5 Dec 2014

बाबदेव साखर कारखान्याच्या बॉयलर प्रज्वलनाने वाढल्या अपेक्षा



शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित; परिसराच्या आर्थिक विकासाला मिळणार चालना
सकाळ वृत्तसेवा
मौदा, ता. 3 ः बाबदेवस्थित व्यंकटेश्‍वरा पॉवर ऍण्ड शुगर प्रोजेक्‍ट (श्रीराम सहकारी साखर कारखाना) येथे एक डिसेंबरला बॉयलर प्रज्वलनाचा कार्यक्रम कारखान्याचे जनरल मॅनेजर अशोकराव वधुरकर यांच्या हस्ते पार पडला. मोडकळीस आलेला कारखाना सुरू करण्याचे धाडस महाडिक ग्रुप कोल्हापूर यांनी दाखविल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साखर कारखाना सुरू झाल्याने परिसरातील आर्थिक विकासाला चालणार मिळणार आहे.
महाडिक ग्रुपचे कारखाना चालविण्याबाबतचे अनुभव पाहता येत्या काही वर्षांमध्ये साखर कारखाना भरभराटीस येऊ शकतो. सध्या महाडिक ग्रुपद्वारे बेडका (कर्नाटक भीमा सहकारी कारखाना पंढरपूर, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा, जि. कोल्हापूर) हे साखर कारखाने चालवून जास्तीतजास्त उतारा वाढविण्यावर संचालक मंडळाचा भर आहे. याकरिता व्हीएसआय फाउंडेशन सीड आणून ते शेतकऱ्यांना मागील वर्षामध्ये लागवडीकरिता देण्यात आले. हे उच्च प्रतीचे बेणे असून, प्रतिएकरी जास्त उत्पादन घेण्यामध्ये शेतकऱ्यांना मदत होईल. या वर्षी जवळपास 1400 एकरांपेक्षा जास्त लागवड करण्यात आलेली असून, 2015-16 या हंगामात यातील बेणे इतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून मिळाली.
शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस वेळेवर तोडणी करून लवकरात लवकर त्यांना उसाचा चुकारा देण्यावर संचालक मंडळाचा भर राहणार आहे. यावर्षी एक लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, पुढील वर्षी 2.5 ते 3 लाख टन गाळप करण्याचे ध्येय ठेवले आहे. याकरिता साखर कारखान्यातील यंत्रांची क्षमता वाढविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. याकरिता जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्याचे आवाहन करून कारखान्याचे पालक संचालक श्री. गुजर, चेअरमन आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतिपथावर जाईल, असा त्यांनी विश्‍वास व्यक्‍त केला.
बॉयलर प्रज्वलनाच्या कार्यक्रमाला महाडिक ग्रुपचे संचालक राजन शिंदे, लक्ष्मण उमाळे, रामटेक-मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काळमेघ, शिवराजबाबा गुजर, माजी उपसभापती सेंगर, पालक संचालक गुजर, उपविभागीय अधिकारी श्री. बोरकर, तहसीलदार शिवराज पडोळे आदी उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates