4 Dec 2014

पारधी समाजातील बेरोजगारांना सन्मानाचे जिणे द्या!

आदिवासी पारधी विकास परिषदेने घेतली नितीन गडकरींची भेट
सकाळ वृत्तसेवा
हिंगणा, ता. 3 ः डोंगरदऱ्यांत वस्ती करून वर्षानुवर्षे राहत आलेला पारधी समाज नेहमीच समाजात दुर्लक्षित राहिलेला आहे. मात्र त्यांच्या वस्तीतही आता शिक्षणाची गंगा वाहायला लागली आहे. परंपरागत व्यवसायावर अंकुश लागल्यामुळे त्यांचे लाजिरवाणे जिणे तर संपले, परंतु दुसऱ्या बाजूने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला. शेती, हातमजुरी करून इतर समाजाच्या बरोबरीने ताठ मानेने जगू पाहणारा हा समाज मुलांना शिक्षण देण्यासाठी सरसावल्याचे समाधानकारक चित्र आहे. परिणामी समाजात अनेक उच्चशिक्षित तरुण निर्माण झालेत. त्यांना हव्या आहेत रोजगाराच्या संधी. आदिवासी पारधी विकास परिषदेच्या वतीने नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा करण्यात आली. गडकरी यांनी 20 डिसेंबरनंतर सविस्तर चर्चेसाठी त्यांना पाचारण केले आहे.

कोणे एके काळी पारधी समाज हा रानावनात भटक होता. वन्यपशूंची शिकार करणे, मोहफुलांची दारू काढणे, जंगलातील साधनसामग्रीवर त्यांची उपजीविका चालत होती. परंतु, नंतर या समाजाने परिवर्तनाची कास धरली. पारंपरिक धंदे सोडून त्यांनी आत्मसन्मानाने जगणे पसंत केले. मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाज बऱ्यापैकी स्थिरावला. बेड्यांचा आश्रय सोडून पारध्यांनी गावात राहणे पसंत केले.
नागपूर जिल्ह्यात सुमारे तीसच्या जवळपास त्यांच्या वस्त्या उभ्या आहेत. वीस हजारांच्या घरात त्यांची लोकसंख्या आहे. हिंगणा तालुक्‍यातील शेषनगर, तांडा आदी वस्त्या याची साक्ष देतात. परंतु शासनाने वन्यप्राण्यांच्या शिकारीवर बंदी आणली. मोहफुलांची दारू काढून विकणे बंद केले. त्यामुळे केवळ शेतीवरच ते उदरनिर्वाह करू लागले. या गावांत शाळा आहेत. तेथून प्राथमिक शिक्षणानंतर तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन पदवीपर्यंत व तांत्रिक शिक्षण घेतलेले तरुण आता रोजगार मिळविण्यासाठी धडपडत आहेत. यासाठी शासनाने योग्य पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. नागपूर जिल्ह्यात मिहान, मौदा येथील एनटीपीसीसारख्या उद्योगात त्यांना नोकऱ्या देण्यात याव्या, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री गडकरी यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष बबन गोरामन, सदस्य राजेश भोसले, शिवसजन राजपुत, सोनू गोरामण, ग्यानेश पवार व पारधी समाज युवा विकास परिषदेचे आतिश पवार यांची उपस्थिती होती.

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates