नागपूर - शहरात चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली. पार्किंगला जागा अपुरी पडू लागली. दुचाकींचा वेग वाढतोय आणि वाहतुकीचे नियम तोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. प्रगती होत असताना भान हरपत चालले आहे. अशा परिस्थितीत "स्मार्ट सिटी‘च्या निमित्ताने आणखी नव्या सुविधा आणि उपाययोजना करणे अत्यंत निकडीचे आहे. पण त्यापूर्वी वाहतुकीचे नियम पाळून स्वतः "स्मार्ट‘ होण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची आहे, असा सूर आजच्या चर्चेतून निघाला.
"सकाळ‘च्या "इंडियाज हार्ट, नागपूर स्मार्ट‘ या अभियानांतर्गत वाहतूक व्यवस्थापनातील तज्ज्ञ, कार्यकर्ते व वाहतूक पोलिसांच्या प्रतिनिधींना आज "स्मार्ट चर्चे‘साठी आमंत्रित केले होते. "सकाळ‘च्या रामदासपेठ येथील कार्यालयात झालेल्या या चर्चेसाठी वाहतूक पोलिस निरीक्षक एस. बी. पांडे, वाहतूक शाखा व्यवस्थापनाचे पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे तेजिंदरसिंग रेणू, जीवन सुरक्षा प्रल्पाचे राजू वाघ, वंश निमयचे व्यवस्थापक अजिंक्य पारोळकर, जयंत देशमुख ऑटोचालक संघटनेचे पदाधिकारी विलास भालेराव, जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, श्रीकांत गुडधे आणि सामाजिक कार्यकर्ते अभिषेक चिमणकर सहभागी झाले. सिग्नल तोडल्यानंतर ट्रॅफिक पोलिसाने रोखले की आपण विरोधाची किंवा अरेरावीची भूमिका घेतो. पण आपल्याजवळ सगळी कागदपत्रे आणि परवाना असेल, तर अशी वेळच येणार नाही. रस्त्यावर खड्डे असतील तर ती महापालिकेची जबाबदारी आहे, हे समजून घेण्याइतपत जागरूकही आपण नसतो. एवढेच कशाला, तर मुलाला शाळेत सोडून देणारे वडील बिनधास्त सिग्नल तोडून पुढे जातात. कुठलेही नियम अधिक कठोर होण्यापूर्वी ते आहे त्या स्थितीत पाळले तर त्याची तीव्रता जाणवत नाही, असा सूरही निघाला. त्याचवेळी ऑटोचालकांचे चौक व्यापून टाकणे, विनापरवाना वाहतूक करणे, रस्त्यावरच गाडी पार्क करणे या समस्यांमधून पहिले बाहेर पडावे लागेल. "स्मार्ट‘ वाहतुकीच्या दृष्टीने ते पहिले पाऊल असेल, असाही विचार मांडण्यात आला.
स्कूलबस बंधनकारक केल्यास प्रदूषणही टळेल
नागपूर - शहरात 12 लाख वाहने आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या वापराने यातील निम्मीही कमी झाल्यास रस्त्यांवरील गर्दी आणि अपघाताचे प्रमाण कमी होऊन सुरक्षितता निर्माण होईल. बससेवेचा वापर वाढल्यास पैशाचा अपव्यय टळेल तसेच इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणावरही नियंत्रण मिळविता येईल. यासाठी नागरिकांत जनजागृती करण्याची गरज आज वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. "सकाळ‘च्या "इंडियाज हार्ट, नागपूर स्मार्ट‘ या मोहिमेअंतर्गत शहर कार्यालयात झालेल्या चर्चासत्रात वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक एस. बी. पांडे, वाहतूक शाखा व्यवस्थापनचे पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे तेजिंदरसिंग रेणू, जीवन सुरक्षा प्रकल्पाचे राजू वाघ, स्टार बसचे व्यवस्थापन असलेल्या वंश निमयचे व्यवस्थापक अजिंक्य पारोळकर, जयंत देशमुख, ऑटोचालक संघटनेचे पदाधिकारी विलास भालेराव, जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, श्रीकांत गुडधे, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक चिमणकर सहभागी झाले होते. चर्चेत उद्दामपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणाईवर ताशेरे ओढतानाच पालकांनीही पाल्यांना योग्य वयात वाहने घेऊन देण्याची जबाबदारी समजल्यास शहरातील वाहतूक "स्मार्ट‘ होईल, असे नमूद केले.स्कूलबस बंधनकारक करावी
वर्षभरात 50 हजार वाहनचालकांकडून सिग्नल तोडल्याप्रकरणी जवळपास 5 कोटी रुपये दंड वसूल केला जातो. जनतेचा हा पैसा वाचवायचा असेल तर चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एका चौकात सीसीटीव्ही लावण्याचा खर्च एक कोटी आहे. चालकांनी नियम पाळत वाहन चालविली तर शासनाचा हा खर्चही वाचू शकेल. "रोड ट्री‘ किंवा रस्त्यावर गोलाकार आकारात सौंदर्यीकरण केल्यास वाहतुकीचा मार्ग मोकळा होईल. सगळेजण दंड भरण्यास तयार असतात; पण नियम पाळण्याची कुणाचीही तयारी नसते. त्यामुळे वाहनचालकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये स्कूलबस बंधनकारक करण्यात यावी. त्यामुळे जवळपास 40 हजार विद्यार्थी दुचाकीने कॉलेजमध्ये येणार नाही. परिणामी प्रदूषणही टळेल आणि रस्त्यांवरील गर्दीही कमी होईल. "स्मार्ट सीटी‘साठी पर्यावरण आणि वाहतूक सुधारणा हे ध्येय महत्त्वाचे आहे.
- एस. बी. पांडे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा
शहरातील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण घालावे लागेल. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊ शकेल. रस्त्यावर मोठमोठे फ्लायओव्हर बांधल्या गेल्यास रस्त्यावरील वाहनचालकांची संख्या कमी होईल. प्रवासी बसला प्रोत्साहन द्यावे लागेल. "सकाळ‘ने पुणे शहरात "बस डे‘ उपक्रम राबवून अनेकांसमोर आदर्श ठेवला. तशाच प्रकारच्या अभियानाची नागपुरातसुद्धा गरज आहे. शहर प्रवासी बससेवा खिळखिळी न होऊ देता जनतेने त्याला सहकार्य करण्याची गरज आहे. एक बस 60 प्रवासी वाहून नेते. एक बस केवळ 350 चौ. फूट जागा व्यापते. एक बस रस्त्यावरील 60 दुचाकींचा वा दहा कारचा भार हलका करते. शहरातील 12 लाख व्यक्ती वाहन चालवितात. यापैकी 50 टक्के लोकांनी सार्वजनिक वाहनाचा वापर केल्यास गर्दी, अपघाताचे प्रमाण आणि सुरक्षितता निर्माण होईल. बससेवेचा वापर वाढल्यास पैसाचा अपव्यय वाचेल आणि लोकांचे उत्पन्नात वाढ होऊन "स्मार्ट सिटी‘साठी पोषक वातावरण निर्माण होईल.
- अजिंक्य पारोळकर, जयंत देशमुख, वंश निमय
शिक्षणात वाहतूक नियम विषय असावा
बेशिस्त वाहतूक जीवनासाठी नेहमीच घातक आहे. वाहनाचे नुकसान पैशाने भरून निघते. मात्र, अपघातात अवयव निकामी झाल्यास आयुष्यभराचे नुकसान होते. पालकांनी पाल्यांना वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रबोधन करावे. शिक्षण संस्थाचालकांनीही शाळेत वाहतूक नियमांबाबत शिक्षण द्यावे. वाहतुकीच्या नियमांचा "बेसीक एज्युकेशन‘मध्ये समावेश करावा. "नैतिक विज्ञान‘ म्हणून वाहतूक नियमांचा अभ्यास व्हावा. वाहनचालकांनी गतीच्या स्पर्धेत पडण्याऐवजी संयम बाळगावा. सर्वच वाहनधारकांना दोष देणे योग्य नाही. मात्र, काही वाहनधारक वाहतूक पोलिसांच्या संयमाचा अंत पाहतात. त्यांना दंड होण्याची गरज आहे. त्यांच्यामुळे इतर वाहनधारकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे चित्र बदलण्यासाठी चालकांनी वाहनाची कागदपत्रे, परवाना सोबत ठेवावा. यामुळे पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोपही होणार नाहीत आणि वाहतूकही सुरळीत होईल. नियम तोडणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचा टक्का सर्वाधिक आहे. त्यांच्या मानसिकतेत बदल घडल्यास "स्मार्ट सिटी‘चे स्वप्न पूर्ण होईल.
- सत्यवीर बंडीवार, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा (व्यवस्थापन)
अपघात टाळणे वाहनचालकांच्याच हाती
अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी जीवन सुरक्षा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात युवकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तातडीची मदत करण्यात येते. वाहनांमध्ये बिघाड झाल्याने होणाऱ्या अपघाताची संख्या अत्यल्प आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. अशा प्रकारचे अपघात टाळणे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहेत. ते थांबविणे आपल्या हाती आहे. अपघातमुक्त शहर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा, वाहनचालकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. वाहतुकीबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा लागेल. पालकांनी मुलांना योग्य वयात वाहन घेऊन दिले तसेच हेल्मेट आणि परवाना काढून दिला तर पाल्यसुद्धा आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडेल. शहरातील खड्डे आणि वाहतूक व्यवस्थेला दोष देत बसण्यात अर्थ नाही. जीवनाविषयी गंभीर बनायचे असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी. रस्ता सुरक्षा ही जबाबदारी केवळ पोलिसांची नसून प्रत्येकाची आहे. वृत्तपत्रांनी अपघातांच्या बातम्यांमध्ये अपघाताचे कारण प्रकाशित करावे, जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती होईल.
