11 Aug 2016

वर्दीतील "देवमाणूस'

सुनील बोंडे
मो. 9823706297
...........
गुन्हेगारी समूळ नष्ट करायची असेल, तर गुन्हेगारांवर प्रतिबंध घालण्यासह त्यांच्यातील नकारात्मकता नष्ट करावी लागेल. जोपर्यंत त्यांचे मनपरिवर्तन होणार नाही तोपर्यंत त्याच्यातील गुन्हेगार जिवंत राहील. आधुनिक युगातही "वाल्याचा वाल्मीकी' बनवता येतो. त्यासाठी मनात दृढ इच्छा पाहिजे. अशीच भूमिका असलेला खाकी वर्दीतील "देवमाणूस' म्हणजे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बोंडे. फळाची अपेक्षा न करता सदैव कर्म करीत असलेला खाकी वर्दीतील "वैराग्यमूर्ती' म्हणून बोंडे यांची पोलिस दलात ओळख आहे.
सुनील सुखदेवराव बोंडे मूळचे चांदूरबाजार तालुक्‍यातील रामासाऊर गावचे. वडील प्राथमिक शाळेत शिक्षक तर आई त्रिवेणीबाई शेतमजूर. अनिल आणि सुनील दोन मुले. घरात आईमुळे धार्मिक वातावरण तर शिक्षक वडील शिस्तप्रिय. मुलांनी शासकीय अधिकारी व्हावे, या आशेने वडिलांनी मुलांना अमरावतीला शिक्षणासाठी पाठवले. सुनील यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर धावण्याची प्रॅक्‍टिस सुरू केली. तीन वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील धावक म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच राष्ट्रीय स्तरावर आयोजित पूर्ण आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत सहभाग घेतला, तर नवी दिल्लीत आयोजित दिल्लीरथ मॅरेथॉन स्पर्धाही गाजवली. रनिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमविण्यासाठी धडपड करीत असताना इंग्रजी साहित्यात एम. ए. केले. दरम्यान, मोठे भाऊ अनिल बोंडे डॉक्‍टर (एमडी) झाले. 1988 मध्ये सुनील सायकलने एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी गेले. केंद्रावर "हायफाय' मुले बघून घरी परतत होते. दरम्यान, मित्र भेटला आणि बळजबरीने परीक्षेसाठी नेले. परीक्षेत यश मिळाले आणि पीएसआय म्हणून निवड झाली. यवतमाळला पहिली पोस्टिंग. काही वर्षांनंतर नक्षलग्रस्त गडचिरोलीत बदली. डुग्गीपार ठाण्यात असताना एकाच दिवशी 9 नक्षलवाद्यांना स्फोटके, बारूद, बंदुका, पिस्तूल आणि बुलेट अशा शस्त्रसाठ्यासह अटक केली. वायुसेनेची दोन कोटींची फसवणूक उघडकीस आणली, तर जिल्हा न्यायालयातील सहा लाखांच्या चोरीचा पर्दाफाश केला. बोंडे यांना अभिनयाचा आणि गायनाचा छंद. चिटणीस पार्कमध्ये आयोजित साईबाबांच्या जीवनावरील महानाट्य तसेच शेगावीचा गजानन या महानाट्यात "बंकटलाल'ची भूमिका साकारली. विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रसाद यांच्या मदतीने त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ऑडिओ-व्हिडिओ गीतांच्या कॅसेटची निर्मिती केली. या कॅसेटमध्ये बोंडे यांनी स्वतः गीते गायली आहेत. अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व असलेल्या बोंडे यांना पत्नी मीनल यांनी मोलाची साथ दिली. मीनल यांच्याच पाठबळामुळे मुलगी परी आयएलएस पुणे येथे पदवी घेत आहे. कुराण, बायबल, रामायण, महाभारत, गीता, बौद्ध साहित्यांचा त्यांचा अभ्यास आहे. सध्या ते कळमन्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी कार्यरत आहेत.
-अनिल कांबळे







Mr.Anil Kamble
Crime Reporter
SAKAL,
Nagpur.
8308695600

andykamble1@gmail.com

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates