23 Jul 2016

जिवंत बॉम्ब हाताने टाकला गटारात

सैयद मुश्‍ताक सैयद उस्मान

शुक्रवार असल्याने गीतांजली टॉकीज चौकातील खान मशि
दीत नागरिकांची गर्दी होती. मशिदीत जवळपास दीड हजारांवर लोक उपस्थित होते. परिसरही गजबजलेला होता. दरम्यान, एका समाजकंटकाने मशिदीसमोर जिवंत बॉम्ब फेकला. ही वार्ता पसरताच धावपळ सुरू झाली. तहसील पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक सैयद मुश्‍ताक सैयद उस्मान यांना ही माहिती मिळाली. मशिदीच्या काही अंतरावर असलेल्या मुश्‍ताक यांनी लगेच मशिदीकडे धाव घेतली. जिवाची पर्वा न करता त्यांनी जिवंत बॉम्ब हाताने उचलला. तो काही अंतरावरील गटारात टाकून झाकण लावले. त्यानंतर बॉम्ब शोधक-नाशक पथकाला माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. मुश्‍ताक यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.

सै. मुश्‍ताक (ताजनगर) यांचे वडील सैयद उस्मान पोलिस हवालदार होते. मुलानेही पोलिस खात्यात भरती व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सै. मुश्‍ताक यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि वेकोलित नोकरी स्वीकारली. मात्र, वडिलांची इच्छा आणि वर्दीचे आकर्षण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे पोलिस भरतीचा सराव सुरू केला. भरती निघाली आणि पहिल्याच प्रयत्नात निवड झाली. वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. 1986 मध्ये ते पोलिस दलात भरती झाले. सिमी या दहशतवादी संघटनेची मोमिनुपऱ्यातील एका हॉटेलमध्ये बैठक होती. यादरम्यान कानपूर येथे दंगे भडकले होते. त्यावर विचारमंथन करून नागपुरात दंगे भडकविण्याची योजना सिमीची होती. सै. मुश्‍ताक यांना याबाबत माहिती मिळाली. पोलिस आयुक्‍त प्रबीरकुमार चक्रवर्ती, उपायुक्‍त ब्रिजेश सिंग यांना थेट माहिती दिली. त्यांनी पिस्तूल बाळगण्याची परवानगी देत सिमीचा डाव उद्‌ध्वस्त करण्याची जबाबदारी सोपविली. बैठकीवर हल्लाबोल करीत सिमीच्या कार्यकर्त्यांची दाणादाण उडवून दिली. त्यापैकी दोन कार्यकर्त्यांना नागपुरात पहिल्यांदा अटक करण्यात आली. 1999 मध्ये राजनगरातील व्यापाऱ्याच्या घरावर हैदराबादच्या टोळीने दरोडा टाकला. 65 लाख रुपयांचे सोने त्यांनी पळवले. या तपासात त्यांनी 7 आरोपींना अटक केली.
"अननोन मर्डर' डिटेक्‍शन करण्यात मुश्‍ताक यांचा हातखंडा आहे. 21 मर्डर डिटेक्‍ट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नंदनवनमधील अबू आणि अफजल गॅंगचा सफाया करण्यासाठी विशेष तैनाती मिळाली होती. तर मोस्ट वॉंटेड गुन्हेगार योगीराज बांतेला पहिल्यांदा त्यांनी अटक केली. त्यांना शायरीचा शौक असून "पोलिस-नागरिक' कार्यक्रमाच्या आयोजकपदी ते असतात. आई रजिया सुलताना सैयद आणि पत्नी कनिजा यांच्या प्रोत्साहनामुळे पोलिस दलातील वाटचाल सुरळीत असल्याचे ते आवर्जून सांगतात.
 
Blogger Templates