25 Sept 2015

आराखड्यात दर्जेदार सुविधांवर भर

स्मार्ट सिटी : माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडून सूचना

राजेश प्रायकर ः सकाळ वृत्तसेवा
नागपूर- स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत राज्यातील शहरांची निवड व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडूनही प्रयत्न केले जात आहे. त्यांनी स्मार्ट सिटीच्या डीपीआरबाबत काही सूचना महापालिकेल्या केल्या. यात नागरिकांसोबत प्रशासनासाठी दर्जेदार, लाभदायक व समाधानकारक ठरणाऱ्या बाबींची नोंद करण्याच्या सूचनांचा समावेश आहेत. डीपीआर तयार करताना नागपूर शहराचे प्रतिबिंबही त्यात दिसणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले आहे. या सूचनांची यादी 19 सप्टेंबर रोजी महापालिकेत पोहोचली. त्यानुसार, नागपूर शहरासाठी क्रिसिल या सल्लागार कंपनीला स्मार्ट सिटीचा विकास आराखडा तयार करताना या सूचनांचा लाभ होणार आहे.

प्रमुख तीन मुद्द्यांवर डीपीआर 

माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने स्मार्ट सिटीसाठी डीपीआर तयार करताना प्रमुख तीन बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. 

  1. स्मार्ट सिटीसाठी क्षमता वाढविणे तसेच नागरी सुविधांचा दर्जा                                                   सुधारण्यासाठी नव्या संकल्पनांवर भर देणे. 
  2. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शहराचे योग्य व्यवस्थापन. 
  3. प्रशासनातील कामे करण्याची पद्धत वेगवान करणे. 

पर्यावरणाकडेही लक्ष देण्याची गरज
प्रमुख क्षेत्रावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. यात शिक्षण सुविधा, नागरी सुविधा, आरोग्य व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, शहर बससेवा, जमीन व गृहसंस्था व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, संशोधनासाठी सुविधायुक्त क्षेत्र, ऊर्जा, पथदिवे, पाणी व्यवस्थापन आदींचाही यात समावेश आहे. या क्षेत्रांकडे लक्ष देताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊ नये, यावर कटाक्ष ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 



ऊर्जा व वेळेची बचत
स्मार्ट सिटीत नागरिकांच्या वेळेचीही बचत व्हावी, यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी वेगवान प्रवासी सेवेवर भर देण्याच्या सूचना आहेत. याशिवाय ऊर्जा बचत केल्यास पर्यावरणालाही लाभ होईल, या दृष्टीने प्रयत्न करावा, असेही माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने सुचविले आहे.

             कसा असावा डीपीआर                 
स्मार्ट सिटीचा आराखडा केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. यावरच पहिल्या 20 शहरांत संत्रानगरीची निवड होईल. त्यामुळे आराखड्यात स्पष्ट दृष्टिकोन दिसणे आवश्‍यक आहे. स्मार्ट सिटी मिशनमधील प्रत्येक घटक नागरिकांसाठी कसा लाभदायक आणि प्रशासनासाठी कशाप्रकारे पैशाची बचत करणारा आहे, याचा स्पष्ट उल्लेख असावा, अशा सूचनाही महापालिकेला करण्यात आल्या आहेत. 
 
Blogger Templates