19 Oct 2015

"स्मार्ट सिटी'साठी नागपूरकरांत संचारला उत्साह


घरोघरी मनपा कर्मचारी : महापालिका-डीसीएफच्या उपक्रमाचे कौतुक


सकाळ वृत्तसेवा
नागपूर - "स्मार्ट सिटी'साठी नागपूरकरांचे मत परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे महापालिका व डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनने (डीसीएफ) पाच लाख घरांपर्यंत पोहोचण्यासाठी मागील आवठड्यात "स्मार्ट सिटी-नागरिकांचा सहभाग अभियान' सुरू केले. या अभियानाने नागरिकांच्या उत्साहात भर पडली आहे. घरी येणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना फॉर्म भरून देण्यासाठी उत्स्फूर्तपणे नागरिक पुढे येत आहेत. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणप्रेमी, राजकीय संघटनांनी मनपा-डीसीएफच्या अभियानाचे कौतुक केले. शहरात स्मार्ट सिटीसाठी वातावरणनिर्मिती झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
संत्रानगरीला "स्मार्ट सिटी' करण्याच्या प्रक्रियेत महापालिकेने नागपूरकरांचे मत घेण्यासाठी शहरातील पाच लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. यासाठी महापालिकेने राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला यश मिळवून देणाऱ्या "सकाळ माध्यम समूहा'च्या "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'सोबत करार केला. करार होताच महापालिका व डीसीएफने 13 ऑक्‍टोबरपासून शहरात स्मार्ट सिटी-नागरिकांचा सहभाग अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत महापालिकेचे कर्मचारी दररोज नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन एक फॉर्म भरून घेत आहेत. या फॉर्ममध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने स्वतःची माहिती भरून देत असून "माझ्या मनातलं नागपूर' या कॉलममध्ये शहर कसे असावे, याबाबत सल्ला देत आहेत. एवढेच नव्हे तर शहराची सध्याची अवस्था कशी आहे, यावरही नागरिक स्पष्टपणे मत नोंदविताना दिसून येत आहेत. या मोहिमेसाठी महापालिकेने 1200 कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले असून, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारीही स्वयंस्फूर्तीने फॉर्म भरून घेण्याच्या कामात योगदान देत आहेत. त्यामुळे शहरात "स्मार्ट' चळवळ उभी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूर स्मार्ट सिटी-नागरिकांचा सहभाग अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या फॉर्ममध्ये नागरिकांनी नोंदविलेल्या मतांचे वर्गीकरण, समीक्षण करून "डीसीएफ' नागपूर शहराच्या उत्कृष्ट आराखड्यासाठी परिश्रम घेणार आहे. समीक्षणावर आधारित अहवाल क्रिसिल कंपनीला देण्यात येणार आहे. एकूणच "डीसीएफ'कडून स्मार्ट सिटीसाठी नागरिकांची मानसिकता तयार करण्याचे काम केले जाणार आहे.


दीडशेवर तज्ज्ञांनी दिल्या सूचना
महापालिका व डीसीएफने 12 विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांसोबत महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दररोज चर्चासत्र आयोजित करण्यात आले. गेल्या आठवड्याभरात ई-गव्हर्नन्स व डिजिटलायझेशन, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व पर्यावरण, आरोग्य, पाणी, सुरक्षा व आणीबाणी स्थिती व्यवस्थपान, शिक्षण, वीज, पायाभूत सुविधा आणि उत्पन्न या दहा क्षेत्रांतील जवळपास दीडशेवर तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. या तज्ज्ञांनी स्मार्ट सिटीसाठी अनेक अभिनव उपाय सुचिवले. सोमवारी(ता. 19) सकाळी 10 वाजता निवारा तर दुपारी 3 वाजता पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे.

स्मार्ट वॉर रूममध्ये हालचालींना वेग

स्मार्ट सिटीसाठी महापालिकेत तयार करण्यात आलेल्या "स्मार्ट वॉर रूम'मध्ये हालचालींना वेग आला आहे. "डीसीएफ'चे पुण्यातून आलेले पथक नागरिकांकडून भरून घेण्यात येणाऱ्या फॉर्मचे तासातासांनी अद्ययावत स्थितीची माहिती घेत आहे. मनपा कर्मचाऱ्यांचे नागरिकांसोबत फॉर्म भरून घेतेवेळीचे फोटोही स्मार्ट वॉर रूममध्ये येत आहेत. स्मार्ट सिटीसाठी फॉर्म भरून घेताना नागरिकांसोबत सौहार्दपूर्ण वागणुकीचा कर्मचाऱ्याच्या उत्तम फोटोला पुरस्कार घोषित केल्याने कर्मचारीही प्रकाशझोतात येणार आहेत. "स्मार्ट वॉर रूम' डीसीएफच्या पथकासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे स्मार्ट सिटीसाठी कामे करताना दिसून येत आहेत.

 
Blogger Templates