21 Sept 2015

संत्र्याची उपेक्षा


भूपेंद्र गणवीर 
फळ शहराची ओळख बनते. देशविदेशात शहराच्या नावावर विकले जाते. हा मान काही फळांना मिळाला. त्यात नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे, भुसावळच्या केळी, काश्‍मीरचे सफरचंद आहेत. मात्र, फळ आणि शहराने परस्पराला ओळख दिली. त्यात केवळ विदर्भातील संत्रा आहे. या संत्र्यासोबत नागपूरचे नाव जुळले. त्यातून प्रतिष्ठा वाढली. संत्र्याला बाजार मिळाला. भाव मिळाला. त्यानेही उपराजधानीला वेगळी ओळख दिली. कोणी संत्रानगरी म्हणू लागला, तर कोणी ऑरेंज सिटी. अनेकांनी आपल्या प्रतिष्ठानांमध्ये त्याचा समावेश केला. फळ आणि शहराने एकदुसऱ्याला दिलेली ही ओळख लक्षणीय आहे. नावाचा हा गोडवा आहे. हा टिकला आणि वाढला. त्याचा लाभ मधल्या दलालांना व व्यापाऱ्यांना मिळाला. शेतकरी मात्र त्यापासून वंचित राहिला. त्याच्यासाठी संत्रा प्रक्रिया कारखाने उघडले. त्यात 50 कोटी बुडाले. ते आता भंगारावस्थेत आहेत. पॅकेजिंग कारखानेही कोलमडले. संत्रा आणि संत्रा उत्पादकांची सातत्याने उपेक्षा होत आहे.


संत्रापिकाचा गोडवा वाढवा, यासाठी सावरगावचे सोनूबाबा यांनी शक्कल लढविली. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात मोफत संत्री व ज्यूस वाटप सुरू केले. त्यातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना संत्र्याचा गोडवा कळला. संत्राबर्फीचा धंदा तेजीत आला. त्यांच्या पाठोपाठ अनिल देशमुख आणि हर्षवर्धन देशमुख आले. या दोन्ही नेत्यांनी काटोल आणि वरुड मतदारसंघात संत्रा उत्पादकांचे महत्त्व वाढविण्यास सुरुवात केली. संत्रा कारखाने सुरू करण्याचा रेटा लावला. त्याला प्रतिसाद मिळाला. 400 टन क्षमतेचे वेअरहाउस उभारले. 500 टन क्षमतेचा संत्रा प्रक्रिया कारखाना उभा झाला. मोर्शीला 15 कोटी रुपये खर्चाचे पॅकेजिंग सेंटर उभारण्यात आले. अलीकडे कारंजा येथे सहा कोटींचे पॅकेजिंग सेंटर उघडले. काही खासगी वेअरहाउस व पॅकेजिंग केंद्रही उघडले. ते सर्वच बंद पडले. काटोलचा 25 कोटींचा ज्यूस कारखाना भंगारावस्थेत उभा आहे. या कारखान्यातील यंत्रसामग्री साडेसात कोटींत विकली गेली. सोनूबाबा न्यायालयात गेले. तिथे जिंकले. मुंबईला गेलेली यंत्रसामग्री परत आली. मात्र, नव्याने कारखाना उभारणी अवघड झाली. आता नवा संत्रा प्रक्रिया कारखाना उघडावयाचा झाल्यास 75 कोटी रुपये हवेत. यंत्रसामग्री नामवंत कारखान्यात निर्माण करावी; अन्यथा कमिशन लाटणारा कोणीतरी येईल. लोकल मेड यंत्रसामग्री बनेल. पाच वर्षांनी पुन्हा "जैसे थे‘ चित्र दिसेल. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी नागपुरात प्रमुख मार्गांवर व घरोघरी संत्रा झाडे लावून संत्रानगरीचे रूप देण्याची योजना जाहीर केली होती.

शेतकऱ्यांना न्याय देण्याची भाषा सारेच करतात. जेव्हा देण्याची वेळ येते, तेव्हा हात आखडता घेतात. त्याचा दोष आतापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाला दिला जात होता. आता राजकीय नेतृत्व बदलले. नेतृत्व विदर्भाकडे आले. त्यामुळे अपेक्षा वाढल्या. उद्योगमंत्री सेनेचे असले तरी कृषिमंत्री भाजपचे आहेत. संत्रापट्ट्यात भाजपचेच आमदार आहेत. संत्र्याची निर्यात, त्यावर प्रक्रिया, त्याचे पॅकेजिंग, त्यापासून तेल, वाइन, अन्य विविध उत्पादने यावर खूप गप्पा झाल्या. प्रक्रिया उद्योगही उघडले. ते लालफितीत अडले. त्यातच ते संपले. प्रक्रिया उद्योगांना कुलूप लागले. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांवर शब्दतोफा डागणारे आता सत्तेत आले. निर्णय घेण्याचे अधिकारही विदर्भाकडे आले. हा एक योगायोग होय. त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय मिळेल, असा विश्‍वास वाढला आहे.

