17 Jul 2015

मौदा

कोदामेंढी परिसरात अवैध धंद्यांना ऊत

कोदामेंढी, ता. 19/०७/२०१५ : परिसरात अवैध दारू, वाहतूक, सट्टापट्टी, वाळू वाहतूक आदी अवैध धंद्यांना ऊत आला असून, याकडे अरोली पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्था भंग होत आहे.
नांदगाव, कोदामेंढी, धर्मापुरी, रेवराल, अडेगाव, मोरगाव, तांडा, धानोली, सावंगी, तुमान, अरोली, तरोडी, सिरसोली आदी गावांत अवैध दारूची सर्रास विक्री होते. विशेष म्हणजे अरोली गावात पोलिस ठाणे असूनही अवैध दारूची विक्री कित्येक दिवसापासून सुरू आहे. पोलिसांची वेळेपुरती कारवाई झाली की दुसऱ्या दिवशी जैसे थे स्थिती असते. कोदामेंढी, खात, निमखेडा आदी ठिकाणी सरकारी देशी दारूची दुकाने आहेत. येथील दुकानातून दारू पुरवठा परिसरातील गावात केला जातो. पोलिसांना याबाबत माहिती असूनही ही अवैध दारूची विक्री बंद झाली नाही.

रेवराल येथे खुलेआम दारूचा अड्डा चालतो. त्याचा थाट सरकारमान्य दुकानासारखा आहे. दररोज पहाटे आणि रात्रीला गावागावांत दारूचा पुरवठा केला जातो. नियमानुसार देशी दारूची दुकाने सकाळी दहा वाजता सुरू होणे आवश्‍यक असते. परंतु, ही दुकाने सकाळी सहा ते सात वाजता उघडतात. दारू पिणारे शौकिनांची सकाळपासून गर्दी असते. रात्रीलासुद्धा बंद करण्याची वेळ निश्‍चित असतानाही भान राहत नाही.
धर्मापुरी येथील दारू दीड महिन्यापूर्वी महिलांच्या पुढाकाराने बंद करण्यात आली होती. आता पुन्हा तेथील दारूची विक्री सुरू झालेली आहे. कोदामेंढी, खात, अरोली आदी गावांत मोठ्या प्रमाणात सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू आहे. रामटेक-भंडारा मार्गावरून अवैध वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. गाडीमध्ये जनावरांसारखे एकावर एक कोंबून प्रवासी नेतात. बसस्थानक भागात अवैध वाहतुकीमुळे एसटी बस वळायला जागा नाही. त्यामुळे अनेकदा बसचालक थांबणे टाळतात. सूरनदीच्या पात्रातून वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. या अवैध धंद्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

महा ई सेवा केंद्रात लाभार्थ्यांची लुबाडणूक

कोदामेंढी, ता. 19 : मौदा तालुक्‍यात महा-ई सेवा केंद्रात विविध प्रकारचे प्रमाणपत्र तयार करण्याकरिता गेलेल्या लाभार्थ्यांकडून लुबाडणूक होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यासंदर्भात तक्रार करण्यास कुणीही पुढे सरसावलेला नाही. त्यामुळे कारवाई कशी करावी, असा प्रश्‍न तहसीलदारांना पडलेला आहे.
तालुक्‍यात कोदामेंढी, खात, निमखेडा, अरोली आदींसह सहा महा-ई सेवा केंद्र आहेत. सध्या शैक्षणिक कामकाजांकरिता विविध प्रमाणपत्राची गरज विद्यार्थ्यांना असते. त्याकरिता पालक व विद्यार्थी कागदपत्रे जमा करून आवश्‍यक प्रमाणपत्रांकरिता पायपीट करीत असल्याचे चित्र सगळीकडे आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र लवकर मिळावे अशीच आशा असते. महा-ई सेवा केंद्रातील प्रतिनिधी एकप्रकारे दलालाची भूमिका घेत आणि अव्वा चे सव्वा दराने प्रमाणपत्र तयार करीत असल्याचे सर्वाधिक चित्र आहे. वास्तविक पाहता त्यांच्या केंद्रावर रेटबोर्ड लावणे गरजेचे असते. मात्र एकाही केंद्रावर रेटबोर्ड लागले नाहीत. त्यामुळे अव्वाच्या सव्वा दराने लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्या जाते. एकीकडे शासनाने शैक्षणिक कामकाजांकरिता अधिक पैसे मोजावे लागू नये म्हणून स्टॅंप पेपरवर होणारी कामे कोर्ट फी तिकीट लावून केल्या जावे, असे फर्मान घातले आहे. आणि ते हिताचे आहे.
महा-ई सेवा केंद्रात नॉन क्रिमिलेअर व जातीचा दाखल्याकरिता हजार ते बाराशे रुपये मोजावे लागते. त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखल्याकरिता दीडशे ते दोनशे, शपथपत्राकरिता दोनशे, अधिवास प्रमाणपत्राकरिता आठशे ते हजार रुपये मोजावे लागतात. त्यातच कुणाला जर लवकर प्रमाणपत्र हवे असल्यास त्याच्याकडून दोन चारशे रुपये अधिकचे घेतले जातात. लाभार्थ्यांची एकप्रकारे लुबाडणूक होत असून याबाबत कुणीही आवाज उचलीत नाही कारण तक्रार केल्यास आपले काम होणार नाही, अशी भीती पालकांमध्ये आहे. ज्यांना या कामाकरिता नेमका किती खर्च येतो, हे माहीत आहे, ते तहसील कार्यालयात जाऊन प्रमाणपत्रे बनवितात. आणि यामुळेच तहसील कार्यालयात विविध प्रकारची प्रमाणपत्र तयार करण्याकरिता लाभार्थ्यांची व पालकांची गर्दी असते.
प्रत्येक महा-ई सेवा केंद्रात रेटबोर्ड लागले आणि त्याप्रमाणे पैसे घेतल्यास तहसील कार्यालयात प्रमाणपत्र तयार करण्याकरिता असणारी गर्दी कमी होईल. याकडे संबंधित विभागाने केंद्रावर कारवाई करणे गरजेचे आहे.

