14 Jan 2015

अवैध धंद्यांना "साहेबां'चा आशीर्वाद


तक्रार करूनही कारवाई शून्य; विविध कार्यालयांत भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
मौदा, ता. 5 ः तालुक्‍यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर वेळेवर योग्य कारवाई होत नसल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल उंचावत आहे. अधिकाऱ्यांचे या धंद्यांना संरक्षण असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्‍यामध्ये अवैध अभिन्यासांचा व्यवसाय जोमात सुरू असून कित्येक लेआउट अकृषक व नकाशा मंजुरी न करता विकण्यात येत आहेत. अशा अनधिकृत अभिन्यासांची जाहिरात पत्रके वर्तमानपत्रांसोबत मौदानगरी व तालुक्‍यात वाटण्यात येत असून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार या प्रकरणी बघ्याची भूमिका घेत आहेत. अवैध अभिन्यासांच्या तक्रारीवर कासवगतीने चौकशी करण्यात येत असल्याने असे व्यवसाय करणाऱ्यांची हिंमत आणखी वाढून ते अधिकाधिक जनतेची फसवणूक करीत आहेत. नगररचना नियमाप्रमाणे आरक्षित असलेली दहा टक्‍के खुली व दहा टक्‍के सार्वजनिक उपयोगाची जागा बळकावून जनतेची फसवणूक होत आहे.
तालुक्‍यातील वाळू घाटांवरून अवैध वाळूचा उपसा सुरू असून काही बड्या व्यावसायिकांचे वाळूचे ट्रक व ट्रॅक्‍टर महसूल विभाग व पोलिसांच्या आशीर्वादाने बिनारोखटोक सुरू आहेत. अधिकारी वर्ग कोणाच्या तरी प्रभावामुळे हे अवैध धंदे थांबविण्यात अपयशी ठरत आहेत. अवैध वाळू उपश्‍यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार होत असल्याची चर्चा परिसरात नेहमी सुरू असते. तालुक्‍यात अवैध दारूव्रिकी, सट्‌टा, जुगार, कोंबडबाजार भरविण्याचे प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने आम जनता त्रासली आहे. तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये मनरेगासह विविध कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा आम जनतेत असते. तक्रारीवर कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचे चित्र जनतेसमोर येत आहे.
.....बॉक्‍स..............
बदली झालेले अधिकारी परत कसे?
मागील ऑक्‍टोबर महिन्यात वाकेश्‍वर येथील राधाकृष्ण राईस मिलमधून शासकीस अंदाजे दोनशे पोती गहू, 201 कट्‌टा तांदूळ, 18 कट्‌टा लेव्ही साखर कारवाईत जप्त केली. या प्रसंगी सुमारे तीन हजार पाचशे शासकीय अन्नधान्याची रिकामी पोती जप्त करण्यात आली. यावरून त्यापूर्वीसुद्धा शासकीय अन्नधान्य या राईस मिलमध्ये कसे आले, याबाबतीत अनेक शंका व्यक्‍त होत आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाले असल्याचे यावरून सिद्ध होते. या कार्यालयात अशोक नांदगावकर पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागे कामठी येथे त्यांची बदली झालेली होती. परंतु ते मौदा येथेच शाखेत कार्यरत असल्याचे दिसत आहे.
 
Blogger Templates