केंद्र सरकारच्या "स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी नागपूरच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पालिका स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. एकीकडे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असताना "सकाळ माध्यम समूहा'ने शहरात अपेक्षित सुधारणांसाठी जनमानसाचा कल जाणून घेण्याचे पाऊल उचलले आहे. यासाठी "सकाळ'ने "इंडियाज हार्ट, नागपूर स्मार्ट' मोहीम सुरू केली असून, सामान्यांपासून ते तज्ज्ञांना त्यांच्या संकल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
नागपूरकरांना हे शहर कसे हवे आहे, शहराचा सर्वसमावेशक विकास व विस्तार कशा पद्धतीने व्हावा, दाटीवाटीच्या क्षेत्रासोबतच शहराच्या सीमेवरील वस्त्या कशा पद्धतीने राहण्यायोग्य होतील आदी प्रश्नांना केवळ हात घालून न थांबता त्यांची उकल करण्याच्या प्रयत्नास "सकाळ'ने प्रारंभ केला आहे. शहरातील झोन सभापतींच्या चर्चासत्राने या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. शहराची स्वतःची खास ओळख व संस्कृती जपली जावी, उत्तम व दर्जेदार शिक्षण सुविधा, सर्वांसाठी आरोग्य सुविधा, शहरातील मोकळ्या जागांचा सुयोग्य वापर, सर्वांसाठी निवारा, सक्षम वाहतूक व्यवस्था, तत्पर सरकारी सेवा, वीज, पुरेसा पाणीपुरवठा, हवेची शुद्धता व पर्यावरण, सांडपाणी व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आदी "स्मार्ट सिटी'अंतर्गत येणाऱ्या घटकांवर झोन सभापतींनी परखड व स्पष्ट मते व्यक्त केली. काही चांगल्या सूचनाही आल्यात.
चर्चेत गांधीबाग झोनच्या सभापती प्रभा जगनाडे, लकडगंज झोनच्या सभापती शीतल घरत, सतरंजीपुरा झोनचे सभापती रामदास गुडधे, लक्ष्मीनगर झोनच्या सभापती जयश्री वाडीभस्मे, धरमपेठ झोनच्या सभापती वर्षा ठाकरे, हनुमाननगरच्या झोन सभापती सारिका नांदुरकर, नेहरूनगर झोनच्या सभापती मनीषा कोठे यांनी नागपूर स्मार्ट कसे होईल, यावर विचारमंथन केले.
रस्त्याच्या दुतर्फा शोषखड्डे आणि दुभाजकावर तुळशीचे रोपटे
"सकाळ'च्या व्यासपीठावर झोन सभापतींनी सुचवले "स्मार्ट' उपाय
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 25 ः शहर खऱ्या अर्थाने "स्मार्ट' करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शोषखड्डे, दुभाजकांवर तुळशीचे रोपटे, दाटीवाटीच्या क्षेत्रात महापालिकेच्या पडीक व बंद शाळांच्या ठिकाणी उद्याने, आरोग्य केंद्रे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी पथदिवे, नद्यांना सुरक्षा भिंत, नदीच्या बाजूने सांडपाणी वाहून नेणारी मोठी नाली, प्रत्येक झोनमध्ये मोठे सभागृह, शहरात आणखी एक मोठे बसस्थानक, मल्टिस्टोरी पार्किंग आदी उपाय शहरातील झोन सभापतींनी सूचनांसह दिले. विशेष म्हणजे, दहापैकी आठ झोन सभापती महिला असून, त्यांनी शहराच्या प्रेमापोटी जबाबदारीच्या जाणिवेने काही अभिनव उपायही सुचवले.
1) हवेची शुद्धता व पर्यावरण
अ) महाल, गांधीबाग, टिमकी, भानखेडासारख्या दाट क्षेत्रात अगदी घराच्या पायरीपर्यंत सिमेंटीकरण झाले आले. त्यामुळे झाडे लावण्यास वाव नाही. जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे सिमेंट रस्त्यांच्या दुतर्फा शोषखड्डे आणि वृक्षलागवड करणे आवश्यक असल्याचे गांधीबाग-महाल झोनच्या सभापती प्रभा जगनाडे यांनी सांगितले.
ब) शोषखड्डे व वृक्षलागवडीमुळे शहराच्या वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असेही त्या म्हणाल्या. शहरात वाढत्या कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकांवर तुळशीचे रोपटे लावण्यात यावे, अशी संकल्पना हनुमाननगर झोनच्या सभापती सारिका नांदुरकर यांनी मांडली.
क) सर्व कार्यालये संगणकीय प्रणालीने जोडल्यास कागदाच्या वापरात घट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल, असे नेहरूनगर झोनच्या सभापती मनीषा कोठे म्हणाल्या.
ड) नव्यासह जुन्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा नियम नको, तर कृती हवी, अशी आग्रही भूमिका सारिका नांदुरकर आणि मनीषा कोठे यांनी मांडली.
2) सर्वांसाठी निवारा
अ) गांधीबाग झोनमधील टिमकी, भानखेडा, गोळीबार चौक परिसर तसेच नेहरूनगर झोनमध्ये तसेच लकडगंज झोनमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. येथील झोपडपट्टीधारकांना उत्तम घरे बांधून द्यावी, त्यासाठी स्थानिकांकडून परवडणारे शुल्क घ्यावे, अशी सूचना प्रभा जगनाडे, मनीषा कोठे, शीतल घरत यांनी केली.
ब) शहराचा उभा विकास झाला तर रस्ते रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होईल. यासाठी एफएसआय वाढवून द्यावा, जेणेकरून विकासाला निधीही करवाढीतून मिळेल, अशी सूचना मनीषा कोठे यांनी केली.
क) रहिवासी क्षेत्रात गरजूंना पायी जाऊन जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करता आली पाहिजे. सरकारी कार्यालयांपासून जवळच वसाहती असल्यास इंधनाचा खर्च वाचेल. शिवाय पर्यावरणाला लाभ होईल, असे सारिका नांदुरकर म्हणाल्या.
3) वीज
अ) शहरातील सर्व वीजवाहिन्या भूमिगत असाव्यात, अशी सूचना प्रभा जगनाडे, वर्षा ठाकरे, मनीषा कोठे यांनी केली. वीज वाहिन्यांसोबत टीव्हीच्या केबलचे जाळेही भूमिगत झाल्यास विद्रूपीकरण टळेल, असेही त्या म्हणाल्या.
ब) सौरऊर्जेवरील दिवे बंधनकारक झाल्यास प्रशासन व नागरिकांवरील आर्थिक बोजा कमी होईल, असे मत मनीषा कोठे यांनी व्यक्त केले.
4) सांडपाणी व्यवस्थापन
अ) महाल, इतवारी, मोमिनपुरा, जुनी मंगळवारी या भागात सांडपाणी वाहून नेणाऱ्या इंग्रजकालीन नाल्या आहेत. त्या जीर्ण झाल्या असून आता त्यांच्यावर भारही वाढला आहे. त्यामुळे त्या बदलण्याची गरज प्रभा जगनाडे, रामदार गुडधे यांनी व्यक्त केली. शहर सीमेवरील भागात अजूनही सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही, याकडे शीतल घरत यांनी लक्ष वेधले.
ब) शहरातील सर्व नाल्यांच्या बाजूला मोठी सिवेज लाइन टाकण्यात यावी, अशी सूचना जयश्री वाडीभस्मे, सारिका नांदुरकर यांनी केली. तर, नाल्यांमध्ये सांडपाणी सोडणे बंद करण्यासाठी गांभीर्याने पाऊल उचलण्याची गरज वर्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडणारे कारखाने शहराबाहेर करण्यात यावे, असेही नांदुरकरांनी नमूद केले.
5) मोकळ्या जागांचा योग्य वापर
दाटीवाटीच्या क्षेत्रात उद्याने, क्रीडांगणांचा अभाव आहे. त्यामुळे या क्षेत्रातील महापालिकेच्या जीर्ण व बंद शाळांची जागा मोकळी करून उद्यान, क्रीडांगणे करता येईल, असे प्रभा जगनाडे, शीतल घरत, रामदास गुडधे यांनी सांगितले.
6) घनकचरा व्यवस्थापन
शहरातील कचऱ्यावर समस्येवर बोट ठेवत सतरंजीपुरा झोनचे रामदास गुडधे यांनी नागरिकांवर दंडाची तरतूद करावी, अशी सूचना केली. दंडाची रक्कम मालमत्ता करात समाविष्ट करावी, असेही ते म्हणाले.
7) आरोग्य सुविधा
शहराच्या प्रत्येक भागात नागरिकांसाठी आरोग्य केंद्र हवे. रुग्णालये असलेला भाग शांतता क्षेत्र घोषित करावा, अशी सूचना शीतल घरत, सारिका नांदुरकर यांनी केली.
8) शिक्षण सुविधा
मराठी शाळांना प्रोत्साहन देण्याची गरज जगनाडे यांनी व्यक्त केली. जीर्ण शाळांचा उपयोग वाचनालयांसाठी करावा, असे रामदास गुडधे यांनी सुचविले. गरीब मुलांना निःशुल्क शिक्षणासाठी कठोर कायद्याची गरज घरत यांनी व्यक्त केली.
9) वाहतुकीत सुसूत्रता
प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी वेगळी लेन तसेच गर्दीच्या ठिकाणी मल्टिस्टोरी पार्किंग व्यवस्था असावी, असे वर्षा ठाकरे यांनी नमूद केले. भाजीबाजार, हॉकर्ससाठी वेगळे झोन असावे. तसेच फुटपाथ तयार करण्याची सूचना जयश्री वाडीभस्मे यांनी केली.



