3 Dec 2014

मनसर येथे संग्रहालय बांधणार का?

न्यायालयाची पुरातत्त्व विभागाला विचारणा : उत्खननात सापडल्या दोन हजार 766 मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 27 : मनसर येथील उत्खननात सापडलेल्या ऐतिहासिक दोन हजार 766 मूर्तींचे संवर्धन करून संग्रहालय बांधणार का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुरातत्त्व विभागाला केली. यावर आठवड्याभरात अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला दिले.

वाकाटक संस्कृतीतील मूर्तींचे आणि अन्य वास्तूंचे जतन करून संग्रहालय तयार करावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. येथील 100 एकर जागेवरील अतिक्रमण काढून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला दिले होते. पण, अद्याप प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नाहीत, असा दावा याचिकाकर्त्याचे वकील श्‍याम देवानी यांनी केला. येथील मूर्ती संरक्षित असल्याचा दावा नागार्जुन बोधिसत्त्वाचे वकील आकाश मून यांनी केला. 1988 ते 2008 या कालावधीत अनेक मूर्ती आणि वास्तू येथे सापडल्या आहेत. मूर्ती, वास्तुसंवर्धन आणि संरक्षण न झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. पाणी आणि उष्णतेचा मारा होत असल्यामुळे मूर्तींचा रंग काळा पडला असून काही ठिसूळ झाल्या आहेत. ऐतिहासिक वास्तूंच्या नामशेषास पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत असल्याचा दावा याचिकेत आहे. पुरातत्त्व विभागाकडून ऍड. सुरेंद्र गडलिंग कामकाज सांभाळत आहेत.


पॅरिसच्या धर्तीवर संग्रहालय हवे
मूर्ती आणि वास्तूंचे संवर्धन करून लंडन आणि पॅरिसच्या धर्तीवर संग्रहालय तयार करावे, जेणेकरून पर्यटनाला वाव मिळण्यास मदत होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. यासाठी जागेचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला दिले आहेत. 

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates