17 Jul 2015

कळमेश्‍वर

विठ्ठल नामाने दुमदुमले धापेवाडा
नितीन गडकरी यांच्या हस्ते महापूजा, पालकमंत्र्यांनीही दिली मंदिराला भेट


मोहपा/कळमेश्‍वर, ता. 1 : विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र धापेवाडा येथे शनिवारी (ता. एक) आषाढ पौर्णिमेला विठ्ठल- रुखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता. पहाटे 4.30 वाजता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महापूजा झाली.
आषाढी एकादशीला भरणाऱ्या पंढरपूरच्या यात्रेला महत्त्व आहे. परंतु सर्वसामान्य भक्तांना पंढरपूरला जाणे शक्‍य नसल्याने आषाढी पौर्णिमेला ते श्री क्षेत्र धापेवाड्याला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशीनंतर पौर्णिमेच्या दिवशी पांडुरंग धापेवाड येथे भक्तांना दर्शन देण्यासाठी येतो, अशी आख्यायिका आहे.
शनिवारी महापूजा झाल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी मंदिराचे मुख्य द्वार उघडण्यात आले. दिंड्या, पताका, टाळ, मृदंगांच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष झाला. पावसाअभावी चंद्रभागा नदीला पाणी नसल्याने भक्तांची पात्रात स्नान करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भक्त विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाकरिता आले होते. धापेवाड्यातील दर्शनानंतर कोलबास्वामी महाराज समाधी, जागृत हनुमान मंदिर, संत वारामाय देवस्थान, संत केकाजी महाराज देवस्थान, मारुती मंदिर आदी स्थानांवर जाऊन भक्‍त नतमस्तक झाले.
नागपूर जिल्ह्यासह इतर ठिकाणांहून 100 दिंड्या, पालख्या धर्मनगरी धापेवाडा येथे दाखल झाल्यात. यावेळी नितीन गडकरींसमवेत भक्तांनी "चांगला पाऊस पडू दे रे विठ्ठला' अशी प्रार्थना केली.
येथे लहान मुलांच्या व सर्वच वर्गातील व्यक्तींच्या आनंदासाठी जत्रा भरत असते. आकाश पाळणे, लहान मुलांसाठी खेळणी लावण्यात येतात. राज्य परिवहन महामंडळाच्या सावनेर आगाराने मोहपा, कळमेश्‍वर, सावनेरमार्गे अनेक बसगाड्यांची सोय केली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल तैनात करण्यात आले होते.
शनिवारी सकाळी सावनेरचे आमदार सुनील केदार, कांचनताई गडकरी, निखिल गडकरी, नागपूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी जि. प. अध्यक्ष रमेश मानकर, ऍड. प्रकाश टेकाडे, जि. प. सदस्या अरुणा मानकर, जि. प. शिक्षण सभापती उकेश चव्हाण, कळमेश्‍वर तालुका अध्यक्ष इमेश्‍वर यावलकर, दिलीप धोटे, सोनबा मुसळे, श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंग पवार, विठ्ठलराव भड गुरुजी, धापेवाड्याचे सरपंच डॉ. मनोहर काळे, उपसरपंच सतीश मिश्रा यांची उपस्थिती होती. काही कारणास्तव महापूजेला न येऊ शकलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास श्री क्षेत्र धापेवाड्याला भेट देऊन दर्शन घेतले.

विहिरीच्या खोलीकरणात गैरव्यवहार
सुसुंद्री-सवंद्री येथील प्रकार, ग्रामस्थांची तक्रार

सुसुंद्री-सवंद्री येथे 2012 ते 2014 मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे अंदाजे आठ लाख खर्च केले. यात विहिरीच्या खोलीकरण व बांधकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार मुख्यकार्यपालन अधिकाऱ्याकडे करण्यात आली.
कळमेश्‍वर तालुक्‍यातील ग्रामपंचायत सुसुंद्री-सवंद्रीला आठ लाखांचा निधी देण्यात आला होता. सरपंच व सचिव यांनी सदर रक्कम खर्च करताना गैरव्यवहार केला. विहिरीच्या बांधकमाचा दर्जा नियोजन आराखड्यानुसार नाही. ही बाब ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच व सचिवांना लक्षात आणून दिली. मात्र, कोणतीही दखल घेण्यात आली नाही. ग्रामपंचायत विहीर बांधकाम करताना गावातील मजुरांना त्या विहिरीच्या बांधकामावर घेण्यात आले नाही. बोगस मजुरांच्या नावे बिले काढण्यात आली. सदर योजनेतून गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी चांगल्या दर्जाचे बांधकाम व्हावे, अशी अपेक्षा होती. मात्र, सरपंच व सचिवांनी त्याला तिलांजली देत स्वहित साधल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
 
Blogger Templates