4 Dec 2014

अवघड गड भाजपने केला सर

वैशिष्ट्य :
नोटाचा वापर : 9633
बसपचा प्रभाव : उमरेड, हिंगणा, सावनेर
शिवसेनेचा प्रभाव : रामटेक, सावनेर, काटोल, कामठी
---------------------
मतदार संघ....2009........2014
कामठी.........भाजप............भाजप
काटोल.........राष्ट्रवादी.........भाजप
उमरेड .........भाजप............भाजप
हिंगणा.........भाजप.............भाजप
सावनेर........ कॉंग्रेस...........कॉंग्रेस
रामटेक.........शिवसेना.........भाजप

----------------------------------

डी. मल्लीकार्जून रेड्डी, आशिष देशमुख, समीर मेघे पहिल्यांदाच विधानसभेत :
 बावनकुळे, पारवे, केदारांना पुन्हा संधी

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 19 : 2009च्या विधानसभेत केवळ तीन जागी असलेल्या भाजपने यंदा दोनने वाढ करीत सहापैकी पाच मतदार संघावर झेंडा फडकविला. सावनेर मतदार संघात भाजपचा उमेदवार नव्हता. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसने सहज जिंकली. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले असून, अवघड वाटणारा रामटेकचा गडदेखील सर करण्यात यश मिळाले आहे. जिल्ह्यात माजी मंत्री अनिल देशमुख, राजेंद्र मुळक, रमेशचंद्र बंग व विद्यमान आमदार आशिष जयस्वाल या प्रमुख उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला आहे.
------------------------

घड्याळाची टीकटिक थांबली
काटोल
काका-पुतण्याच्या वर्चस्वाच्या लढतीकडे लक्ष लागलेल्या काटोल मतदार संघात प्रथमच कमळ फुलले आणि 20 वर्षांपासूनची घड्याळाची टिकटिक मतदारांनी पाच हजार 557 मतांच्या फरकाने थांबविली. काटोल मतदार संघ पूर्वीपासूनच अनिल देशमुखांच्या ताब्यात होता. येथे त्यांना पराभूत करून वेगळा झेंडा फडविणे शर्थीचे होते. त्यामुळे भाजपने त्यांचेच पुतणे डॉ. आशिष देशमुख यांना रिंगणात उतरविले. त्यातही काकाला पराभूत अवघड समजले जात होते. परंतु, डॉ. आशिष देशमुख यांनी पाच हजार 557 मतांनी विजय मिळविला. त्यांना 70हजार 344 मते, तर अनिल देशमुख यांना 64 हजार 787 मते मिळाली. येथे शिवसेनेचे राजेंद्र हरणे यांनी तिसऱ्या क्रमांकावर 13 हजार 649 मते घेऊन राष्ट्रवादी आणि शेकापच्या उमेदवाराला मागे टाकले आहे. शेकापचे राहूल देशमुख यांना नऊ हजार 589, तर कॉंग्रेसच्या दिनेश ठाकरे यांना केवळ चार हजार 779 मतांवर समाधान मानावे लागले आहे.
-------------------------
40 हजारांचे मताधिक्‍य
कामठी
ऊर्जा आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपदी राहिलेल्या राजेंद्र मुळक यांनी कामठी मतदार संघातून प्रथमच निवडणूक लढली. त्यामुळे येथे विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना अडचण निर्माण होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ही शंका खोटी ठरवित बावनकुळे यांनी तब्बल 40हजार दोन मतांनी पुन्हा विजय मिळविला. गेल्या दोन टर्मपासून ते लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असून, कामठी मतदार संघ भाजपकडेच ठेवण्यात यश मिळविले आहे. बावनकुळे यांना एक लाख 26 हजार 755 मते, मुळक यांना 86 हजार 753 मते मिळाली. शिवसेनेचे तापेश्‍वर वैद्य यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन होईल, अशी शक्‍यता असतानाही बावनकुळेंचे जनाधिक्‍य आजच्या मतमोजणीतून सिद्ध झाले. वैद्य यांना केवळ 12 हजार 791, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. महेंद्र लोधी यांना फक्‍त 752 मते मिळाली. सर्व जाणकारांचे अंदाज चुकवून बावनकुळे यांना मतदारांनी मोठ्या विश्‍वासाने मताधिक्‍य दिले आहे.
--------------------------
बसपच्या चालीतही कमळ फुलले

उमरेड
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरेड मतदार संघात विद्यमान आमदार सुधीर पारवे यांना पराभूत करण्यासाठी 15 उमेदवार रिंगणात होते. त्यातही पारवे यांनी 92 हजार 399 मते घेऊन पुन्हा विजयी मिळविला. विशेष म्हणजे, येथे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसेचे उमेदवार असतानाही बसपच्या रुक्षदास बनसोड यांनी पारवे यांना लढत दिली. बसपच्या हत्तीच्या चालीने सर्वच मोठ्या पक्षाच्या उमेदवारांना मागे खेचून त्यांना अल्पशा मतावर समाधान मानायला लावले. सुधीर पारवे यांनी 58 हजार 322 मतांनी विजय मिळविला. प्रतिस्पर्धी रुक्षदास बनसोड यांना 34 हजार 77 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजू पारवे यांनीदेखील अनेक वर्षांपासून मतदार संघाची बांधणी केली होती. त्यामुळे राजू पारवे यांना 23 हजार 497 मते मिळाली. उर्वरित कॉंग्रेसचे संजय मेश्राम यांना 17 हजार 586, शिवसेनेच्या जगन्नाथ अभ्यंकर यांना सात हजार 180, तर राष्ट्रवादीचे रमेश फुले यांना केवळ दोन हजार 747 मते मिळाली.
-------------------------------
नवख्याने जिंकला गड

रामटेक
शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या रामटेकचे तीनदा प्रतिनिधीत्व करणारे ऍड. आशिष जयस्वाल यांना पराभूत करणे अवघड समजले जात होते. मात्र, भाजपचे डी. मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पहिल्याच प्रयत्नात हा गड जिंकला. रेड्डी यांनी आशिष जयस्वाल यांचा 12 हजार 81 मतांनी पराभव केला. विजयाच्या शर्यतीत कॉंग्रेसचे सुबोध मोहिते, राष्ट्रवादीचे डॉ. अमोल देशमुख होते. मात्र, त्यांनाही तग धरता आली नाही. रेड्डी यांना 59 हजार 343, आशिष जयस्वाल यांना 47 हजार 262, तर मोहिते यांना 35 हजार 546 मते मिळाली. येथे बहूजन समाज पक्षाचे विशेष फुटाणे यांना आठ हजार 601, मनसेचे वाडिभस्मे यांना दोन हजार 343 मतांवर समाधान मानावे लागले.
-------------------------
मताधिक्‍य तरुणनेतृत्वाच्या हाती
हिंगणा
विद्यमान आमदार विजय घोडमारे यांच्याजागी भाजपने नव्या उमेदवाराची निवड करून हिंगणा मतदार संघ गमावेल, अशी चर्चा असताना भाजपचे समीर मेघे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेशचंद्र बंग यांचा धक्‍कादायक मतांनी पराभव केला. बंग यांनी यापूर्वी येथे प्रतिनिधीत्व केले असल्याने मतदारसंघात त्यांची पकड मजबूत होती. अशातही नवख्या समीर मेघे यांनी भाजपचा गड राखण्यात यश मिळविले आहे. मेघे 23 हजार 158 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. त्यांना 84 हजार 139 मते, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेशचंद्र बंग यांना 60 हजार 981, कॉंग्रेसच्या कुंदा राउत यांना 20 हजार 450 मते मिळाली.
या मतदार संघात शिवसेना आणि मनसेचे प्रभावी उमेदवार असतानाही बसपच्या हत्तीचा प्रभाव दिसून आला. बसपचे भदन्त महापंत यांना चौथ्या क्रमांकाची 19 हजार 450 मते मिळाली. बंग यांना केवळ रायपूर परिसरात बऱ्यापैकी मते मिळाली. उर्वतरित मतदार संघातील गावांत भाजपने यश मिळवित विजय खेचून आणला.
-----------------------
कॉंग्रेसची सत्ता कायम

सावनेर
यंदातरी सावनेर मतदारसंघ आपल्या ताब्यात येईल, अशी स्वप्ने रंगविणाऱ्या भाजपला मतदानापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आणि कॉंग्रेसच्या सुनील केदार यांच्या विजयाचा मार्ग सुलभ झाला. प्रचाराच्या अखेरच्या क्षणी भाजपने शिवसेनेला पाठिंबा देऊन केदार यांना पराभूत करण्यासाठी पूर्णताकदीनिशी प्रयत्न चालविला. मात्र, केदार यांनी नऊ हजार 209 मतांनी विजय मिळविला. जिल्ह्यातून विजयी झालेले ते कॉंग्रेसचे एकमेव उमेदवार ठरले. भाजपची साथ मिळाल्याने शिवसेनेच्या विनोद जिवतोडे यांना 75 हजार 421 मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किशोर चौधरी रिंगणात असतानाही येथे बसपच्या हत्तीने मजल मारली. बसपच्या सुरेश डोंगरे यांना 11 हजार 97, तर किशोर चौधरी यांना केवळ सहा हजार 139 मतांवर समाधान मानावे लागले. येथे 15 उमेदवार रिंगणात असतानादेखील दोन हजार 681 मतदारांनी "नोटा'ची बटन दाबली हे विशेष. 

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates