नोकरीच्या नावावर फसवणूक खापरखेडा : धुर्वे इन्प्रो. एज्युकेशन, अहमदनगरच्या
चार शिक्षकांनी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 1 लाख 9 हजार 900 रुपयांनी
फसवणूक केली. नोकरीसाठी संगीता तुळशीराम नखाते (वय 28) यांच्याकडून 50 हजार,
चित्रलेखा नखाते यांच्याकडून 50 हजार, नीतेश घुगल यांच्याकडून 9 हजार 900 रुपये
घेतले. या सर्वांना बीड येथील शाळेत नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. प्रत्यक्षात
कुणालाही नोकरी लागलेली नाही. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून
खापरखेडा पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
सावनेरात नऊ सर्प तस्करांना अटक
राज्यस्तरीय तस्कारांचे जाळे उघडीस येण्याची
शक्यता
सावनेर/खापा, ता. 19 : सावनेर येथील खेडकर ले-आउटमध्ये राहणाऱ्या
भोंडे यांच्या घरी खापा वनपरिक्षेत्राचे प्रमुख रविंद्र घाडगे यांच्या
नेर्तृत्वातील पथकाने छापा घातला. यात विषारी नाग, घोनस, फुकरी, चापडा, अजगर,
डेक्कन गेको (पाल प्रजाती), एक दुर्मिळ बेडूक, तस्कर प्रजातीच्या सर्पाची सहा अंडी
जप्त करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले.
खापा वनपरिक्षेत्र
अधिकारी यांना मानद वन्यजीव रक्षकाकडून गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार भोंडे
यांच्या घरासमोर पाळत ठेवण्यात आली. रविवारी या घरी अनेक तरुण आले होते. त्यामुळे
सापळा रचून छापा घालण्यात आला. यात रजत मनोहर तोरपुडे (वय 19, कुही मांढळ), मयूर
मनोहर सोमदिवे (वय 23, नागपूर), गणेश यशवंत कबाडे (वय 31), योगेश विट्ठल भंडारे (वय
23), राहूल सदाशिव शिवले (वय 26), सोमनाथ खडसे (वय 37), साईदास शंकर पुसळ (वय 22),
सर्व राहणार पुणे, तर अभिषेक भास्कर पाठक (वय 18 ब्रह्मपुरी) यांना ताब्यात घेण्यात
आले.
या सर्वांनी सरपटणाऱ्या वन्यप्राण्यांना प्लास्टिकच्या डब्यात डांबून
ठेवले होते. पुणे, चंद्रपूर, नागपूर, भंडारा येथून आणलेले विविध जातीचे साप या घरी
ठेवून देवाणघेवाण करीत होते. यावरून हे राज्यस्तरीय टोळी असल्याचा संशय असून,
आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध आहे का, याची चौकशी वनाधिकारी जप्त मोबाइलच्या
टाड्यातून करीत आहेत. अधिक तपास रविंद्र घाडगे, डी. एच. टेकाडे, आर. एम. बहुरे, एम.
के. शिंदे, एम. एस. कुलकुले करीत आहेत.
माहिती अधिकाऱ्याची "अशीही बनवाबनवी' 2014 चे कागदपत्रे 2012 मध्ये जळाल्याचे
दिले उत्तर
सावनेर, ता. 19/०७/२०१५ : शहराच्या मध्यभागी
असलेल्या एका जागेसंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्त्याने 9 सप्टेंबर 2014 नंतरचे
कागदपत्र मागितले. ही फाईल शाबूत असतानाही मंत्रालयातील अधिकाऱ्याने सदर फाईल 2012
मध्ये लागलेल्या आगीत जळाल्याची माहिती उत्तरादाखल दिली. दुसरीकडे हीच माहिती
मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली. यावरून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संशय
निर्माण होत आहे.
सावनेर खसरा नंबर 1,2,3,11ची 15 एकर जागा 2007 पासून
नगरपालिकेतर्फे आठवडी बाजार व उद्यानाकरिता मागण्यात आली. परंतु, 2011 मध्ये ही
जागा मेसर्स ओम साई बिल्डर यांनी घेतली. त्या शेतीच्या मूळ मालकाच्या नावे कृषी
विभागातील जमीन रहिवासी क्षेत्रात रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला
होता. प्रादेशिक विकास आराखड्यानुसार ही जमीन कोल बेल्टमधे दाखविली आहे. शिवाय अनेक
त्रुटी असतानाही तत्कालीन कॉंग्रेस शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी 9 सप्टेंबर
2014 रोजी ही जमीन कृषी विभागातून वगळून रहिवासी क्षेत्रात रूपांतर करण्याची
अधिसूचना काढली.
नवीन सरकार बसताच सावनेर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणात चौकशीची मागणी केली.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणात नगरविकास विभागाकडे अहवाल मागविला. तेव्हा
सदर नस्ती 21 जून 2012 रोजीच्या मंत्रालयात झालेल्या अग्नी दुर्घटनेत नष्ट झाल्याचे
सांगण्यात आले. त्यानंतर नवीन नस्ती तयार करून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सादर
करण्यात आली. परंतु, याच नस्तीचे सप्टेंबर 2014 पर्यंतची कागदपत्रे एका माहिती
अधिकार कार्यकर्त्याने मागितली होती. ही कागदपत्रे आरटीआय कार्यकर्त्याला नगर विकास
विभागातील कक्ष अधिकारी संजय बारई यांनी जुनी नस्ती क्र. 2408 नुसार 9/9/2014
पर्यंतचे कागदपत्रे दिले. त्यानंतर कार्यकर्त्याने 9/9/2014 नंतरची कागदपत्रे
मागीतले. तेव्हा ही फाईल शाबूत असतानाही सदर फाईल 2012 च्या मंत्रालयात झालेल्या
अग्नी दुर्घटनेत जळाली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्त्यास देण्यात आली. हीच
माहिती मुख्यमंत्री कार्यालयालाही देण्यात आली. यावरून जुनी नस्ती उपलब्ध असतानाही
नवीन नस्ती तयार करून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या
भूमिकेबद्दल संशय निर्माण होत आहे.
वृद्धाश्रमात वृद्धांना देतात निकृष्ट जेवण
सावनेर येथील स्वामी विवेकानंद
वृद्धाश्रमातील प्रकार
सावनेर, 18/07/2015: आधार नसलेल्या वृद्धांना शुल्क
भरून दाखल केल्यानंतरही वृद्धाश्रमाच्या संचालकाकडून निकृष्ट भोजन दिले जाते.
सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमात भाजीमध्ये बाजारातील फेकलेल्या सडक्या
पालेभाज्यांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
येथील खापा
मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल ऍण्ड एज्युकेशन सोसायटीद्वारे
स्वामी विवेकानंद वृद्धाश्रम चालविण्यात येते. स्त्री व पुरुष असे एकूण 30 वृद्ध
येथे राहतात.
मागील एक महिन्यापासून येथील भोजन निकृष्ट असल्याची ओरड सुरू आहे.
परिवारातून विभक्त झालेल्या या वृद्धांना आता आधार नाही. त्यामुळे भोजनाविषयीची
तक्रार कुणी केलेली नाही. यंदाच्या उन्हाळ्यात येथील वृद्धांसाठी कुलरही लावण्यात
आला नव्हता. येथील एक पंखाही काही महिन्यांपासून बंद आहे. त्याची अजूनपर्यंत
दुरुस्ती झाली नाही. वृद्धाश्रमात दाखल होताना दोन हजार रुपये शुल्क भरण्यात येतात.
मात्र, सोयी-सुविधाच मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. या वृद्धाश्रमाचे अधीक्षक
धर्मदीप उके हे फेकलेला भाजीपाला उचलून आणून स्वयंपाकी सत्यभामा वाघमारे
यांच्याकडून धुऊन स्वयंपाक करवून घेतल्याचा आरोप होत आहे. येथे स्मिता चन्ने, अल्का
पटनाईक, कोमल कुंभलकर, सुरेखा रहागडाते आदी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र,
वृद्धाच्या सुविधांसाठी कुणीही कार्य करीत नसल्याची माहिती आहे. |
पोटा ग्रामपंचायतीची रणधुमाळी शिगेला महिला आरक्षणाने पुरुषांचे समीकरण बिघडले
खापरखेडा : सावनेर तालुक्यात 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत
असून, पोटा येथे निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सहा वॉर्ड आणि 17 सदस्य
संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत महिला आरक्षणाने पुरुषांचे समीकरण बिघडले आहे. 2010
मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केदार गटाचे 9, भाजप 8 व एक अपक्ष एक निवडून
आला होता. आता सरपंचपद आरक्षण सोडतीत सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे
प्रत्येकजण आपल्या श्रीमतीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची प्रयत्नशील आहे.
विविध पक्षाच्या मातब्बर कार्यकर्त्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यंदा केदार
गट, भाजप, आरपीआय, शिवसेना यांच्यातच मुख्य लढत होईल. भाजप, आरपीआय, शिवसेना यांची
युती झाल्याची माहिती आहे. नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे.
त्यामुळे सोमवारी गर्दी वाढेल. केदार गटातील माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अरुण
ठाकरे व काही महिला कार्यकर्त्या तिकीट वाटपावरून नाराज असल्याची माहिती सूत्राकडून
मिळाली. त्यामुळे आपली वेगळी चूल मांडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाटणसावंगी येथील
आमदार सुनील केदारांच्या बंगल्यावर तिकीट वाटपावरून शनिवारी प्रमुख कार्यकर्त्यांची
बैठक झाली. त्यात त्यात अनेकांची नाराजी लक्षात घेऊन अंतिम निर्णय झाला नाही. |