सकाळ वृत्तसेवा नागपूर,
ता. 7 : शिक्षण हब म्हणून नागपूरची प्रतिमा समोर येत आहे. गेल्या वर्षभरात पदार्पण
करणाऱ्या नामवंत शैक्षणिक संस्थांमुळे नागपूरचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
आयआयएम, ट्रिपल आयटी, विधी विद्यापीठ, नायपर, एम्स आदी नामवंत संस्थांमुळे शिक्षणात
देशाच्या नकाशावर नागपूरचे स्थान उंचावले आहे. मिहान आणि सेझच्यादृष्टीने नवे
अभ्यासक्रमही विद्यापीठाने सुरू केले आहेत. शहराला "स्मार्ट सिटी' करण्यासाठी
शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी शासन, पालक, विद्यार्थी,
शिक्षक आणि संस्थांची सांगड घालून शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याची नितांत
आवश्यकता आहे. त्यातूनच शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्रित करून त्यांच्याकडून
स्मार्ट सिटीत "स्मार्ट' शिक्षण कसे असावे यासाठी संस्कार, मूलभूत शिक्षण, पायाभूत
शिक्षण मजबूत करणे, विविध अभ्यासक्रमांची जोड देणे आदी अनेक सूचना "सकाळ'च्या
व्यासपीठावर शिक्षक, पालक, संस्थाचालक, विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी, शालेय शिक्षण
विभागातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक संघटना प्रतिनिधींनी
दिल्यात.स्मार्ट शिक्षण ही काळाची गरज आहे. आधुनिक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत हायटेक शिक्षणाची सोय शाळांमध्ये मिळावी, अशी पालकांची अपेक्षा असते. शाळांनाही त्या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे. शिक्षण हा संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे. त्यातून सुदृढ समाजाच्या निर्मितीची कल्पना साकार होऊ शकते. त्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून त्याद्वारे सशक्त विद्यार्थी तयार करण्याची जबाबदारी संस्था आणि शिक्षकांवर आहे. या व्यवस्थेचा कणा विद्यार्थी असला तरी शिक्षकांवर त्याला घडविण्याची खरी जबाबदारी आहे. ती जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळण्यासाठी शिक्षकांनी स्वत:ला अपग्रेड करावे. केवळ नोकरीसाठी शिक्षण न घेता, सर्वांगीण विकासासाठी शिक्षण घेण्याचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे काम आता करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा, ई-लर्निंग, ऑनलाइन शिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण, नॉलेज अपग्रेडेशन आदींवर भर द्यावा लागेल. एवढेच नव्हे तर कृषी, मानसशास्त्र, संस्कृती, संस्कार रुजविण्यासाठी मूल्यशिक्षणही रुजवावे लागेल. त्यातूनच "स्मार्ट सिटी'ची संकल्पना साकार होईल.
"सकाळ'च्या "इंडियाज हार्ट, नागपूर स्मार्ट' अभियानांतर्गत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शासनाचे अधिकारी, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर "सकाळ'च्या शहर कार्यालयात चर्चा करून मते मांडली. या चर्चेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, विभागीय शिक्षण सहायक संचालक डॉ. शिवलिंग पटवे, नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. अनिल ढगे, व्यवस्थापन महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. आमिषी अरोरा, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र झाडे, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय शेंडे, साउथ पॉइन्ट स्कूलचे संचालक देवेंद्र दस्तुरे, अभ्यास समितीच्या सदस्या प्रा. प्रज्ञा देशपांडे, मेजर हेमंत जकाते शाळेचे प्राचार्य मधुसूदन मुडे, कमला नेहरू महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रदीप दहीकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर मंत्री गौरव हरडे यांचा समावेश होता.
