निकीता राऊतने मारली बाजी, पुरुषांत भंडाऱ्याचा नितेश जगनाडे अव्वल
आंतर महाविद्यालयीन स्पर्धा
नागपूर, ता. 11 ः अभ्यासात हुशार असलेल्या मोहता विज्ञान महाविद्यालयाच्या निकीता राऊतने आपण मैदानावरही अव्वल आहो, हे दाखवून देताना रविवारी सकाळी झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या पाच किलोमीटर शर्यतीत बाजी मारली. विज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या धावपटूने प्रथम स्थान मिळविण्याची ही स्पर्धेच्या इतिहासातील पहिलीच वेळ होय. पुरुषांत जे. एम. पटेल भंडारा येथील नितेश जगनाडे अव्वल ठरला.
महिलांत निकीता राऊत आणि एस. बी. सिटीची शितल बारई यांच्यात चुरस अपेक्षीत होती. चार किलोमीटरपर्यंत शितल आघाडीवर होती. त्यानंतर निकीताने जोर लावला आणि प्रथमच आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत विजेतेपद मिळविले. बीएससी द्वितीय वर्षाला असलेल्या निकीताला गेल्यावर्षी पाचव्या तर शितलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. खरबी येथे राहणाऱ्या निकीताचे वडील इतवारी येथील एका हॉटेलात वेटर म्हणून नोकरी करतात. या शर्यतीत 134 पैकी 122 धावपटूंनी शर्यत पूर्ण केली.
पुरुष विभागात फारशी चुरस नव्हती. भंडारा जिल्ह्यातील ढिवरवाडा येथील असलेला व जे. एम. पटेल भंडाऱ्याचे प्रतिनीधीत्व करणारा नितेश जगनाडे व आर. एस. मुंडले धरमपेठचा शेषराव राऊत पाच किलोमीटरपर्यंत सोबत धावत होते. त्यानंतर शेषराव थोडा मागे पडला. तिथून नितेशने आघाडी घेतली व शेवटपर्यंत कायम ठेवत प्रथमच विजेतेपद मिळविले. भंडाऱ्याचा असला तरी नागपूरात सराव करणाऱ्या नितेशला गेल्यावर्षी आठवे स्थान मिळाले होते. यात 169 पैकी 160 धावपटूंनी शर्यत पूर्ण केली.
शर्यतीनंतर सीए आनंद धोका यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. धनंजय वेळूकर, विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक रविंद्र पुंडलीक, प्रा. अविनाश पानतावणे, विजय दातारकर, माधवी मार्डीकर, सुरेंद्र तिवारी उपस्थित होते. संचालन शरद सूर्यवंशी यांनी केले. यंदा 28 ऑक्टोबर रोजी राजीव गांधी आरोग्य विद्यापीठ बंगळूरच्या यजमानत्वाखाली अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा होणार आहे. त्यासाठी पुरुष विभागातील प्रथम नऊ आणि महिला विभागातील प्रथम सहा धावपटूंची विद्यापीठ संघात निवड होईल.
निकाल (पुरुष-12.5 किलोमीटर) ः नितेश जगनाडे (जे.एम. पटेल भंडारा-41 मि.34 सेकंद), शेषराव राऊत (आर. एस. मुंडले धरमपेठ - 42 मि.14 सेकंद), अक्षय मोहिते (एस. बी. सिटी -43 मि.14 सेकंद), जसबीर सिंग (जेसीपीई), कमलेश रंगारी (बॅरीस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा), राजकुमार (श्रीकृष्ण महाविद्यालय वर्धा), शुभम मेश्राम (जे. एम. पटेल भंडारा), देवेंद्र राणा (नवप्रतिभा), रणजीत बेंडे (जेसीपीई), सुरज तिवारी (चक्रपाणी महाविद्यालय).
सांघिक ः जेसीपीई - 80 गुण, एनएमडी गोंदीया - 227 गुण, नबीरा महाविद्यालय काटोल - 275 गुण.
महिला (5 किलोमीटर) ः निकीता राऊत (मथुरदास मोहता विज्ञान - 19 मि.11 सेकंद), शितल बारई (एस. बी. सिटी - 19 मि. 18 सेकंद), राजश्री पद्मगिरवार (एस. बी. सिटी - 20 मि.24 सेकंद), प्राजक्ता गोडबोले (एम. के. उमाठे), मीनल भेदे (श्रीनिकेतन कला व वाणिज्य), प्राची गोडबोले (एम. के. उमाठे).
सांघिक - एस. बी. सिटी - 24 गुण, नबीरा महाविद्यालय काटोल - 59 गुण, एनएमडी गोंदीया - 85 गुण.
वैशिष्ट्य
- 2010 पासून पाचव्यांदा नागपूर बाहेरच्या महाविद्यालयाचा पुरुष धावपटू विजयी
- 2010 पासून एनएमडी गोंदीयाला पुरुषांत व नबीरा काटोलला महिलांच्या सांघिक गटात प्रथम तीन क्रमांकात कायम स्थान
- सांघिक गटात पुरुष व महिलांत गतवर्षीच्याच निकालाचीच पुनरावृत्ती
""सुरुवातीपासून विज्ञान शाखेतच असल्याने तिच शाखा कायम ठेवली. अभ्यास आणि सराव यात समन्वय साधताना तारंबळ उडत असली तरी "मॅनेज' करून घेते. आव्हान राहाणार हे अपेक्षीत होते. मात्र, प्रथम क्रमांक मिळविणारच हा आत्मविश्वास होता''
निकीता राऊत
हिला गटातील विजेती
0 comments:
Post a Comment