25 Jan 2017

तरुणाईसाठी आशेचा "किरण'


वयाच्या 25 व्या वर्षी सीआरपीएफमध्ये निवड झालेल्या उषाला सैन्याचे बाळकडू कुटुंबीयांकडूनच मिळाले. 27 व्या वर्षी ती सेवेत रुजू झाली. बस्तरमधील नागरिकांमध्ये विशेषत: महिलांत नक्षल्यांबाबत असलेली भीती, नक्षल्यांचे वाढते क्रौर्य पाहून समोर असलेल्या तीन पर्यायांपैकी नक्षलप्रभावित बस्तर जिल्ह्याची निवड करीत तेथील महिलांना नक्षलमुक्‍त जीवन देण्याचा प्रणच गीताने केला.
नक्षल्यांसोबत सामना करण्यात प्रशासन कमी पडत असल्याची ओरड विविध व्यासपीठांवरून नेहमीच होत असते. परंतु, निव्वळ टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपणही परिवर्तनाचा भाग व्हावे या हेतूने एक तरुणी पुढे सरसावली. चक्‍क नक्षल्यांसोबत दोन हात करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. उषा किरण असे या धाडसी तरुणीचे नाव असून, छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील घनदाट जंगलात ती नक्षल्यांसोबत लढा देत आहे. सीआरपीएफमध्ये नियुक्‍त होणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी, अशीच तिची वाटचाल आहे.
शेजारील राष्ट्रांकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय सैन्य डोळ्यांत तेल घालून सीमेवर खडा पहारा देत आहेत. सीमेबाहेरील शत्रूंसोबतच देशाअंतर्गत नक्षलवादाचा धोकाही दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीसह छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्यात वाढता नक्षलवाद चिंतेचे कारण आहे. छत्तीसगड राज्यात तर नक्षलवाद मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. त्यातल्या त्यात बस्तर जिल्हा नक्षल्यांचा बालेकिल्लाच. या जिल्ह्याच्या उत्तरेला दुर्ग, उत्तर-पूर्वमध्ये रायपूर, पश्‍चिममध्ये चांदा, पूर्वमध्ये कोरापूट तसेच दक्षिण भागात पूर्व गोदावरी जिल्हा आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण भाग दाट वनांनी आच्छादलेला असल्याने नक्षल्यांचे हे मुख्य केंद्र आहे. चार वर्षांपूर्वी बस्तरमधील झिरम घाटीत दरभा डिव्हिजनमध्ये नक्षल्यांनी घडविलेल्या घातपातात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह 34 जणांची हत्या करण्यात आली. येथील बहुतांश आदिवासी निरक्षर असून, सर्वाधिक गोंड समाजाचे वास्तव्य आहे. वनौषधी आणि वनांतून मिळणाऱ्या इतर वस्तूंपासून मूलभूत गरजा पूर्ण करून उदरनिर्वाह करणे, एवढेच त्यांचे जीवन. नक्षल्यांचे वाढते क्रौर्य आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे येथील नागरिक हतबल आहेत.
सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आजची तरुणाई सीआरपीएफमध्ये जाण्यास फारशी इच्छुक दिसत नाही. परंतु, 25 व्या वर्षी सीआरपीएफ दाखल झालेल्या उषाला सैन्याचे बाळकडू कुटुंबीयांकडूनच मिळाले. मूळची गुडगाव येथील रहिवासी असलेली उषा सीआरपीएफची तिसऱ्या पिढीची अधिकारी आहे. तिचे आजोबा आणि वडील सीआरपीएफमध्ये होते. आपणही देशसेवेसाठी सज्ज व्हावे, असे तिने बालपणीच ठरविले होते. सीआरपीएफमध्ये भारतातून तिला 295 वी रॅंक मिळाली. तिहेरी उडी प्रकारात राष्ट्रीय विजेतेपदही तिने भूषविले आहे. महिला असल्याने त्यांच्या तुलनेत आपण कुठेही कमी पडू नये, याकडे तिने विशेष लक्ष दिले. कोणत्याही वशिल्याशिवाय सीआरपीएफची परीक्षा देऊन 27 व्या वर्षी ती सेवेत रुजू झाली. बस्तरमधील नागरिकांमध्ये विशेषत: महिलांत नक्षल्यांबाबत असलेली भीती, नक्षल्यांचे वाढते क्रौर्य पाहून समोर असलेल्या तीन पर्यायांपैकी नक्षलप्रभावित बस्तर जिल्ह्याची निवड करीत तेथील महिलांना नक्षलमुक्‍त जीवन देण्याचा प्रणच गीताने केला.
नागरिकांमधील भीती घालविण्यासाठी तसेच नक्षल्यांसमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी उषा बस्तरमध्ये महिला कमांडंटपदी नियुक्‍त झाली. हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात ती कर्तव्य बजावत आहे. उषा सीआरपीएफच्या 80 व्या बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंटपदावर कार्यरत आहे. नक्षल भागात तैनात असलेली ती पहिली महिला सीआरपीएफ ऑफिसर. रायपूरपासून 350 किलोमीटरवर बस्तरमधील दरभंगा डिव्हिजनमध्ये सीआरपीएफ कॅम्पमध्ये ती कर्तव्य बजावते. 27 वर्षीय उषाने स्वत: नक्षली भागात नेमणूक मागून घेतली. नक्षलवादाचा वाढता धोका लक्षात घेता सीआरपीएफ जवान नक्षल्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. नक्षल प्रभावित भागात महिला कमांडर अतिशय कमी आढळतात. परंतु, बस्तरमध्ये तैनात महिला कमांडर उषा किरण देशासाठी एक आशादायी किरण आहे. अवघ्या 27 व्या वयात तिने नक्षल्यांच्या मनात भीती निर्माण केली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ती बस्तरमध्ये कार्यरत आहे. बस्तरमधील स्थानिक अतिशय गरीब असून, नक्षल्यांबद्दल त्यांच्या मनात भीती आहे ती घालविण्यासाठी पोलिस दल निवडल्याचे ती सांगते.

- अतुल मांगे

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates