23 Jun 2015

रामटेक

पसार कैदी पोलिसांच्या जाळ्यात
चार वर्षांनी गवसला, खुनाच्या गुन्ह्याखाली औरंगाबाद कारागृहात भोगत होता शिक्षा


रामटेक, ता. 20 : खुनाच्या गुन्ह्याखाली औरंगाबाद कारागृहात शिक्षा भोगत असताना संचित (पॅरोल) रजा घेऊन पसार झालेल्या कैद्याला चार वर्षांनी नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. भुमेश्‍वर माधवराव ब्राह्मणकर (वय 40) असे आरोपीचे नाव आहे.
आमगाव टोल्हा येथील भुमेश्‍वर ब्राह्मणकर यास रामटेक पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तो औरंगाबाद कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याने संचित रजा मिळावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडे अर्ज केला होता. त्याला पाच मार्च 2011 रोजी 30 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. संचित रजा उपभोगून त्याला चार एप्रिल 2011 रोजी कारागृहात परत जायचे होते. मात्र, रजा संपल्यानंतरही तो कारागृहात परतला नाही. तेव्हापासून ता फरार होता. याबाबत 28 ऑक्‍टेबर 2013 रोजी औरंगाबादचे कारागृह रक्षक सुभाष शेषराव इंगळे यांनी रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
परंतु तब्बल चार वर्षे होऊनही तो सापडला नव्हता. शनिवारी (ता. 18) नागपूर ग्रामीण मुख्यालयाचे नायब पोलिस शिपाई उमेश ठाकरे यांना गुप्त माहिती मिळाली. त्याआधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाला तलाव परिसरातून भुमेश्‍वरला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद सराफ, नायब पोलिस शिपाई अजय तिवारी, राजेंद्र सनोडिया, शैलेश यादव व चेतन राऊत यांनी केली.



काव्यमैफलीने दिला कालिदासांच्या स्मृतींना उजाळा
कालिदास दिनाचा कार्यक्रम शासकीय करण्याची मागणी

रामटेक, ता. 18/07/2015 : गडमंदिर परिसरात कालिदासांचे भव्य स्मारक असून, या ठिकाणी कालिदासदिनानिमित्त रामटेक तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने काव्यमैफल घेण्यात आली. यातून कालिदासांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
जगविख्यात संस्कृत पंडित महाकवी कालिदासांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आषाढ महिन्याचा प्रथम दिवस कालिदास दिन म्हणून सर्वत्र साजरा केल्या जातो. जगात रामटेकची ओळखच कालिदासांच्या "मेघदूत' महाकाव्यामुळे झाली. यानिमित्त आयोजित काव्यमैफलीच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे श्रीराम अष्टणकर होते. यावेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार ऍड. आशीष जयस्वाल, नगराध्यक्ष नलिनी चौधरी, उपाध्यक्ष रमेश कारामोरे, उपविभागीय अधिकारी राम जोशी, तहसीलदार प्रसाद मते, मुख्याधिकारी गीता वंजारी, संत गोपालबाबा, बाजार समिती सभापती बालचंद बादुले, अशोक बर्वे, राजेश ठाकरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष त्रिलोक मेहर उपस्थित होते.
काव्यमैफलीचे संचालन कवी पवन कामडी प्रीत यांनी केले. नामवंत कवी तुषार जोशी यांनी आपल्या कवितेतून सावळ्या मुलीच्या मनोगताचे सुरेख वर्णन केले. वसंत डामरे यांनी "एकट्याने' ही कविता सादर केली. अनिल वाघमारे यांनी हिंदी रचनेतून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा गोषवारा घेतला. पवन कामडींनी पाऊस कवितेतून पावसाच्या लहरी स्वभावाचे वर्णन केले. शिल्पा ढोमणे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाची व्यथा रचतेतून मांडली. काव्यमैफलीचे अध्यक्ष श्रीराम आष्टणकर यांनी रेशम रेशम या कवितेतून रसिकांना रिझविले.
तत्पूर्वी उद्‌घाटनप्रसंगी माजी आमदार ऍड आशीष जयस्वाल यांनी या परिसरात कालिदासांच्या कलाकृती व साहित्याचे वाचनालय निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार डी. एम. रेड्डी म्हणाले, मागील बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण असलेली विकासकामे पूर्ण करण्यात येत आहेत. कालिदास स्मारक परिसरात नूतनीकरण केले जाईल. पालिका उपाध्यक्ष रमेश कारेमोरे यांनी पुढील वर्षांपर्यंत कालिदासांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची घोषाणा केली. यावेळी संस्कृत विद्यापीठाचे विजयकुमार यांनी उपस्थित रसिकांपुढे कविकुलगुरू कालिदास उभा केला. कालिदासांच्या विविधांगी साहित्यप्रतिभेतील सौंदर्यावर मार्मिक प्रकाश टाकला. संचालन अनिल वाघमारे यांनी केले.

संस्कृत विद्यापीठात कालिदासांना आदरांजली

रामटेक  :  कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रामटेक येथील मुख्यालयात शुक्रवारी (ता. 17) कालिदास दिनाच्या सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विद्यापीठातील कालिदासाच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष त्रिलोक मेहर उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यापीठ नियोजन विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार यांनी केले. डॉ. पेन्ना म्हणाले, "केवळ शब्दार्थांची गुंफण केल्याने महाकवित्व प्राप्त होत नाही. तर प्रत्येक विषयाचे, वस्तूचे, घटनेचे वर्णन हे त्या गोष्टीकडे पाहण्याची कवीची प्रतिभादृष्टी आणि काव्यात्म संवेदनशीलतेने केले तरच कवीला महाकवित्व प्राप्त होते. कालिदासाच्या काव्यातील अनेक सौंदर्यस्थळांचा परामर्श डॉ. पेन्ना यांनी घेतला.
संचालन सुमीत कठाळे यांनी, तर आभार डॉ. रेणुका बोकारे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------
जलयुक्‍त शिवार योजना - वीस गावांत शेततळ्यांची 82 कामे पूर्ण
4/6/2015
मनसर- जलयुक्‍त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे सगळीकडे सुरू असली तरी रामटेक तालुक्‍यातील कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचे गांभीर्य ओळखून अल्पावधीतच बहुतांश कामे पूर्णत्वास नेली आहेत. यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन त्याचा लाभ मिळण्याचे चित्र दिसू लागले आहे.
तालुका कृषी अधिकारी तसेच देवलापारचे मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जलयुक्‍त शिवार योजनेतील कामे तालुक्‍यातील 20 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या गावामध्ये बांद्रा, बोथिया पालोरा, खापा, उमरी, नवेगाव, डोंगरताल, कडबी खेडा, उसरीपार, रयतवाडी, कट्‌टा, सावंगी, सालई, गुगुलडोह, पंचाळा, सालईमेंढा, किरणापूर, भंडारबोडी अशा एकूण 20 गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये जलयुक्‍त शिवार योजनेअंतर्गत कामांसाठी कृषी विभागाचा सुमारे दीड कोटीचा निधी प्राप्त झालेला असून त्यात विशेष निधीमधून 50 लाख रुपये तर विदर्भ सधन सिंचन विकास प्रकल्पातून एक कोटी निधीचा समावेश आहे. त्यानुसार आजपर्यंत 82 शेततळ्यांची कामे पूर्णत्वास गेलेली आहेत. 29 शेततळ्यांची कामे व नाला खोलीकरणाची 6 कामे सध्या प्रगतिपथावर सुरू आहेत. यातील कामांचा दर्जा उत्कृष्ट असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली आहे. पुढील वर्षी नवीन गावांची निवड करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली कामे 30 जूनपर्यंत पूर्णत्वास जातील, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले. 
 
Blogger Templates