीक आहे.
....
केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण
वेलतुरात केजी ते पीजीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. तरीही दर्जेदार शिक्षणासाठी येथील विद्यार्थी-पालक पचखेडी, मांढळ, कुही, नागपूर, मौद्याची वाट धरतात. दहावी, बारावीचा निकालही मोठ्या प्रमाणात लागतो. परंतु पुढील शिक्षणात ती मुले कुठेच पुढे गेलेली दिसत नाही. केवळ मोजके विद्यार्थी समोरचे शिक्षण घेताना दिसतात. खाजगी व जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील शिक्षण दिले जाते. त्यात इंगजी शाळांची भर पडली आहे. मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या या शाळांना परवानगीच कशी दिली जाते, हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो. विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षक पालकांना विविध प्रकारचे आमिष दाखवितात. पालकांना विशेष पार्टी, विद्यार्थ्यांना मोफत जाण्या - येण्याची व्यवस्था यासह शालेय साहित्य पुरविले जाते. तोच कित्ता पदवी शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांनी गिरवायला सुरुवात केली आहे.
...
जि.प. शाळा बंद
1960 मध्ये येथे जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. वाढती शाळांची स्पर्धा, पालक - विद्यार्थ्यांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस रोडावत गेली. परिणामी 1992 पासून सुरू असलेली शाळा बंद पडली. शाळेची प्रशस्त इमारत आपल्या अस्तित्वाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. शाळेच्या क्रीडांगणावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे.
....
नळयोजना कुचकामी
25 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली वेलतूर पाणीपुरवठा नळ योजना आता कुचकामी ठरली आहे. त्यामुळे वेलतूरकरांना दोन- तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. 25 वर्षांपूर्वी 5 हजार लोकसंख्येसाठी दीड लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली. या टाकीचे पाइपलाइन जागोजागी फुटले. पाइपलाइनच्या दुरुस्तीवर ग्रामपंचायतीचे लाखो रुपये खर्च होतात, परंतु त्याचा काही फायदा होत नसल्याने पदाधिकारी चिंतित आहेत. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत अस्तित्वात आलेली नवीन 5 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी राजकारण्यांच्या मतभेदामुळे निकामी ठरली आहे. पूर्वी खोदण्यात आलेल्या विहिरी, बोरवेल अयोग्य नियोजनामुळे निकामी पडून आहेत. पाण्याच्या टाकीला गळती लागली असून, तिचे खिपले पडायला सुरुवात झाली आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागते.
.....
प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले शोभेची वास्तू
35 गावांच्या आरोग्यसेवेचा डोलारा सांभाळणारे वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अनुभवी डॉक्‍टर नसल्याने शोभेची वास्तू ठरले आहे. शासनाद्वारे आरोग्यसेवेच्या कितीही विधायक योजना राबविल्या जात असल्या तरी सध्या त्या वेलतूरपासून कोसोदूर आहेत. आरोग्य उपकेंद्रात प्रतिनियुक्‍तीवर असलेले डॉक्‍टर कित्तेक दिवसांपासून सेवा देत असल्याने आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले आहे. प्रतिनियुक्‍तीवरील डॉक्‍टर छोट्या आजारांसाठी रेफर अर्ज देऊन आपली जबाबदारी झटकतात.
....
शासकीय इमारतींची दूरवस्था
