14 Jan 2015

वन्यजीवांमुळे पिकांची नासधूस

डोंगरमौदा, चिकना परिसरातील शेतकरी त्रस्त

मांढळ,  : येथून पाच किलोमीटरवर असलेल्या डोंगरमौदा, चिकना परिसरातील शेतात वन्यजीवांकडून नासधूस केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले.
डोंगरमौदा येथील दिगांबर विठोबा मेश्राम यांच्या शेतातील हरभरा पिकात रानडुकर व इतर वन्यजीवांनी आठ दिवसांपासून हैदोस घातला होता. चार एकर शेतात हरभरा पीक आहे. त्याला मशागत व औषधांसाठी सुमारे दोन लाखांचा खर्च आला. त्यासाठी जिल्हा बॅंक व इतरांकडून कर्ज घेतले. आता पीक हातात येणार असतानाच उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील रानडुकरे व इतर वन्यजीव धुमाकूळ घालत आहेत. या संदर्भात त्यांनी स्थानिक वन्यजीव अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी उमरेड कार्यालयाला संपर्क करण्याचा सल्ला दिला. परिसरातील शेतकरी सततची नापिकी, जिल्हा बॅंकेची कर्ज थकबाकीची नोटीस यामुळे त्रस्त असताना आता वन्यजीवांमुळे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जि.प. सदस्य उपासराव भुते, दिगंबर मेश्राम, सुनील डहारे, धनजोडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जीवनलाल डोंगरे, सरपंच दिलीप राखडे आणि निरगुळकर यांनी केली आहे.
 
Blogger Templates