या फळात पोषक घटक भरपूर आहेत. रुचकर व पौष्टिकता आहे. अ, ब, क जीवनसत्त्वे आहेत. कॅल्शिअम भरपूर आहे. सोडिअम, मॅग्नेशिअम, कॉपर, सल्फर, क्‍लोरिन, कार्बोहायड्रेड व प्रथिने आहेत. खनिजांमुळे शरीरातील रक्ताला क्षारमय बनविते. फळ औषधी गुणधर्माने भरपूर आहे. हे पीक प्रामुख्याने वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड व आजूबाजूच्या परिसरात घेतले जाते. त्यामुळेच या भागाला "कॅलिफोर्निया‘ असेही संबोधले जाते. अनेक वर्षांपासून या काळ्या मातीत हे पीक घेतले जाते. इंग्रजांनी या पिकासाठी रेल्वेमार्ग टाकण्याचे नियोजन केले होते. त्या नरखेड रेल्वेमार्गाचे काम 100 वर्षांनंतर पूर्ण झाले.


संत्रा उत्पादक आणि या पिकाला संरक्षण नाही. नवा वाण नाही. नवे संशोधन नाही. संरक्षण नाही. शेतकरी आपल्या पद्धतीने संत्रा झाडे लावतो. माल बाजारात आणतो. मिळेल त्या भावाने विकतो. व्यापारी विकत घेतो. 50 रुपये पेटी भावाने विकत घेतलेली संत्री मोठ्या शहरांमध्ये 150 रुपये भावाने विकली जाते. संत्र्याला त्याच्या भागातच भाव नाही. "पिकतो तिथे विकत नाही‘ असा वाक्‍प्रचार रूढ आहे. तो या पिकाला तंतोतंत लागू होतो. भाव हवा असेल तर संत्रा जादा दिवस टिकेल, अशी त्या फळावर प्रक्रिया हवी. प्रक्रियेच्या माध्यमातून त्यापासून विविध वस्तू बनतील. त्यांची ब्रॅंडिंग होईल. औषधी गुणधर्मानुसार तेल, औषधी व पेय बनेल. तेव्हाच त्याचा मोबदला शेतकऱ्यांपर्यंत झिरपेल. काटोल, नरखेड, मोर्शी व वरुडमध्ये मोठ्या संत्रामंडी आहेत. संत्र्याच्या हंगामात देशभरातील व्यापारी या भागात येतात. माल विकत घेतात. आपल्या भागात नेतात. "नागपुरी संत्रा‘ म्हणून त्या भागात विकतात. अंबिया बहराचा संत्रा थोडा आंबट असतो. दक्षिण भारतात त्याचा खप अधिक आहे. मृग बहराचा संत्रा उत्तर भारतातील लोकांना जास्त आवडतो. त्यामुळे या पिकाला उत्तरेतील राज्यांमध्ये जास्त मागणी आहे. संत्रा उत्पादकांची स्थिती फारशी चांगली नाही. कधी जादा पाऊस, तर कधी कमी पावसाची झळ बसते. कडक उन्हामुळे मृग बहराचा संत्रा टिकला नाही. पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी स्थिती होती. त्यामुळे अंबिया बहराचा संत्रा गळू लागला. दोनदा गळतीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले; तरी त्याविरुद्ध ओरड नाही. अद्याप संत्रागळती कायम आहे.

ऑक्‍टोबरमध्ये संत्री बाजारात येणार. त्याच काळात संत्रा महोत्सवाची तयारी आहे. भारताचे कृषिमंत्री राधासिंग यांना आमंत्रण आहे. पूर्वीच्या कृषिमंत्र्यांवर मात करणारे कोणते निर्णय होणार, याकडे विदर्भाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्री हजेरी लावणार आहेत. यात केवळ संत्र्याची ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग केली जाणार की ठोस पावले उचलणार? शेतकऱ्यांना न्याय मिळणार? संत्र्याचा गोडवा वाढविणारी उत्पादने बाजारात आणणार? संत्रा निर्यात होणार की त्याच्यापासून तेल, साबण, ज्यूस, औषधी व सौंदर्यप्रसाधने तयार करणारे कारखाने येणार? यांची उत्तरे महिन्याभरात मिळतील. तोपर्यंत स्वप्न बघा. पूर्तीचे नियोजन करा. संत्र्याच्या गोडव्याची प्रतीक्षा करा.

रविवार, 20 सप्टेंबर 2015  
 
Blogger Templates