12 Feb 2015

कामठीत हजारो टन कचरा रस्त्यावर

कामठी - डॅगेन पॅलेस टेंपल आणि सैनिक छावणीमुळे ओळख निर्माण करणाऱ्या कामठी शहरातील हजारो टन कचरा रस्त्यावर पडून असल्याने स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाला आहे.
कामठी शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी येथील नागरिकांची न.प. प्रशासनाकडून अपेक्षा होती. नगर परिषद कचरा संकलनात नापास झाल्याचे विदारक चित्र इकडे-तिकडे पाहायला मिळत आहे. कामठी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. परंतु, काम कागदोपत्रीच दाखविले जाते. शहरात एकूण 220 सफाई कामगार मंजूर आहेत. यापैकी केवळ 195 कामगारच सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यापैकी काही कामगारांना वाहनचालक, काहींना जमादार, तर काहींना कार्यालयाचे लिपीक म्हणून नियुक्त करण्यात आले. यापैकीच काही कामगारांचा करवसुलीसाठी व इतर कामांकरिता उपयोग केला जात आहे. सफाईचे काम करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी वेगवेगळ्या हुद्द्यांचे अधिकारी नेमले आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासन दर महिन्याला लाखो रुपये पगारापोटी खर्च करते. एवढे करूनही कामठीकरांच्या नशिबी कचराच असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, ही कल्पना कामठीवासींसाठी दिवास्वप्नच ठरली आहे. शहरातील रस्ते आणि प्रत्येक चौक कचऱ्याने अक्षरशः विद्रूप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशाला स्वच्छतेची हाक दिली. या हाकेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये कचरा गेल्या अनेक दिवसांपासून पडून आहे.

साथरोगांचा प्रसार
शहरात विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू लागले आहेत. कचऱ्यामध्ये पालेभाज्या, फळे, अन्न आदींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कचऱ्याच्या ढिगांवर माश्‍यांची निर्मिती होते. त्या माश्‍या परिसरातील घरांत, हॉटेलमध्ये असलेल्या पदार्थांवर बसतात. तेच पदार्थ अनेक जण सेवन करीत असल्याने आजार होत आहेत. ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि कचऱ्यामुळे कावीळ, डेंग्यू, चिकुनगुनिया, टायफॉईड, सर्दी, खोकला, हिवताप आदी साथींचे आजार नागरिकांना होऊ लागले आहेत.
 
Blogger Templates