23 Feb 2017

नागपुरात भाजपची त्सुनामी



नागपूर : नागपूर महापालिका भाजपला 100 आसपास जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे पराभूत झाल्याने कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे.
नागपुरात कॉंग्रेसमध्ये असलेली गटबाजी व भाजपच्या विकास कामांच्या अजेंड्यामुळे नागपुरात भाजपला बहुमत मिळेल, असे चित्र होते. तरीही गेल्या 10 वर्षांपासून असलेल्या भाजपच्या कारभाराबद्दलचा असंतोषाचा फायदा कॉंग्रेसला काहीसा मिळेल, असा दावा केला जात होता. परंतु कॉंग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे कॉंग्रेसला चांगलाच फटका बसला आहे.
भाजपला जवळपास 100 जागा मिळेल, असे दुपारचे चित्र होते. भाजपच्या विकास कामांच्या अजेंड्याला नागपूरकरांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून फडणवीस व गडकरी यांचा प्रभाव आणखी वाढला आहे.
तिकीट वाटपांमध्ये संघ परिवारांमध्ये बंडखोरी झाली होती. ही बंडखोरी मोडून काढण्यात भाजपच्या चाणक्‍यांना यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. संघ परिवारातील विशाखा जोशी, श्रीपाद रिसालदार, प्रसन्न पातूरकर यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही.
गटबाजीचा फटका कॉंग्रेसला नागपुरात सोसावा लागला. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व विकास ठाकरे यांच्या विरोधात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांनी दंड थोपटले आहे. या दोन नेत्यांनी कॉंग्रेसच्या साऱ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. उमेदवारी निश्‍चितीमध्ये सुद्धा या नेत्यांचे मतभेद दिसून आले. याचा फटका कॉंग्रेसला सर्वच प्रभागांमध्ये पाहायला मिळाले. कॉंग्रेसचे प्रशांत धवड, गुड्डू तिवारी या नगरसेवकांना सुद्धा पराभव चाखावा लागला आहे.
बंडू राऊत पराभूत
स्थायी समितीचे अध्यक्ष व नितीन गडकरी यांचे विश्‍वासू बंडू राऊत यांचा पराभव आजच्या निकालाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागले. सगळीकडे भाजपचे उमेदवारी विजयी होत असताना महाल भागातील गडकरी यांच्या प्रभागातच बंडू राऊत यांना पराभव पाहावा लागला. नागपूर शहर युवक कॉंग्रेसचे बंटी शेळके या युवा नेत्याने त्यांचा पराभव केला.

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates