अतिक्रमणाचा विळखा वाढला; शासनाकडे निधीच नाही
मौदा, ता.9 ः वाढत्या अतिक्रमणामुळे पांदण रस्ते अरुंद झालेले आहेत. यामुळे शेतात बैलबंडी, शेतीची अवजारे नेताना त्रास सहन करावा लागतो. दोन शेतामधून जाणारे पांदण रस्ते अनेक शेतकऱ्यांच्या शेताला जोडत होते. परंतु, रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे आज हे रस्ते नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. आज शेती व्यवसायात ट्रॅक्टर आलेत. धुरा नावाचा प्रकार संपुष्टात आला. पूर्वीच्या काळी प्रत्येक शेताचा धुरा 1 ते 2 मीटरपर्यंत असायचा. या धुऱ्यावर उगवलेले गवत गुरांसाठी चारा म्हणून उपयोगी यायचे. परंतु, अलीकडे शेतकऱ्यांनी चराऊ कुरणाच्या जागी पीक घेणे सुरू केल्यामुळे चराऊ कुरणांचे क्षेत्र घडले आहे. पांदण रस्ते नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना एकमेकांच्या शेतातून जावे लागते.
शेतकऱ्यांमध्ये वादविवाद, भांडणे विकोपाला गेलेली आहेत. दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांनी पांदण रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील गावखेड्यात आज शेकडो किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते दुरवस्थेत आहेत. परंतु, शासनाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे हे रस्ते आजही दुर्लक्षित आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर या रस्त्यावरून बैलबंडी नेणेही कठीण झाले आहेत. या रस्त्यांचा मार्ग जर सुकर केला तर शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल, असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र लांडे यांनी व्यक्त केली.



