15 Nov 2015

आरोग्य सुविधेत उत्तर नागपूर मागे

मनपा-डीसीएफचे सर्वेक्षण ः एकूण नागपूरकर मात्र समाधानी

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 14 ः केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी ठरवून दिलेली मार्गदर्शक तत्त्वानुसार शहर आरोग्य सेवेबाबत पिछाडीवर असले तरी एकूण नागपूरकरांनी शहरातील आरोग्य सुविधांवर समाधान व्यक्त केले आहे. मात्र, शहरातील इतर भागांच्या तुलनेत उत्तर नागपूर आरोग्य सुविधेत मागे असल्याचे नुकताच महापालिका व डिलिवरिंग चेंज फाऊंडेशनने (डीसीएफ) केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शहरातील प्रत्येक झोनमधील नागरिकांनी आरोग्य सेवेबाबत कमी-अधिक प्रमाणात नाराजी व्यक्त केली. मात्र, आशीनगर झोनमध्ये नाराजीचा सूर लावणारे सर्वाधिक नागरिक असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने मनपा व डीसीएफने शहरातील नागरिकांच्या मनातील नागपूर कसे असावे? याबाबत मागील महिन्यात सर्वेक्षण केले. स्मार्ट सिटी मार्गदर्शक तत्त्वात शहरातील आरोग्य सेवा सुधारण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे मनपा व डीसीएफने नागरिकांकडून शहरातील शासकीय, खाजगी रुग्णालये, त्यांच्याकडून दिली जाणारी सुविधेबाबतही मत नोंदविले. स्मार्ट सिटीत आरोग्य सुविधांबाबत 'सकाळ'ने घेतलेल्या चर्चासत्रात तज्ज्ञांनी प्रत्येक झोनमध्ये एक सार्वजनिक रुग्णालय असावे, असे मत नोंदवून शहरातील आरोग्य सेवेवर चिंता व्यक्त केली होती. यानंतर महापालिकेनेही स्मार्ट सिटी नागरिकांचा सहभाग अभियानातून घेतलेल्या चर्चासत्रातही तज्ज्ञांनी हीच री ओढली होती. मनपा व डीसीएफने घेतलेल्या नागरिकांचा सहभाग अभियानातून नागरिकांना फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या फॉर्ममध्ये शहरातील नागरिकांना 'तुमच्या परिसरात उत्तम आरोग्य सेवा आहे.' याबाबत मत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती. शहरातील 2 लाख 16 हजार नागरिकांनी या सर्वेक्षणात मत नोंदविले. यापैकी 69 टक्के नागरिकांनी त्यांच्या परिसरात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध असल्याचे मत नोंदविले. 31 टक्के नागरिकांनी परिसरातील आरोग्य सेवेवर समाधानी नसल्याचे स्पष्ट केले. परिसरातील आरोग्य सुविधेवर सर्वाधिक असमाधानी नागरिक उत्तर नागपुरातील आशीनगर झोनमधील असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. उत्तर नागपूर विकासाबाबत मागे असल्याची नेहमीच ओरड होत असते. अनेकदा नगरसेवकांकडूनही उत्तर नागपूरबाबत महापालिका उदासिन असल्याचा आरोपही केला जातो. उत्तर नागपुरातील आशीनगर झोनमधील 57 टक्के नागरिकांनी आरोग्य सेवेवर समाधान व्यक्त केले. मात्र, 43 टक्के नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करणाऱ्या नागरिकांत आशीनगर झोनमधील अतिशय मागास असलेला गरीब नवाजनगर प्रभाग, इंदोरा, लष्करीबाग, महेंद्रनगर, नारा, नारी या प्रभागांचा समावेश आहे. आरोग्य सेवेवर समाधान व्यक्त करणारे सर्वाधिक नागरिक लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली झोनमध्ये दिसून येत आहे. या झोनमध्ये रामदासपेठ, धंतोली, सक्करदरासारखे खाजगी रुग्णालयांची गर्दी असलेल्या परिसराचा समावेश होतो.
बॉक्‍स...
झोन स्तरावर आरोग्य सुविधेबाबत नागरिकांचा कल

झोन            समाधानी     असमाधानी 
  • लक्ष्मीानगर 77 टक्के 23 टक्के 
  • धरमपेठ     69 टक्के 31 टक्के 
  • हनुमाननगर 73 टक्के 27 टक्के 
  • धंतोली 70 टक्के 30 टक्के 
  • नेहरूनगर 64 टक्के 36 टक्के 
  • गांधीबाग 76 टक्के 24 टक्के 
  • सतरंजीपुरा 74 टक्के 26 टक्के 
  • लकडगंज 64 टक्के 36 टक्के 
  • आशीनगर 57 टक्के 43 टक्के 
  • मंगळवारी 70 टक्के 30 टक्के 

स्मार्ट सिटीत अपेक्षित आरोग्य सुविधा
  1. - 100 टक्के घरांना टेलिमेडिसिन सेवा. 
  2. - अपघात किंवा आपातकालीन स्थितीत नागरिकांना अर्ध्या तासांत वैद्यकीय सुविधा. 
  3. - 15 घरांमागे एक रुग्णालय. 
  4. - 1 लाख लोकसंख्येमागे एक नर्सिंग होम, लहान मुलांचे रुग्णालय, प्रसुतीगृह. 
  5. - 1 लाख लोकसंख्येमागे 200 बेडचे मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल. 
  6. - 1 लाख लोकसंख्येमागे 200 बेडचे स्पेशलिटी हॉस्पिटल. 
  7. - 1 लाख लोकसंख्येमागे 500 बेडचे सार्वजनिक रुग्णालय. 
  8. - 50 हजार लोकसंख्येमागे एक रोग निदान केंद्र. 
  9. - 50 हजार लोकसंख्येमागे कुटुंब कल्याण केंद्र.
 
Blogger Templates