महा ई-सेवा केंद्रात जर लाभार्थ्यांकडून अधिकची फी घेतल्या जात असल्यास त्यांनी तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात येऊन दाखले बनवावे. यासंदर्भात आमच्याकडे कुणाचीही तक्रार नाही. एखाद्याने लेखी स्वरूपात तक्रार दिल्यास त्यांच्यावर नक्‍की कारवाई करण्यात येईल.
-शिवराज पडोळे, तहसीलदार मौदा


महिलांना मिळाले रोजगाराचे आश्‍वासन
तनिष्कांच्या प्रयत्नांना यश : पंचायत समितीसमोरील उपोषणाची सांगता

मौदा,  18/07/2015 : तालुक्‍यातील भेंडाळा येथील महिला ग्रामपंचायतीच्या कामावर रोजगार मिळत नसल्याने 16 जुलैपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसल्या होत्या. तनिष्कांच्या प्रयत्नांतून त्यांची मागणी प्रशासनाकडे रेटून धरण्यात आली. त्यानंतर एक- एक महिना आळीपाळीने सर्वांना रोजगार देण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर उपोषणाची सांगता झाली.

मागील काही महिन्यांच्या कालावधीत त्यांना कामापासून वंचित ठेवण्यात आले होते. काम मिळावे यासाठी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी रोजगार देण्यात येईल, असे ग्रामपंचायत भेंडाळाकडून लेखी लिहून देण्यात आले असल्याचे उपोषणकर्त्या महिलांनी सांगितले. लेखी आश्‍वासन दिल्यानंतरही काम मिळाले नाही. याबाबत खंड विकास अधिकाऱ्यांसह विविध कार्यालयांत पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु काही एक फायदा झाला नाही. अखेरीस आठ जुलैला सूचना देऊन 16 जुलैपासून सहा महिलांनी सामूहिकरीत्या पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाचा दुसरा दिवस असूनही प्रशासनकडून दखल घेतल्या जात नसल्याचे पाहून मौदा येथील तनिष्का गटप्रमुख वैशाली चव्हाण यांनी उपोषणकर्त्या महिलांची व्यथा ऐकून घेतली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्‍वर वैद्य यांनी उपोषणकर्त्या महिलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न केले. रात्री आठ वाजताच्या सुमारास सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. एक- एक महिना आळीपाळीने सर्वांना रोजगार देण्यात येईल, असे लेखी पत्र उपोषणकर्त्या महिलांना देण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र गोडबोले व तनिष्का सदस्यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी सभापती मनोज कोठे, उपसभापती राजेश ठवकर, खंडविकास अधिकारी चिंधूजी आदमने, भेंडाळ्याचे ग्रामसेवक बारंगे, मौद्याच्या तनिष्का गटप्रमुख वैशाली चव्हाण, आंजनगावच्या गटप्रमुख नीता पोटफोडे, सदस्या रेखा कोहाड, ज्योती बावणे, कुंदा नंदेश्‍वर, सावित्री काटकर, कल्पना मानकर, तालुका बातमीदार राजेंद्र रावते उपस्थित होते.


बाजार समितीच्या आवारात भरणार "बाजार'
मुख्य मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी निर्णय


मौदा  : येथील आठवडी व दैनंदिन बाजार रस्त्यालगत भरत असल्याने गर्दी होत असते. पूर्वी लोकसंख्या कमी असल्याने जुन्या बाजाराच्या जागेवर बाजार भरत असे. सध्या एनटीपीसीसह विविध कंपनी परिसरात झाल्या. त्यामुळे लोकसंख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे रविवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा बाजार भरणार आहे.
लोकसंख्या वाढल्याने परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांची संख्या वाढली. नागपूर, कामठीसह इतर ठिकाणचे भाजीविक्रेते बऱ्यापैकी भाजीपाला खरेदीदार ग्राहक मिळत असल्याने स्वत:चे दुकान थाटू लागले. त्यामुळे बाजाराकरिता आवश्‍यक जागा अपुरी पडू लागली. भाजीविक्रेते मिळेल तिथे रस्त्याच्या कडेला आपले बस्थान थाटू लागले. रस्त्यालगत सुमारे एक किलोमीटरपर्यंत बाजार भरतो. सुमारे सहा ते सात वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. पूर्वी ग्रामपंचायत व आताच्या नगरपंचायतने बाजाराकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही. भाजीपाला विक्रेत्यांकडून बाजाराच्या नावाखाली हक्काने वसुली करणाऱ्यांनी भाजीपाला विक्रत्यांकरिता कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. रस्त्याच्या कडेला बाजार भरत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने कायमस्वरूपी धोका असतो. वर्दळीचा मुख्य मार्ग असलेल्या या रस्त्यावर शाळा, दवाखाना, पोलिस स्टेशन आहे. या समस्येची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समिती मौदाकडून बाजार सुरू करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी (ता. 19) या बाजाराचा प्रारंभ होईल. मौदा शहरवासींनी बाजार समितीच्या आवारात येऊन भाजीपाला व फळे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नगरपंचायत व बाजार समितीत पत्रव्यवहाराचे युद्ध सुरू असून, बाजार त्यांच्या आवारात भरविण्याकरिता नगरपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याची माहिती आहे.

मारहाणीतील आरोपींना जामीन
मौदा,18/07/2015 : शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास साकोलीचे भाजपचे आमदार राजेश (बाळा) काशिवार यांना मौदा (माथनी) येथील टोलनाक्‍यावर मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयने जामीन मंजूर केला.
नागपूर-भंडारा महामार्गावरील माथनी टोलनाक्‍यावर वाहन नेण्यावरून झालेल्या बाचाबाचीदरम्यान कर्मचाऱ्यांनी साकोलीचे आमदार बाळा ऊर्फ राजेश काशिवार यांना जबर मारहाण केली. ते काही कामानिमित्त नागपूरला आले होते. शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेचारच्या सुमारास ते साकोलीकडे जाण्यास निघाले. मार्गातील माथनी टोलनाक्‍यावरून जाताना त्यांचे वाहन चारचाकी लेनमधून जाण्याऐवजी दुचाकी लेनमधून गेले. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी वाहन अडविले. तेव्हा वाहनात बसलेले आमदार काशिवार वाहनातून उतरले. त्यांनी आपली ओळख सांगितली. मात्र, कर्मचाऱ्यांनी "आम्ही कुण्या आमदाराला ओळखत नाही' असे म्हणत त्यांच्याशी बाचाबाची केली. यावेळी टोलनाक्‍यावरील चार कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेची तक्रार त्यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. आरोपीतील निखिल गायधने, आशीष खरवडे, शुभम मस्के, दिगंबर मेश्राम, पुरुषोत्तम निंबार्ते, अमर तईकर, आशीष सहारे या सर्वांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

साकोलीच्या आमदारास मारहाण
माथनी टोलनाक्‍यावरील घटना : वाहन नेण्यावरून बाचाबाची

मौदा : नागपूर-भंडारा महामार्गावरील माथनी टोलनाक्‍यावर वाहन नेण्यावरून झालेल्या बाचाबाचीदरम्यान चार कर्मचाऱ्यांनी साकोलीचे आमदार बाळा ऊर्फ राजेश काशिवार यांना जबर मारहाण केली. ते सध्या भंडारा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
साकोली (जि. भंडारा) येथील विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार बाळा काशिवार हे काही कामानिमित्त नागपूरला आले होते. शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेचारच्या सुमारास ते साकोलीकडे जाण्यास निघाले. मार्गातील माथनी टोलनाक्‍यावरून जाताना त्यांचे वाहन चारचाकी लेनमधून जाण्याऐवजी दुचाकी लेनमधून गेले. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी वाहन अडविले. तेव्हा वाहनात बसलेले आमदार काशिवार वाहनातून उतरले. त्यांनी आपली ओळख सांगितली. मात्र, कर्मचाऱ्यांनी "आम्ही कुण्या आमदाराला ओळखत नाही' असे म्हणत त्यांच्याशी बाचाबाची केली. या वेळी टोलनाक्‍यावरील चार कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली. त्यानंतर त्यांनी स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन भंडाऱ्याकडे रवाना झाले. याप्रकरणी पोलिसांनी निखिल गायधने याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. 
 
Blogger Templates