पाच आरोपींचा समावेश, 38 गुन्ह्यांची दिली कबुली
नागपूर, ता. 1 : भानेगाव-पारशिवनी फाट्यावर टाटा सुमो (क्र. एमएच/31- एसी/9021)ने जाणाऱ्या पाच दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मध्यरात्रीच्या सुमारास भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचा त्यांचा बेत होता. आरोपींनी यापूर्वीच्या 38 गुन्ह्यांची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर कामठी, रामटेक या विभागात वेगवेगळी पथके तयार केले. तीन विशेष पथके तयार करून कोराडी, खापरखेडा मार्गे खापरखेडा ते कामठी रोडवरील पारशिवनी फाटा येथे पोहोचून सापळा रचला. पारशिवनी फाट्याजवळ खापरखेडा-कामठी मार्गाने एक पांढऱ्या रंगाची गाडी जात होती. सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क करून गराडा घालून या गाडीस थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाडीतील चालकाने वेग वाढवून पळून जात होते. पोलिस वाहनाने त्यांचा पाठलाग करून टाटा सुमोला थांबविण्यात आले. गाडीतील चालकासह बसून असलेले इतर पळून जाण्याच्या तयारीत असताना मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. टाटा सुमो गाडी (क्र. एमएच/31- एसी/9021)मध्ये मुख्य दरोडेखोर व त्याचे चार ते पाच साथीदार मध्यरात्रीच्या सुमारास खापरखेडा ते पारशिवनी रोडवरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याची योजना आखत होते.
वाहनाची झडती घेतली असता, मध्यभागातील सिटखाली एक लोखंडी मोठे विळ्यासारखे शस्त्र सापडले. मागच्या भागात रबरी हॅंडग्लोव्हस, गाडीचे पाने, काणस, पाकिटात चाव्यांचा गुच्छा, टॉर्च व एक लहान लोखंडी सब्बल आढळली. पाचही आरोपींची अंगझडती घेतली असता, लोखंडी तलवार, कुकरी, लोखंडी सब्बल, लोखंडी रॉड, लोखंडी कानस, चोरलेली एक लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. जप्त केलेले वाहन भंडारा येथील शासकीय पाटबंधारे कार्यालयातून चोरल्याचे आरोपींनी सांगितले.
आरोपी भोसा (जि. यवतमाळ), पिंपळा डाक बंगला, बाबूलखेडा, चारगाव (कुवारा भिवसेन) येथील रहिवासी आहेत. पाचही आरोपींना सावनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद सराफ, सहायक पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, पुरुषोत्तम अहेरकर, लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, अजय तिवारी, राजेंद्र सनोढिया, दिलीप लांजेवार, मोरेश्वर नागपुरे, प्रमोद बनसोड, चेतन राऊत, अमोल वाघ, राधेश्याम कांबळे, विनोद भोयर, प्रीतेश रोहणकर, विशाल चव्हाण, संगीता वाघमारे, शैलेश यादव, रवींद्र जाधव, अश्विनी बैस, मदन आसतकर, चालक ज्ञानेश्वर पाटील, शैलेश बनोदे, भाऊराव खंडाते यांनी केली.
ठिकठिकाणी दरोडे
अटक केलेल्या आरोपींनी गेल्या काही दिवसांत नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, भंडारा, कुरई, पांढुर्णा (मध्य प्रदेश) येथून सात टाटा सुमो/बोलेरो चारचाकी वाहने, सात दुचाकी चोरल्या. पाच दुकानांत चोरी, 12 वीज रोहित्र, चार बकऱ्या चोरल्या. आतापर्यंत त्यांच्याविरुद्ध 38 गुन्ह्यांची माहिती उघड झाली.



