मंगळवारी 129 ग्रामपंचायतींसाठी मतदान
नागपूर, ता. 1 : जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. 42 झोन व 484 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. एकूण 22 पोलिस ठाण्यांतर्गत सुरक्षेसाठी कर्मचारी तैनात करण्यात येतील. यात सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, 15 पोलिस निरीक्षक, 51 सहायक व पोलिस उपनिरीक्षक, 771 पोलिस कर्मचारी, एसआरपीएफचा समावेश आहे.
जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर, कुही, मौदा, रामटेक, पारशिवनी, सावनेर, नरखेड, काटोल, कळमेश्वर, हिंगणा, कामठी व नागपूर ग्रामीण या तालुक्यांतील 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. 4 ऑगस्टला सकाळी 7.30 ते 5.30 वाजतापर्यंत मतदान होईल. 129 पैकी 120 ग्रामपंचायती नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील, तर 9 ग्रामपंचायती नागपूर शहर पोलिस हद्दीतील आहेत. संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक अमित काळे यांची नियुक्ती करण्यात आली. याकरिता प्रत्येक मतदार केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तादरम्यान पोलिस ठाणेनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर निगराणी व पाळत ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येईल.



