4 Dec 2014

टाकाऊ वस्तूंपासून साकारला चित्राविष्कार


लीलेश्‍वर हजारे : अपंगत्वानंतरही कोलाज चित्रकलेत रममाण


चंद्रकांत श्रीखंडे : सकाळ वृत्तसेवा
कळमेश्‍वर, ता. 2 : टाकाऊ कागद, कापड, वाळलेली पाने यापासून साकारलेली सुंदर कलाकृती म्हणजे कोलाज. या कलेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धडपडणारे लीलेश्‍वर एकनाथ हजारे यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून राज्यात नावलौकिक मिळविला. स्थानिक नगर परिषद हायस्कूलमधून कला शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना भोवळ येऊन अपंगत्व आल्याने सध्या अंथरुणाला खिळले आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही ते कलेत रममाण असतात.
कोलाज हा मूळ शब्द फ्रेंच भाषेतील आहे. कोलाज म्हणजे चिकटविणे. ब्राक व पिकसो या जगप्रसिद्ध चित्रकारांनी आपल्या चित्रात कोलाज पद्धती रूढ केली. चित्रात केवळ रंगलेपणाचाच वापर न करता इतर टाकाऊ वस्तू जोडून एक वेगळ्या प्रकारचा चित्राविष्कार साधता येतो. यात नुसत्या कागदपत्रांच्या तुकड्यांचाच वापर नाही, तर अन्य टाकाऊ वस्तू चिकटवून सुंदर कलाकृती तयार करता येते, हे हजारे यांच्या कलेतून दिसून येते. त्यांनी आपल्या कलेत विविध रंगीत कागदांचा वापर केला. कागदातील रंग, त्यांतील चमक, पोत आदींचा योग्य पद्धतीने वापर करून अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. रंगीत कापडांचाही वापर करताना रंगसंगती व आकाराचा तोल साधताना कौशल्य दिसून येते. हजारे यांच्या कलाकृतीत प्लास्टिकच्या वस्तू, जिलेटीन, पारदर्शक रंगीत कागद, वाळलेली पाने, चमकदार टिकल्या, बांगड्यांचे तुकडे, प्लायवूड, लोकरीचे दोर, सूत यांना फेव्हिकॉल, सिरसा, डिंग याच्या माध्यमातून एकजीव केले आहे. हजारे यांच्या मार्गदर्शनात घडलेले विद्यार्थी जाहिरातक्षेत्रातही चमकत आहेत. त्यांनी मुंबई, पुणे, जालना, नागपूर, कळमेश्‍वर येथे चित्रांचे प्रदर्शन भरविले. सध्या अपंगत्व असतानाही ते आपल्या कलेपासून दूर गेले नाहीत. नवयुवकांना मार्गदर्शन आणि नवीन कलाकृती घडविण्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे. 

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates