14 Jan 2015

ग्राहकाच्या खात्यातून वटविले सात लाख

बॅंक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध तक्रार
सकाळ वृत्तसेवा
रामटेक, ता. 13 : येथील कापड व्यापारी पंकज हारगुडे यांच्या खात्यात जमा असलेली सात लाखांची रक्कम दुसऱ्या शाखेतील व्यवस्थापकाने परस्पर आपल्या खात्यात वळती केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

पंकज हारगुडे यांनी रामटेक येथील राजेश बांते व कैलास बांते यांच्याकडून घर खरेदीचा व्यवहार केला होता. त्यासाठी त्यांनी बयाणा रक्कम सात लाख रुपये दिले होते. परंतु, काही कारणांनी हा व्यवहार झाला नाही. त्यामुळे राजेश व कैलास यांनी बयाणा म्हणून घेतलेल्या सात लाख रुपये अनुक्रमे तीन लाख, दोन लाख, पाच लाख अशा तीन धनादेशाद्वारे बॅंक ऑफ इंडियाच्या चाचेर (ता. मौदा) शाखेत पंकज हारगुडे यांना दिले. मात्र, हारगुडे यांचे खाते शीतलवाडी शाखेत असल्याने त्यांनी तिन्ही धनादेश सात जानेवारी रोजी तिथे जमा केले. त्यानंतर सात लाख रुपये जमा झाल्याचा बॅंक खात्यातील एसएमएस त्यांना मोबाईलवर आला. 12 जानेवारी रोजी हारगुडे आपल्या पासबुकमध्ये नोंद करण्यासाठी शीतलवाडी शाखेत गेले असता त्यांच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वळविल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. त्यामुळे त्यांनी शाखा व्यवस्थापक सुधाकर देशट्टीवार यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी चाचेर येथील बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कोहाड यांनी सदर रक्कम परस्पर वळती केल्याचे सांगण्यात आले. रक्कम वळती झाल्यानंतर मात्र एसएमएस न आल्याने ही बाब उशिरा उघड झाली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक आगरकर यांच्या मार्गदर्शनात बनमोटे यांनी बॅंकेत जाऊन चौकशी केली. हारगुडे यांनी बॅंकेच्या नागपूर शाखेतही तक्रार दिली आहे. अग्रणी जिल्हा अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशीसाठी शीतलवाडी शाखेच्या व्यवस्थापकास कागदपत्रांसह नागपूरच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते.

शाखा व्यवस्थापकाचे उर्मट उत्तर
प्रतिनिधीने शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधून विचारणा केली असता, देशट्टीवार यांनी कोअर बॅंकिंगमुळे कोणत्याही शाखेतून कोणाच्याही रकमेचा व्यवहार व्यवस्थापक करू शकतो, असे सांगितले. मात्र, ग्राहकाला अंधारात ठेवून कोणतीही सूचना न देता रक्कम वळती कशी झाली, असे विचारले असता देशट्टीवार यांनी "हा माझा प्रायव्हेट मोबाईल आहे. याच्यावर परत कॉल करून नका', असे उर्मट उत्तर दिले.
 
Blogger Templates