14 Jan 2015

चालावे लागते जीव मुठीत घेऊन

मौदा वाय पॉइंटला उड्डाणपुलाची प्रतीक्षा; दोन वर्षांत 17 अपघात बळी
सकाळ वृत्तसेवा

मौदा, ता. 10 ः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेले मौदा हे औद्योगिकीकरण व शेती उत्पादनासाठी विख्यात आहे. या नगराच्या सभोवताल एनटीपीसी, रिलायन्स, बिर्ला व अन्य उद्योगसमूहांनी आपले कारखाने उघडले आहेत. बाजारपेठ तसेच शैक्षणिक कार्यासाठी नगरात येजा करणाऱ्या लोकांची व वाहनांची संख्या प्रचंड आहे. मौद्यासारख्या वर्दळीच्या वाहतुकीच्या ठिकाणी मौदा वाय पॉइंटवर उड्‌डाणपूल तयार करण्यात न आल्याने हे स्थळ अपघातप्रवण ठरत असून आजपर्यंत या परिसरात मागील दोन वर्षांत 16 जणांना मौदा ते माथनी या तीन किलोमीटर परिसरात प्राण गमवावे लागले. तर कित्येक गंभीर जखमी झाले.

धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही मौदा नगराला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी व परमात्मा एक सेवक संघटनेचे प्रवर्तक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे येथे अनुयायी आहेत. कन्हान नदीतिरातील चक्रधर स्वामींचे मंदिर व परमात्मा आश्रम येथे यात्रा भरतात. 26 जानेवारीला परमात्मा आश्रमात एक ते दीड लाख भाविक या यात्रेत सहभागी होतात. हे स्थळ मौदा वाय पॉइंटवर केवळ हाकेच्या अंतरावर आहे. या आश्रमाचे प्रवेशद्वार या वाय पॉइंटजवळ असल्याने प्रवाशांची प्रचंड कोंडी होते.
दररोज यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना प्राण मुठीत घेऊन या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो. वृद्ध व अबोध बालकांना तर हा रस्ता ओलांडणे अशक्‍य आहे. पायी चालणारे लहान विद्यार्थी, सायकलस्वार, मोटारसायकलस्वार, कारचालक यांना मौदा वाय पॉइंट ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येक तीन सेकंदाला या महामार्गावरून एक ते दोन वाहने ये-जा करतात. या रहदारीच्या रस्त्यावर प्रत्येत लहानमोठ्या ठिकाणी "ओव्हरब्रिज' तयार केलेले आहेत. परंतु केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे मौद्यासारख्या मोठ्या लोकवस्तीच्या प्रवेश मार्गावर उडडाणपूल होऊ न शकल्यामुळे या ठिकाणी अनेक प्रवाशांना अपघातात बळी पडावे लागते. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. तर कित्येक दुचाकीस्वार व पदप्रवासी गंभीर जखमी होत आहेत.
2013 व 2014 मध्ये मौदा ते माथनी या अवघ्या तीन किलोमीटर परिसरात अनिल पंधरे, विक्‍की शेख, शाहरुख खान, सरोज, सेवकदास मानापुरे, अयाश उईके, ज्ञानेश्‍वर नवघरे, श्‍याम ढाकणे, भूमेश्‍वर ढबाले, अमोल मेश्राम, सुनील मेश्राम, सुनील इडपाची, लेखनदास गणवीर, नागेश रामटेके यांना या मार्गावर जीव गमवावा लागला. तर मंगला मानापुरे, शंकर वंजारी, अविनाश मते, पांडुरंग तोणजिरे, कपिल सहारे, नरेंद्र सिंह यांच्यासारखे कित्येक या ठिकाणी जखमी झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात आहे. परंतु दररोज अपघातात किरकोळरीत्या जखमी झालेल्यांची नोंद पोलिस दफ्तरी नाही. कामठी क्षेत्राचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मौदा वाय पॉइंटवरील उड्‌डाणपुलाची मागणी कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या ठिकाणी उड्‌डाणपूल तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
 
Blogger Templates