24 Sept 2015

"स्मार्ट कल्चर'साठी हवी कला अकादमी!

विस्कळीत सांस्कृतिक क्षेत्र यावे एका व्यासपीठावर
नितीन नायगांवकर - सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 23 ः स्मार्ट सिटीच्या निकषांमध्ये प्रामुख्याने आर्थिक आणि सामाजिक विकासाचा समावेश असला तरी त्या जोडीने "स्मार्ट कल्चर'चीही आवश्‍यकता आहेच. गुजरात आणि गोवा राज्य तसेच मुंबई-पुण्यासारख्या शहरांच्या धर्तीवर उपराजधानीत "विदर्भ कला अकादमी'ची स्थापन झाली तर संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्र एका छताखाली येईल आणि तीच "स्मार्ट कल्चर'ची नांदी असेल. 

झाडीपट्टी, दंढार, तमाशा या लोककलांसह नाट्य, संगीत, साहित्य या सर्व कलांमध्ये विदर्भ कुठेही मागे नाही. विदर्भाच्या मातीतील "स्मार्ट संस्कृती'ला शतकाहून अधिक मोठा इतिहास आहे. पण ती पूर्णपणे विस्कळीत आहे. शेकडो सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणे म्हणजे शहर स्मार्ट होणे नसून त्याला सकारात्मक मानसिकतेचीही गरज आहे. नाट्य, साहित्य, संगीत आदी क्षेत्रांमधील सर्व कलावंत एकमेकांना ओळखत असतीलच असे नाही आणि एकमेकांच्या कामाविषयी सर्वांना माहिती असेलच असेही नाही. पण सारे एका छताखाली एकत्रित येतील. त्यातून कलांचे मिलन होईल आणि नवे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रातील मंडळी व्यक्त करीत आहेत.
गोव्याची राजधानी पणजी येथील कला अकादमीमध्ये खुला रंगमंच, नाट्यगृह, तालमीचे हॉल, कलादालन एकाच ठिकाणी आहे. शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या या अकादमीने गोव्यातील सर्व कलावंतांना एकत्रित बांधून ठेवले आहे. मुंबईतील पु. ल. अकादमीदेखील याचेच उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीत केवळ एका सभागृहाच्या जोरावर सांस्कृतिक चळवळ सुरू आहे. पण स्मार्ट व्हायचे असेल तर इस्राईलमधील तेल अविव महापालिकेचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा लागेल. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र कार्यक्रम राबविणाऱ्या या महापालिकेने शहरातील कलावंत आणि साहित्यिकांना एकत्रित बांधून ठेवले आहे.

अशी असावी अकादमी...

नागपूरच्या कुठल्याही भागातून पंधरा ते वीस मिनिटांत सहज पोहोचता येईल, अशा परिसरात विदर्भ कला अकादमी असावी. यामध्ये वाचनालय, खुला रंगमंच, मोठे नाट्यगृह, कलादालन, तालमीचे हॉल, दोनशे आसन क्षमतेची किमान दोन सभागृहे आदींचा समावेश असावा. याच ठिकाणी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभागीय कार्यालय असावे. विदर्भातील सर्व कला आणि दिग्गज कलावंतांची माहिती उपलब्ध करून देणारे हे ठिकाण ठरावे.

एकत्र यावे लागेल
आपले शहर सांस्कृतिकदृष्ट्या स्मार्ट नाही, असा अनेकांचा समज आहे. पण सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक विभागात आपण टॉपवर आहोत. साहित्य, नाट्य, चित्रपट, चित्रकला, संगीत...कुठलेही क्षेत्र निवडा, नागपुरातून बाहेर पडून नाव कमावणारे लोक खूप आहेत. पण आजही इतर प्रदेशांच्या तुलनेत एकत्रितपणे पुढे जाण्याची संस्कृती विदर्भात रुजलेली नाही. चित्रनगरी व्हावी, असे म्हणणे सोपे आहे. त्यासाठी एकत्रितपणे काम करणे मात्र खूप अवघड आहे.
- चंद्रकांत चन्ने, ज्येष्ठ चित्रकार 
सामूहिक विचार आवश्‍यक
एखाद्या उद्देशाने काही लोक एकत्रित आले तर काही तरी फरक पडेल. नाही तर मी, माझा मोबाईल, माझे काम असे म्हणून आपल्यापुरते जगणारे लोक खूप आहेत. वैयक्तिक विचार न करता सामूहिक विचार केला तरच मानसिकता बदलेल आणि "स्मार्ट' होण्याच्या दिशेने पाऊल टाकता येईल. सांस्कृतिक क्षेत्रातील चार लोक एकत्र येतील आणि सकारात्मक विचाराने काम करतील तरच काही घडणे शक्‍य आहे. केवळ सोयीसुविधा असून चालणार नाही, मानसिकताच बदलावी लागेल.
- विवेक रानडे, प्रसिद्ध छायाचित्रकार
"चलता है' मानसिकता नको
मूळ संस्कृती जपून जे उत्तम आहे ते रसिकांना देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. नागपूरकर आळशी आहेत, असे इतर शहरांमध्ये बोलले जाते. ही ओळख बदलण्यासाठी उत्साहाने काम करण्याची आणि "चलता है' मानसिकता बदलण्याची गरज आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व लोक एका ठिकाणी येतील अशा पद्धतीची सोय झाली तर कदाचित बऱ्याच अंशी चित्र बदलेल. पण त्यासाठी शासनावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःचीच बदल स्वीकारण्याची तयारी हवी.
- रेणुका देशकर, निवेदिका
कोषातून बाहेर पडावे
नागपुरात बहुतांश कलावंत स्वतःच्याच कोषात राहणे पसंत करतात. त्यामुळे बाहेर काय सुरू आहे आणि कसे सुरू आहे, याची त्यांना माहितीच नसते. आपली संस्कृती स्मार्ट आहेच. पण आपण अधिक स्मार्ट होण्याची गरज आहे. आजही चित्रकार, संगीतकार, गायक, नट सर्वांना काम करण्यासाठी नागपूर सोडून बाहेर जावे लागते. तशी वेळ येऊ नये म्हणजे सांस्कृतिक विकास गरजेचा आहे, असे मला वाटते.
- मिली विकमशी, चित्रकार
एक छत असावे
आपल्या शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची उणीव नाही. पण सगळे विस्कळीत आहे. सर्व कलावंत एकत्र येण्यासाठी एक केंद्र आपल्याकडे नाही. त्यामुळे साहित्य क्षेत्राला रंगभूमीचा आणि रंगभूमीला साहित्य क्षेत्राचा काही पत्ता नसतो. एका छताखाली अनेक कार्यक्रम-उपक्रम होतील, तेव्हा उपराजधानीचेच नव्हे तर विदर्भाचे सांस्कृतिक वैभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचेल.
- मनीषा साधू, कवयित्री
-------
 
Blogger Templates