डागडुजीअभावी वेलतुरातील शासकीय इमारतींची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. गंगानगर स्थित ग्रामपंचायत सचिवाची वसाहत, वनविभागाचे कॉर्टर, बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारती, त्यांच्या वर्गखोल्या, पोलिस स्टेशन कॉर्टर्स, गावाबाहेरील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची आंभोरा उपसासिंचन योजनेची वसाहत मुक्‍कामी मुख्यालयी नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे ओस पडली आहे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या वसाहती बेवारस ठरल्या आहेत.
...
वनविभागाची वसाहत उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत
वनविभागाने बांधलेल्या वसाहतीत आजपर्यंत एकही कर्मचारी राहिला नाही. पाच वर्षांपासून ही इमारत उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. वसाहतीची दारे आणि खिडक्‍या चोरट्यांनी लंपास केल्या. शाळेच्या इमारतींमध्ये चोरी झाली. देखभाल, दुरुस्तीअभावी शाळेचे फर्निचर, कवेलू, खिडक्‍या, दारांच्या पाट्या गायब झाल्या. त्या ठिकाणी वाचनालय, तरुणांसाठी जिमखाना, वृद्धांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण आदी तयार करता येऊ शकते.
....
मच्छी खवय्यांची मज्जा
वेलतूरच्या मच्छी बाजारात ताजे आणि गोड्या पाण्यातील मासे मिळतात. जे खाण्यासाठी अतिशय चविष्ट असतात. बोटरे, कन्नस, बिलवणे, चपट्या, कगई, डोंगरी अशा प्रजातीचे मासे बाजारात असतात. अनेक मच्छिमार कुटुंबीयांचा यावर उदरनिर्वाह चालतो. गोसेखुर्द धरणाचा परिणाम मासेमारीवर पडला असून, पाणी वाढल्याने धोका वाढला आहे. खोल पाण्यातील मासेमारी पारंपरिक पद्धतीने करणे शक्‍य नसल्याने आधुनिक साधनांद्वारे मासेमारी केल्यास व्यवसाय वाढण्यास मदत होईल.
...
मिरची उत्पादनात अग्रेसर
मिरची उत्पादनात अग्रेसर असलेल्या गावातील शेतकरी एकरी 150 क्विंटलपर्यंत मिरचीचे उत्पादन घेतात. पिकल्या लाल मिरचीसह ओल्या कच्च्या हिरव्या मिरच्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपकेंद्र तयार केले आहे. त्यात हजारो क्विंटल मालाची उलाढाल होते. सोबत अनेकांना रोजगारही मिळतो. अलीकडे येथील काही उत्पादकांनी स्वत:च माल खरेदी करून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नईसारख्या मोठ्या बाजारपेठांत पाठविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मालाला चांगली मागणी आणि किंमत मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
....
हातमाग उद्योगाला अवकळा
शेकडो कुटुंबांचे पालनपोषण करणारे समृद्ध पानमळे आणि हातमाग उद्योग आज आपल्या अस्तित्वाच्या अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांना पुनरुज्जीवन मिळण्याची आता तिळमात्र शक्‍यता नाही. पोटापाण्याचा प्रश्‍न मिटविण्यासाठी बहुतेक कारागिरांनी गाव सोडले. तर काहींनी शेती, घरे, विहिरी विकून दुसरे व्यवसाय थाटले आहेत. पान आणि हातमाग व्यवसायावर वेलतूरची अर्थव्यवस्था अवलंबून होती. नऊवारी लुगडे, धोतर बनविण्याचे हे मुख्य ठिकाण होते. परंतु आज हे दोन्ही व्यवसाय डबघाईस आले आहेत.
---------
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांच्या विकासासाठी कर्जमाफी व्हावी. आंभोरा देवस्थानाचा पर्यटन विकास झाला पाहिजे. त्यात स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात. प्रकपग्रस्तांच्या समस्या शासनाने तातडीने सोडवाव्यात. वैनगंगा नदीवरील पूलाचे बांधकाम तातडीने व्हावे.
- मनोज तितरमारे, जिल्हा परिषद सदस्य वेलतूर सर्कल