शिक्षणाच्या हक्कासोबत खरे शिक्षण मिळावे
शिक्षणातून नोकरी मिळविणे हे उद्दिष्ट न ठरविता समाजासाठी चांगले नागरिक तयार करणे हे असावे. त्यासाठी शिक्षणाच्या हक्कासोबतच खरे शिक्षणही त्याला मिळावे. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने आयआयएम, विधी विद्यापीठ, ट्रिपल आयटी, नायपर, एम्स आणि विविध शैक्षणिक संस्था येऊ घातल्या आहेत. मिहानला बुस्ट मिळत आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील शिक्षणाचा दर्जा वाढत आहे. आता स्किल्डबेस शिक्षणाकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. याला संस्कृतीची जोड देणे गरजेचे आहे. त्यातून सुसंस्कृत विद्यार्थी घडविता येईल. विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे. शासनही त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता संस्था भरपूर असून गुणवत्तेचा विचार खऱ्या अर्थाने व्हायला हवा.- डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
मूलभूत शिक्षणाकडे लक्ष द्यावे
गुणवत्तापूर्ण शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे. शिक्षण देताना सात घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. यात शिक्षक, विद्यार्थी, शासन, संस्था, संस्थाचालक, समाज आणि पालक यांचा समावेश आहे. त्यांच्याद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार व्हायला हवा. मात्र दुर्दैवाने नोकरीसाठी शिक्षण हेच उद्दिष्ट समोर ठेवून शिकविण्यात येते. त्यामुळे गुणवत्ता आणि संस्कार मागे पडतात. शिक्षण घेतल्यावर ते उद्दिष्ट साध्य न झाल्यास त्याचा समाजावर वाईट परिणाम होताना दिसून येतो. आज शिक्षणाची साधने बदलली आहेत. ई-लर्निंग ही नवी शिक्षण पद्धती शाळांमध्ये रुजत आहे. मात्र शहरातील शाळांमधील मुलांना त्याचा फायदा होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तो होताना दिसून येत नाही. तंत्रज्ञान हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचल्यास गुणवत्ता निश्चित वाढेल. व्यावसायिक शिक्षणाकडेच अधिक लक्ष न देता, मूलभूत शिक्षणाकडेही अधिकाधिक कल देण्यात यावा.- डॉ. अनिल ढगे
सचिव, नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटना
ऑनलाइन शिक्षणावर भर असावा
स्मार्ट सिटी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, सोयी-सुविधा एवढेच महत्त्वाचे घटक नसून, उच्चस्तरावरील शैक्षणिक सुविधांची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी त्या सोयी-सुविधांची गुणवत्ता तपासावी लागेल. दिल्लीत ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी इंटरनेट सुविधा लावण्याचा विचार होत आहे, त्याचप्रमाणे इतरही शहरांमध्ये ही व्यवस्था व्हावी. यातून "ऑनलाइन एज्युकेशन' ही संकल्पना रुजण्यास मदत होईल. हे करताना केवळ "गुगल'चाच वापर करायचा नसून, इतरही स्रोत वापरावे लागतील. यासाठी शालेय ते उच्च शिक्षणामध्ये मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश करावा लागेल. मात्र हे शिक्षण मिळविताना ते किफायतशीर असावे.- डॉ. आमिषी अरोरा
संचालिका, सीआयएमएआरडी
शिक्षणात सर्वांनी वाटा उचलावा
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सर्व जबाबदारी शासनाची आहे, त्यासाठी शासनाने सर्व सुविधा-सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असा समज प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा असतो. मात्र शिक्षणाच्या विकासात केवळ शासनाने वाटा उचलून चालणार नसून त्याची जबाबदारी ही समाजातील सर्व घटकांची आहे. आज शंभर टक्के शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचे काम शासन करीत आहे. त्यासाठी खासगी संस्थांनीही हातभार लावण्याची गरज आहे. जिथे शंभर विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक आहे, त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देता येणे शक्य नाही. त्यामुळे चांगल्या आणि योग्य शिक्षकांची निवड करणे हेसुद्धा जबाबदारीचे काम झाले आहे. याशिवाय शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना विविध भाषा, मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे.- डॉ. शिवलिंग पटवे
सहायक संचालक, विभागीय शिक्षण विभाग
गुणवत्तेसोबत संस्कार रुजावेत
स्मार्ट सिटीचा विचार करताना भौतिक सुविधा आणि गुणवत्तेचा विचार महत्त्वाचा आहे. मात्र आज विद्यार्थ्यांमधील संस्कार आणि नैतिकता हरवून बसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये गुणवत्तेसोबत संस्कार रुजविण्यासाठी प्रयत्न व्हावा. मुलांसाठी आज कुटुंबातील व्यक्तींकडे वेळ नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत नाही. ते शेवटपर्यंत कसे झिरपेल याचा विचार व्हायला हवा. संस्कारित पिढी ही स्मार्ट आणि सुसंस्कृत होईल. त्यातून गुणवत्ता आणि सर्वांना शिक्षणाची कल्पना साकार करण्यासाठी मदत होईल. पहिली ते बारावी आणि पदवीची सांगड घालून अभ्यासक्रम तयार करता येणे शक्य आहे.- प्रज्ञा देशपांडे
अभ्यास समिती सदस्य, राज्य शासन
प्रात्यक्षिक शिक्षणावर अधिक भर द्यावा
