लक्ष्मीनगरच्या सुविधा पारडीत मिळतील
आयुक्त श्रावण हर्डीकर ः शहराच्या विकासावर "स्मार्ट' चर्चासत्रसकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 25 ः लक्ष्मीनगरच्या भागातील सुविधा पारडी, महाल, इंदोरासारख्या अविकसित भागांमध्ये मिळायला लागतील तेव्हाच नागपूर "स्मार्ट सिटी' झाले असे म्हणता येईल, अशा साध्या-सोप्या शब्दांमध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी "स्मार्ट सिटी'ची संकल्पना नागपूरकरांना समजावून सांगितली. विशेष म्हणजे, लक्ष्मीनगरमध्येच झालेल्या चर्चासत्रात त्यांनी हे मत व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स आणि एसीसी सिमेंट्स यांच्या वतीने अभियंतादिनानिमित्त पी. टी. मसे स्मृतिप्रीत्यर्थ "कशी असेल स्मार्ट सिटी नागपूर?' या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. सायंटिफिक सोसायटी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात निवृत्त एअर व्हाईस मार्शल दत्तात्रय पांडे, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक, विदर्भ विकास मंडळाचे सदस्य डॉ. कपिल चांद्रायण आणि इमॅजिसचे संचालक संदीप शिरखेडकर यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला. या वेळी असोसिएशनचे सतश रायपुरे आणि एसीसी सिमेंटचे नारायण पळसापुरे उपस्थित होते. विशेष म्हणजे मनपा आयुक्त प्रथमच एवढ्या मोकळेपणाने बोलत होते आणि सभागृहात उपस्थित श्रोतेही त्यांना उत्तम प्रतिसाद देत होते. आयुक्त म्हणाले, "आपण बाहेरच्यांना कसे वाटतो, त्यापेक्षा गुणात्मकदृष्ट्या आपण स्मार्ट आहोत का, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. "मी नागपूरकर' असे म्हणताना आपलेपणाची भावना निर्माण होईल, ते "स्मार्ट' होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असेल, अशी भावना शहराच्या प्रत्येक कोपऱ्यातील प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण होईल तेव्हाच विकासाचा मार्ग गवसेल. आपल्याला मिळणाऱ्या सुविधा घरकाम करणाऱ्या महिलेला मिळतात का? "क्वालिटी ऑफ लाईफ' हा विषय व्यापक आहे; पण महत्त्वाचा आहे. सर्व सायकल रिक्षावाले ई-रिक्षा चालवायला लागतील, विकसित भागांप्रमाणेच झोपडपट्टीत चोवीस तास पाणी मिळायला लागेल आणि त्याच दर्जाचे मनोरंजन सर्व भागांमध्ये उपलब्ध होईल तेव्हाच सर्वसमावेशक विकास झाला असे म्हणता येईल.' संपूर्ण चर्चासत्राची धुरा निवेदिका रेणुका देशकर यांनी सांभाळली.
आयुक्तांचे "स्मार्ट' आवाहन...
- - स्मार्ट सिटी कशी असावी हे महापालिका नव्हे, लोक ठरवतील
- -कार्यक्रमात टाळ्या वाजवून स्मार्ट सिटीत सहभाग दिला असे समजू नका
- - असुविधांसाठी महापालिकेला शिव्या हाणण्याऐवजी लेखी सूचना कळवा
- -"फ्री वॉल्स' उभ्या करून सर्वसामान्य लोकांकडून सूचना लिहून घ्या
- - आर्थिक धोरणांवर तरुणांनी नव्या संकल्पना मनपाला द्याव्या