अनेक कर्मचारी-अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी. अवहेलना होत असेलतर जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला पाऊल उचलावे लागेल.
- ग्यानीवंत साखरवाडे, सरपंच, वेलतूर

गोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या सोयीसाठी वेलतूर परिसरात शासकीय तंत्रनिकेतन, पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू करावेत. त्यात प्रकल्पबाधितांना प्रवेश द्यावा. शासनाने उद्योग क्षेत्र निर्माण करावे.
- मेघाताई तितरमारे, माजी सदस्य, जिल्हा परिषद

बचतगटाच्या माध्यमातून एकता कापड विक्री केंद्र सुरू केले. यापुढे तनिष्का व्यासपीठासोत विविधि उपक्रम घेण्यात येतील.
- पिंकी रोडगे, उपसरपंच, वेलतूर

शेतकऱ्यांची दयनीय अवस्था बदलण्यासाठी सातबारा कोरा होणे आवश्‍यक आहे. देवस्थानचा पर्यटन विकास झाल्यास रोजगाराच्या संधी मिळतील.
- हरिदास लुटे

व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव शेतपिकांच्या नुकसानीचा त्रास वाढला. यापूर्वी दहेगाव, केसोरी, पांढरगोटा, फेगड येथे वन्यजीवांनी नुकसान केले. नुकसानभरपाईसाठी उमरेड कार्यालयात खेटा घालाव्या लागतात. या भागात क्षेत्र कार्यालय व्हावे. गॅस कनेक्‍शन मोफत मिळावे. इंधन लाकडाची मुभा मिळावी. प्रकल्पबाधितांना शासनाने रोजगार द्यावा.
- देवानंद उके

वेलतूरसाठी 2009-10 भारत निर्माण योजनेतून 14 लाखांची पूरक नळयोजना मंजूर झाली. परंतु, वेळेत निधी न मिळाल्यामुळे त्याची किमत 40 लाखांवर पोहोचली. सुधारित दरपत्रकासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव सादर केला. मात्र, शासन दरबारी दखल न घेतल्यामुळे वेलतूरवासींना पाण्यासाठी त्रास सहन करवा लागत आहे.
- सुधीर बेले, ग्रामपंचायत सदस्य

वेलतूरसह परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे "भाजपचा नारा, सातबारा कोरा' असा आहे. आता शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफी द्यावी.
- बाबासाहेब तितरमारे, माजी अध्यक्ष, जिल्हा किसान विकास आघाडी.

शासन शेतकरी हितासाठी सावकारी कर्जमाफ, अटल पेन्शन योजना, अर्ज द्या- कर्ज घ्या, जलयुक्त शिवार, समाधान शिबिर अशा विविध योजना राबवित आहे. त्याचा चांगला लाभ होईल.
- सुनील जुवार, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना

आजच्या स्वार्थी जगात लोक पद, पैसा, प्रतिष्ठा यासाठी भांडतात. पण, समाजसेवा न करता त्याचा आव आणतात. म्हणून आता समाजाला राष्ट्रसंतांच्या विचाराची गरज आहे.
- भोजराज चारमोडे, राष्ट्रसंतांच्या विचारांचे प्रचारक

महावितरणचे अनेक अधिकारी- कर्मचारी बाहेरगावातून ये-जा करतात.त्यामुळे गावातील कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसतात. वीज गेल्यानंतर गावातीलच अप्रशिक्षित व्यक्तींकडून वीजदुरुस्तीची कामे करावी लागतात. अशाच एका घटनेत गत महिन्यात एकाचा बळी गेला होता.
- प्रदीप कुलरकर, तालुकाध्यक्ष युवासेना

कुहीहून वेलतूरला जोडणारा मुख्य मार्ग अरुंद आहे. अंतर्गत रस्ते नादुरुस्त असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.
- प्रा. ओमदेव ठवकर, शिवसेना कार्यकर्ता

शेतकरी, शेतमजूरी प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी सरकार विविध कायमस्वरुपी जलयुक्त शिवार विमा योजना राबवित आहे. त्यांचा फायदा भविष्यात दिसून येईल.
- पांडुरंग बुराडे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

वेलतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. येथील पोलिस निवासगृहाची दुरवस्था असल्याने डागडुजी व्हावी.
- डी. एम. गोंदके, ठाणेदार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी वेलतूर येथे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले. सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेच्या वतीने तिजारे महाविद्यालयातून ग्रामीण विद्यार्थी लाभ घेत आहेत.
- पी. ए. तिजारे, माजी प्राचार्य

अम्बतिथक बौद्धविहाराला "क' दर्जा प्राप्त असून, निधी न मिळाल्याने पर्यटन विकास थांबला आहे. येथे भेट देणाऱ्या बौद्धबांधवांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गैरसोय होते. येथे रस्त्याचे बांधकाम व्हावे. आंभोरा देवस्थानाचा विकास झाल्यास भाविकांची गैरसोय दूर होईल.
- संघपाल गोंडाणे

शासनाच्या जलयुक्त शिवार, विमा योजना, तत्काळ कर्ज योजना कुही तालुक्‍याचत तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या समन्वयामुळे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून राबविण्यात येत आहे.
- संदीप सुखदेवे, सदस्य, तालुका समन्वय समिती, कुही


सातवाहनकालीन मनसर


 
Blogger Templates