12 Feb 2017

परीक्षेसाठी व्हा बिनधास्त !

- बाळू दत्तात्रय राठोड
9881323543

बारावीसोबत सेमिस्टर पॅटर्नच्या परीक्षा काही दिवसांतच सुरू होतील. परीक्षा म्हटले की, विद्यार्थ्यांना खूप टेन्शन असते. अभ्या
स आणि परीक्षेचे टाइम मॅनेजमेंट कसे करावे या विचारानेच विद्यार्थ्यांना घाम फुटतो. बारावी म्हणजे आयुष्याचा "टर्निंग पॉइंट' बारावीसोबत जेईई मेन्स, एमएचटी-सीईटी, सेमिस्टर आणि इतर पात्रता परीक्षांमध्ये चांगले गुण मिळावे यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असतात. अनेकदा त्यामुळे अभ्यासाचा ताणही निर्माण होतो. वेळेवर आठवेल काय? वेळ पुरेल काय? उत्तरपत्रिका कशी लिहावी? असे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. या प्रश्‍नांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम होतो. त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍याची भावना निर्माण होते. दुसरीकडे अभ्यासासाठी पालकांचा तगादा. हे करू नका, ते करू नका, अभ्यासात लक्ष दे, खेळू नको, मोबाईल वापरायचा नाही किंवा खेळायचे नाही अशी अनेक बंधने पालकांकडून विद्यार्थ्यांवर लादण्यात येतात. परीक्षेचे टेन्शन आपल्या विचारांमुळे निर्माण होत असते. परीक्षा म्हणजे स्पर्धा समजून आपण आपल्या प्रगतीची तुलना दुसऱ्यांबरोबर करीत असतो व आपली संपूर्ण ताकद या स्पर्धेत नष्ट करीत असतो. जीवनात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे स्पर्धा आवश्‍यक आहे; मात्र स्पर्धा ही नेहमी सकारात्मक दिशेने असली पाहिजे. परीक्षा देणारा विद्यार्थी प्रचंड तणावात असतो. हा तणाव दूर करण्यासाठी कुटुंबातील मंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा व हसत परीक्षेला सामोरे जावे. मित्रानो, तुम्ही परीक्षेकडे कसे बघता, यावर तुमची परीक्षा अवलंबून असते. आजही अनेक तरुण परीक्षेला आपल्या आयुष्यातील महत्त्वाची घटना मानतात. मित्रांनो, परीक्षेसाठी मनावर ताण घेऊ नका. मात्र, चांगले गुण मिळविण्याचा निर्धार नक्कीच असायला हवा. निर्धार पक्का असला की उत्साह वाढतो. परीक्षा ओझे नाही तर आव्हान म्हणून स्वीकारत सामोरे जाण्याचा आत्मविश्‍वास बाळगा. परीक्षा ही तुमच्या आयुष्याची कसोटी नाही, असा विचार करून परीक्षा "एन्जॉय' करा.

वर्गात अभ्यासक्रम पूर्ण करणे ही परीक्षेची पूर्वतयारी आहे. त्यात जे ज्ञान मिळते त्याचे मूल्यांकन म्हणजेच परीक्षा. मग वर्षभर जे केले त्याच्या मूल्यांकनाची कसली भीती. स्वत:ला ओळखल्यास परीक्षेची भीती वाटणार नाही.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून "मन की बात'मध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला ""स्माईल मोर, स्कोर मोर'' हा सकारात्मक संदेश देत त्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका. तुमचे भवितव्य तुम्हाला घडवायचे आहे. तुमचे उद्दिष्ट तुम्हीच ठरवा, तुमचे ध्येय तुम्हीच ठरवा, मुक्त मनाने, मुक्त विचाराने आणि मुक्त सामर्थ्याने. हे ही तितकेच खरे आहे की, प्रतिस्पर्धा कशासाठी? अनुस्पर्धा, स्वयंस्पर्धा का नसावी? इतरांशी स्पर्धा करण्यात आपला वेळ का वाया घालवावा? आपण आपल्या स्वत:शी स्पर्धा का करू नये? आपणच याआधी गाठलेली यशाची शिखरे ओलांडून नवी शिखरे पादाक्रांत करायचा निश्‍चिय का करू नये? आनंद व समाधान मिळविण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची तुम्हाला आवश्‍यकता वाटणार नाही.

परीक्षा म्हणजे केवळ गुणांचा, आकड्यांचा खेळ मानू नका. कुठे पोचलो, किती मिळवले? या हिशेबात अडकू नका. मनात स्वप्न घेऊन चालायला हवे, संकल्पबद्ध असायला हवे. आपण योग्य पद्धतीने पुढे चाललोय का? हे या परीक्षांमधून कळते, आपली गती योग्य आहे का? हे या परीक्षांमधून समजते. आणि म्हणून तुमची स्वप्नं विराट, विशाल असतील तर परीक्षा म्हणजे आपोआपच आनंदाचा उत्सव होईल.

मी गेल्या अनेक वर्षांपासून युवकांसोबत काम करतोय. यानिमित्त त्यांच्या समस्या जाणण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत नियमित संवाद साधत असतो. तेव्हा असे लक्षात आले की, परीक्षेच्या काळात मुलांना शिस्तीची नाही तर सहकार्याची आवश्‍यकता असते. यश-अपयश असतेच. यश आणि अपयशाला न जुमानता या परीक्षेच्या अभ्यासातून आपले व्यक्तिमत्त्व कसे फुलत आहे, याचा विचार करून धेय्य गाठण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

यानिमित्ताने युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा संदेश आठवला, ते म्हणतात...

हारना सबसे बुरी विफलता नहीं हैं,

कोशिश ना करना ही सबसे बडी विफलता हैं ।

-------------------------

यशाचे काही मंत्र

  • - अभ्यासाची योजनाबद्ध आखणी.
  • - शिस्त, स्थिरता व सातत्य.
  • - आत्मव्यवस्थापन व स्वतःला प्रोत्साहन.
  • - वेळेचे व्यवस्थापन व मूल्यमापन.
  • - सकारात्मक मानसिकता.
  • - ताणतणावापासून दूर राहा.
  • - संवाद वाढविणे आवश्‍यक.
  • - खेळ व मनोरंजासाठी आवश्‍यक वेळ द्या.
  • - आपली क्षमता ओळखा.
  • - स्वस्थ व बिनधास्त राहा.

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates