23 Jun 2015

उमरेड

चांप्यातील छाप्यात 10 जणांविरुद्ध गुन्हे 
20/6/2015 
उमरेड : तालुक्‍यातील चांपा येथे शुक्रवारी (ता. 19) पोलिसांनी घातलेल्या छाप्यात अवैध मोहफूल दारूभट्टी चालविणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेऊन एकूण सहा लाख 62 हजारांचा माल जप्त केला.
उमेरड-कुहीच्या सीमेवर असलेल्या चांपा येथे अवैधरीत्या दारूभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अप्पर पोलिस अधीक्षक अमित काळे, उमरेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकरसिंह राजपूत, उमरेडचे ठाणेदार संजय पवार, भिवापूरचे ठाणेदार मनिष दिवटे, कुहीचे ठाणेदार सुभाष काळे, वेलतूरचे ठाणेदार द्वारकानाथ गोंदके, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, भुसारी, वर्षा वंजारी, अनामिक मिर्झापुरे, विजयसिंग परिहार यांच्यासह 200 महिला-पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा चांपा येथे गेला. गावातील प्रत्येक घरी जाऊन झडती घेण्यात आली. त्यात 163 डममध्ये 10,276 लिटर मोहाफूल साडवा, दोन बोरी मोहा, 770 लिटर मोहाफूल दारू, 50 टन जळाऊ लाकूड असा एकूण सहा लाख 62 हजारांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत 10 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले. या सर्वांचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार काळे करीत आहेत. यावेळी उमरेडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, उमरेडचे तहसीलदार चंद्रभान खंडाईत, नायब तहसीलदार श्री. अल्लेवार, चांपा गावाच्या तलाठी प्रियंका अलोणे, चांपाचे पोलिस पाटील श्री. नगराळे, उटी गावचे आत्राम उपस्थित होते.


अनियंत्रित ट्रकची रेल्वे फाटक, कारला धडक

उमरेड,18/6/2015
 गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नागपूरकडून भिवापूरकडे जाणाऱ्या अनियंत्रित ट्रकने (क्रमांक एमएच 34एम8685) रेल्वे फाटक तोडून मोटारसायकल, स्कूटर व कारला धडक दिली व पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला तो पलटल्याची घटना घडली.
नागभिडवरून नागपूरकडे जाणारी रेल्वे उमरेडला साडेसहा वाजता येते. त्यासाठी गेटमनने सव्वासहा वाजता फाटक बंद केले. त्यादरम्यान एक ट्रक भरधाव व निष्काळजीपणाने रेल्वे गेट तोडून गेटच्या पलीकडे असणाऱ्या मोटारसायकल (एमएच 40एल2504), बजाज स्कूटरला (एमएच31ए8985) धडकला. त्यात मोटारसायकल व स्कूटरचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर गडचिरोलीवरून नागपूरकडे जात असलेल्या फोर्ड कारला तो जोरात जाऊन धडकला. फोर्ड कारमध्ये चालक शहीद पटेल, रा. उमरेड व गडचिरोली येथील शाखा अभियंता अरुण जयपाल कुंभरे (वय 42, रा. गडचिरोली), त्यांच्या पत्नी अंजली कुंभरे (वय 34), मुलगा अगस्त कुंभरे (वय साडेतीन) आणि पिंकी पेंदोरे (वय 28) हे ट्रक कारवर येत असताना पाहून जीव मुठीत घेऊन बसून राहिले. कारचा समोरचा भाग चक्काचूर करून ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला. कारमधील सर्व प्रवासी, मोटारसायकलस्वार हे किरकोळ जखमी झाले. ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. स्कूटरचालकाचा पत्ता लागला नाही. ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की ट्रकने धडक दिलेली तिन्ही वाहने या अपघातात चेंदामेंदा झाली.

गेटमनची सतर्कता
गेटमनच्या सतर्कतेमुळे फार मोठी दुर्घटना टळली. गेटमेन राकेश वसंता देवतळे यांनी ट्रकने रेल्वे गेटला ध
डक देताच रेल्वे गेटपासून 150 मीटरवर असलेल्या रेल्वेला ताबडतोब सावधतेने थांबविले. त्यामुळे फार मोठी हानी टळली. या अपघातामुळे वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. पुढील तपास उमरेड पोलिस करीत आहेत.
 
Blogger Templates