5 Dec 2014

ब्राह्मणीत काम न करता उचलली रक्कम

सिमेंट रस्ता कामा एक लाख 75 हजारांचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
कळमेश्‍वर, ता. 29 : दलितवस्ती सुधार योजनेत सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला. या रस्त्याचे काम न करता बनावट बिले सादर करून एक लाख 75 हजारांची रक्कम हडपल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात अनावश्‍यक खर्च व महसुली ठेव जमा न केल्याने ग्रामपंचायतीस देय असलेल्या उर्वरित निधीतून एक लाख 75 हजार 258 रुपये कपात करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे काम न करता बोगस बिले काढणाऱ्या अभियंता व कंत्राटदाराला चांगलीच चपराग बसली आहे. तालुक्‍यात ग्रामपंचायतीअंतर्गत होणाऱ्या रस्त्याच्या तसेच इतर लाखो रुपयांच्या बांधकामत मोठा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र पालटकर यांनी ब्राह्मणी येथील दलितवस्ती विकासकामात होत असलेल्या या प्रकाराची चौकशीची मागणी केली. त्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून शाखा अभियंता व्ही. एस. गोखले यांची नियुक्ती करण्यात आली होती. चौकशीनुसार सिमेंट रस्त्याच्या बांधकामात अनेक त्रुटी आढळल्या. या चौकशी अहवालात वॉर्ड क्रमांक एक, दोन, तीनमधील रस्त्याची जाडी अनुक्रमे 150 मिमी., 135 मिमी, 140 मिमी आहेत. क्‍युब टेस्टसाठी क्रॉकिंटचे ठोकळे तक्रारीनंतर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तिन्ही वॉर्डांतील रस्ता बांधकाम जागेवर अंदाजे 10 वर्षांपर्वूी खडीकरण झाले होते. त्यामुळे पुन्हा त्याच जागेवर खोदकाम व बोल्डरची भराई करण्याचे प्रयोजन चुकीचे असून, याबाबतीची देण्यात आलेली वॉर्ड क्रमांक एकमधील रक्कम 59, 950, वॉर्ड क्रमांक दोनची 43 हजार 50 रुपये, वॉर्ड क्रमांक तीनची 69 हजार 747 रुपये तसेच कामाच्या नावाचा बोर्डचे दोन हजार 511 रुपये असे एकूण एक लाख 75 हजार 258 रुपयांची रक्कम अपरातफर झाली. कामाच्या बोर्डसाठी रक्कम दाखविण्यात आली. मात्र, तोसुद्धा जागेवर लावण्यात आलेला नाही. ही रक्कम उर्वरित देयकातून कपात करण्यात आली असलीतरी न झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी कागदपत्रे तयार करणाऱ्या अभियंत्यावर कोणती दंडात्मक कारवाई केली जाईल, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates