पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह : पोलिस पाटलांनाही दिल्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कळमेश्वर, ता. 23 : येथील पोलिस वसाहत निकामी असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी पाहणी केली. त्यांनी वसाहतीचे उर्वरित राहिलेले काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले. या भेटीत पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या डॉ. आरती सिंह यांनी जाणून घेतल्या.
पोलिस अधीक्षकांनी कळमेश्वर पोलिस ठाण्यात पोलिस दरबार, पोलिस पाटील बैठक व जनता दरबार घेतला. त्यांनी पोलिस पाटलांना शासननिर्णयाप्रमाणे त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती करून दिली. गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्या व्यक्तीबाबतची माहिती पोलिस पाटील यांनी ठेवावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत. त्याचबरोबर कुठे अवैध धंदे सुरू आहेत का, याबाबतचीसुद्धा माहिती पोलिस पाटील यांनी ठेवावी, अशा सूचना दिल्या. अवैध धंदे सुरू असल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ संबंधित पोलिस स्टेशनला किंवा पोलिस अधीक्षक यांना देण्यात यावी. आदीबाबत पोलिस पाटील यांनी करावयाच्या कर्तव्याची तसेच जबाबदारीची जाणीव पोलिस अधीक्षक यांनी करून दिली. यावेळी बैठकीत डोरली भिंगारे, सेलू, वाढोणा, सावळी, गोधनी, बोरगाव, गोंडखैरी, घोगली, लिंगा, केतपार, सुसंद्री, खडगाव, निमजी या गावचे पोलिस पाटील उपस्थित होते. त्यानंतर शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा दरबार घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या पोलिसांकडून काय अपेक्षा जाणून घेतल्या. त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश कळमेश्वरच्या ठाणेदारांना देण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी एन. डी. आत्राम, पोलिस निरीक्षक सपकाळ उपस्थित होते.