पांरपरिक शिक्षण पद्धतीमध्ये पुस्तकी ज्ञानावर शिक्षक अधिक भर देताना दिसतात. पदवीपासूनच्या शिक्षणामध्येही तीच परंपरा रुजविल्या गेली. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिल्या जातो. हीच पद्धत शालेय आणि पारंपरिक अभ्यासक्रमांमध्येही रुजविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी शिक्षकांना सक्तीचे प्रशिक्षण मिळावे. पारंपरिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांसाठी "प्लेसमेंट' शिबिर होताना दिसून येत नाही. केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच ते घेतल्या जाते. ही पद्धत पारंपरिक अभ्यासक्रमातही आणावी. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थीही "स्मार्ट' होतील. शिवाय शिक्षक, संस्था आणि विद्यार्थ्यांचे सातत्याने मूल्यांकन करण्याची गरज आहे.- डॉ. प्रदीप दहीकर
उपप्राचार्य, कमला नेहरू महाविद्यालय
चांगले शिक्षण मिळावे
प्रत्येक वेळी नोकरीसाठी शिक्षण या संकल्पनेतून शिक्षण पद्धती काम करताना दिसून येते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट डॉक्टर, अभियंता आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हेच असते. आज अनेक उच्चशिक्षित मुले विदेशात नोकरी करीत आहेत. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी होताना दिसून येत नाही. दुसरीकडे चांगले शिक्षण हे केवळ श्रीमंतांसाठीच असल्याचे दिसते. श्रीमंतांच्या मुलांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचा अधिकार असल्याचे दिसते. याचे कारण शिक्षण ही सेवा नसून तो व्यवसाय झाला आहे. तेव्हा चांगले शिक्षण स्मार्ट सिटीतून मिळावे हे पहिले उद्दिष्ट ठेवण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल घडवून आणावा. त्यात समाजाप्रती काही तरी करण्यासाठी विद्यार्थ्याला प्रोत्साहित करणाऱ्या ज्ञानाचा समावेश असावा. पालक आणि शिक्षकांसह प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी.- गौरव हरडे
महानगर महामंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
मूलभूत शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे
शिक्षणाचा विकास होत असताना, अनेकदा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोयी-सुविधांकडे अधिक लक्ष देण्यात येते. मात्र, शाळांमध्ये सोयी-सुविधा वाढविताना मूलभूत शिक्षणाला बगल देण्याचे काम केल्या जात आहे. आजही अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे दिसते. त्यामुळे आवश्यक त्या मूलभूत शिक्षणाकडे शासन, शाळा आणि पालकांकडून दुर्लक्ष केल्या जाते. शाळांमध्ये मैदानी खेळ, संगीत आणि इतर कौशल्यावर आधारित उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यातून विद्यार्थी तणावमुक्त राहतील. शिक्षणाचा पाया मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यात शाळा, शिक्षक आणि पालकांनी संयुक्तरित्या जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.- राजेंद्र झाडे
विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती
संस्थाचालकांनी आपली जबाबदारी ओळखावी
शिक्षण हे व्रत समजून काम करण्याची नितांत आवश्यक आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा संस्थाचालक आहे. शिक्षण संस्था चालवीत असताना, त्यातून समाजातील एक चांगला नागरिक घडावा, त्यातून संस्थेचे नाव मोठे व्हावे, हा हेतू प्रत्येक संस्थाचालकाने ठेवावा. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक वेळी प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही जबाबदारी संस्थाचालकांनी समजल्यास शाळा आणि विद्यार्थी दोन्ही स्मार्ट होतील. त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल. तसेच शहर स्मार्ट व्हायला मदत होईल.- मधुसूदन मुडे
मुख्याध्यापक, मेजर हेमंत जकाते हायस्कूल
शासनाकडून अपेक्षा नकोच
शिक्षणाचा भार शासनाने उचलावा, असे प्रत्येक वेळी बोलले जाते. मात्र शिक्षणाचा सर्वव्यापी प्रसार करण्यासाठी प्रत्येक वेळी शासनाकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. शाळांमध्ये विद्यार्थी हा "पर्सनॅलिटी प्रॉडक्ट' असून त्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना स्मार्ट करण्याची गरज आहे. ई-लर्निंग, थ्रीडी इफेक्ट आदी सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना "स्मार्ट' करण्यावर शाळांनी भर द्यावा. यासाठी संस्थाचालकांनी पुढाकार घ्यावा. यापूर्वीच शासनाने शिक्षणाचा अधिकार कायद्याद्वारे उच्चभ्रू शाळांमध्ये गरिबांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय विद्यार्थ्यांना सुदृढ आणि सर्वगुणसंपन्न करण्यासाठी शाळांनी प्रयत्न करावा.- देवेंद्र दस्तुरे
संचालक, साउथ पॉइन्ट स्कूल
शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश व्हावा
भारत देश कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो. देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, असे म्हटल्या जाते. मात्र प्राथमिक शिक्षणापासून कृषी विषयाबाबत माहिती दिल्या जात नाही. वेगळ्या पदवी अभ्यासक्रमाने कृषी संस्कृती समाजात रुजणार नाही. त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून कृषी विषयाचा समावेश असावा. शिवाय मानसिक आणि शारीरिक सदृढता जोपासण्यासाठी 360 डिग्री म्हणजे सर्वांगीण विकास करण्याची आवश्यकता आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या त्रिकोणाला समृद्ध करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणही देण्याची आवश्यकता आहे.- डॉ. अभय शेंडे
प्राचार्य, प्रियदर्शनी जे. एल. अभियांत्रिकी महाविद्यालय