- राजू वाघ, अध्यक्ष, जीवन सुरक्षा प्रकल्प
खासगी वाहनांवर मर्यादा हवी
शहराच्या वाहतुकीला "स्मार्ट लूक‘ द्यायचा असेल तर सर्वांत पहिले सार्वजनिक वाहनाने प्रवास सुरू केला पाहिजे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकींची वर्दळ आपोआप कमी होईल. राजधानी दिल्लीत खासगी वाहनांचे आयुष्य ठरलेले आहे. एखादे खासगी वाहन बाळगायचे असेल तर त्याची मर्यादा ठरलेली आहे. तोच नियम नागपुरात लागू करावा लागेल म्हणजे लोक आपोआप सार्वजनिक वाहनांचा वापर करतील. सिग्नल तोडून जाणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व चौकांमधील सिग्नल्सचा समन्वय आवश्यक आहे. विशेषतः सिग्नल तोडणाऱ्यांना "सोशल मीडिया‘च्या माध्यमातून "एक्स्पोज‘ करता येईल. त्यासाठी वाहतूक विभागाने एखादा "व्हॉट्सऍप‘ क्रमांक उपलब्ध करून दिला तर त्यांना सिग्नल तोडणाऱ्याची माहिती देणे सोपे होईल. शहर नियोजनाच्या जुन्या आराखड्यात "पार्किंग‘चा विचार झाला नव्हता. पण, "स्मार्ट सिटी‘च्या नियोजनात तो आवर्जुन व्हायला हवा. लॉन आणि बगिच्यांच्या आजूबाजूला असलेली मोकळी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यायला हवी. जे पालक मुलांना शाळेत सोडून देताना स्वतःच सिग्नल तोडतात, त्यांनी आपण मुलांना कुठला आदर्श देतोय, याचा विचार करायला हवा.
- तेजिंदरसिंह रेणू, सचिव, विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशन
पालकांनीच जबाबदारी घ्यावी
वाहतुकीच्या बाबतीत युवकांनी स्वतःच नियम पाळायचे ठरवले तर भ्रष्टाचार कमी होईल. बहुतांश प्रमाणात तरुण मुले-मुलीच सिग्नल तोडतात. त्यांच्याच अपघाताचे प्रमाणही खूप आहे. त्याचवेळी पोलिसांचे भयही त्यांना आहे. तरीही सिग्नल तोडून पळण्याचा मोह त्यांना आवरत नाही. पोलिसांना घाबरायचे नसेल तर कागदपत्रे जवळ ठेवा, परवाना बाळगा. यामध्ये पालकांची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरू शकते. पालकांनी मुलांना लहानपणापासून संस्कार लावताना वाहतुकीच्या नियमांचीही जाण करून द्यायला हवी. सुरुवातीपासून याचे महत्त्व मुलांमध्ये राहिले तर त्यांच्या हाती गाडी आल्यावर आपोआप नियंत्रण असेल. यासाठी शाळांमधून मानवी मूल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे. नियम तोडण्यासाठीच असतात हा गैरसमज मुलांमध्ये निर्माण होण्याऐवजी त्याला नियमांचे महत्त्व शाळेतच शिकायला मिळाले तर वाहतूक सुकर होईल.
- अभिषेक चिमणकर, सामाजिक कार्यकर्ते
कारवाईची मोहीम राबवा
"स्मार्ट सिटी‘मध्ये ऑटोरिक्षाचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. सध्याची स्थिती बघता ज्या ऑटोचालकांडे परवाने आहेत, त्यांना दररोज दोनशे रुपये कमावणे अवघड होऊन बसले आहे. ज्यांच्याकडे परवाने नाहीत त्यांची व्यवस्थेच्या कृपेने जोरदार कमाई सुरू आहे. सर्वांत पहिले वाहतूक पोलिसांनी पंधरा दिवसांची कारवाई मोहीम राबवून ऑटोरिक्षाचालकांना सुधारण्याचा वसा घेतला पाहिजे. सर्वांचे परवाने तपासून बघायला हवेत. या संदर्भात ऑटोरिक्षाचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे. पण, त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काही उपाय सुचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑटोरिक्षाचालकांच्या चुका होत असतील तर त्यांनी कुठे सुधारणा करायच्या हेदेखील कळायला हवे.
- विलास भालेराव, पदाधिकारी, ऑटोचालक संघटना.
सिग्नलवर सीसीटीव्ही व ई-चालान
शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांमधील "चलता है‘ मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. शहरातील विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यात अधिक आहेत. वाहन चालक, विद्यार्थी, पालक या सर्वांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता महत्त्वाची आहे. सिग्नल तोडणाऱ्यांची सवय मोडण्यासाठी मोठ्या मोहिमेची आवश्यकता आहे. सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी व ई-चालानमार्फत कारवाई केल्यास वाहतूक नियमांविषयी धास्ती वाढेल. नियम तोडणाऱ्यांना गुन्ह्यासाठी शिक्षा होणेही आवश्यक आहे. सिग्नल तोडणाऱ्यांनाही इतर भौतिक सुविधांपासून वंचित ठेवले तर "स्मार्ट सिटी‘साठी आवश्यक वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढेल. शहरातील स्थानिक समस्यांवर कठोर निर्णयाची आवश्यकता आहे.
- श्रीकांत गुडधे, रवींद्र कासखेडीकर, जनआक्रोश



