दीपोत्सव अर्थात दिवाळी म्हटली की, आनंद, उत्साह, सेलिब्रेशन अन् खरेदी. नवीन कपडे, फटाके, दागदागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी, चारचाकींपासून अगदी घर, फ्लॅट आणि बंगल्यांपर्यंत घराघरांत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकच जण आपापल्या ऐपतीने दिवाळीच्या मुहूर्तावर कोणती ना कोणती नवीन वस्तू घरी आणतो. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात त्या अर्थाने पहिलीच दिवाळी असते. दिवाळीच्या पर्वावर पहिली वस्तू खरेदी करून आपलं स्वप्न पूर्ण करणाऱ्या नागपूरकरांनी हा आनंद खास "सकाळ'सोबत "शेअर' केलाय.
माझा पहिला सिनेमा
चित्रपटसृष्टीत नागपूरकर लेखिकांची संख्या तशी बोटावर मोजण्याएवढीदेखील नाही. यामध्ये अभिनेत्री श्वेता पेंडसे हिने पटकथा आणि संवादलेखक म्हणून टाकलेले पहिले पाऊल नवी आशा निर्माण करणारे आहे. सहा दिवस आधी श्वेताचा पटकथा आणि संवादलेखक म्हणून पहिला सिनेमा राज्यभर प्रदर्शित झाला, त्यामुळे यंदाची दिवाळी तिच्यासाठी खास आहे. बालनाट्यापासून सुरुवात करीत पंधरा वर्षे सलग नागपूरच्या रंगभूमीवर श्वेताने एकाहून एक अफलातून भूमिका साकारल्या. नववीत असताना स्व. प्रभाकर पणशीकर यांच्यासोबत "तो मी नव्हेच' या गाजलेल्या नाटकात काम करण्याची संधी तिला मिळाली होती, हे विशेष. राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे अभिनयाचे रौप्यपदक पटकावल्यानंतर मात्र तिने मुंबईची वाट धरली. सुरुवातीला "जयोस्तुते' आणि आता "अस्सं सासर सुरेख बाई' यांसारख्या मालिकांमधून ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. शुटिंगच्या धबडग्यातही कवी मनाच्या श्वेताने आपल्यातील लेखिका जिवंत ठेवली आणि "कौल मनाचा' या पहिल्या चित्रपटासह मोठ्या पडद्यावर आली. पटकथा आणि संवादलेखनासाठी मुळात मनाची शांती आवश्यक असते. श्वेताने अभिनय आणि लेखनाचे संतुलन उत्तम साधले आहे. पहिल्या सिनेमाची पहिली दिवाळी आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे श्वेता म्हणते.-श्वेता पेंडसे (अभिनेत्री)
सासरची दिवाळी "स्पेशल'च
आठ महिन्यांपूर्वी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर तेथील वातावरणात जुळेल काय? अशी धाकधुक मनात होती. मात्र, सासरची मंडळी अतिशय प्रेमळ असल्याने सासर केव्हा माहेर झालं कळलंही नाही. दिवाळीत सासरची मंडळी आणि पतीकडून भरपूर "गिफ्ट' मिळणार असल्यामुळे, ही दिवाळी माझ्यासाठी खास आणि "स्पेशल' ठरणार आहे. मीसुद्धा सुंदर अविस्मरणीय "गिफ्ट' पती आणि सासरच्या मंडळींना देणार आहे. "ते' गिफ्ट अर्थातच "स्पेशल' असल्यामुळे सासरची मंडळी नक्कीच खूष होतील. दिवाळी माझा आवडता सण आहे. लहानपणच्या अनेक आठवणी दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा ताज्या झाल्यात. वडिलांसोबत "शॉपिंग' करताना जितकी मज्जा यायची, अगदी तोच आनंद आता सासरच्या मंडळीसोबत "शॉपिंग' करताना येतो आहे. सध्या दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. यंदाची पहिली दिवाळी खऱ्या अर्थाने मला आणि सासरच्यांना आनंद आणि स्मरणात राहणार आहे.
-समीक्षा पलांदूरकर (लाखे)
-समीक्षा पलांदूरकर (लाखे)
पहिली अल्कपनीय विदेशवारी
एका सॉफ्टवेअर कंपनीत वर्षभरापूर्वीच मला "जॉब' लागला. त्यानंतर कंपनीने माझ्यासह निवडक सहकाऱ्यांना अमेरिकेच्या टूरची ऑफर दिली. कंपनी व्यवस्थापनाने तुम्हाला पुढच्या महिन्यात महिनाभराच्या अमेरिकेच्या टूरवर जायचे असल्याचे सांगितल्यावर सुरुवातीला तर मला विश्वासच बसला नाही. खरोखरच अमेरिकेला जायची संधी मिळाली आहे का, याबाबत सहकाऱ्यांकडून खात्री करून घेतली. त्यांनीही "कन्फर्म' केल्यावर माझा आनंद द्विगुणित झाला. पहिल्या विदेशी टूरला जाण्याची मनात प्रचंड उत्सुकता होती. महिनाभरापासूनच मी तयारीला लागलो. या काळात अमेरिकेतील कोणत्या स्थळांना भेटी द्यायच्या, तेथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे कोणती, कोणत्या मार्केटमध्ये जायचे, कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या, इत्यादी सर्व गोष्टींचं पद्धतशीर प्लॅनिंग केले. घरातील मंडळींनीच नव्हे, नातेवाइकांनीसुद्धा अमेरिकेतून काहीतरी आणण्याची फर्माईश केली. माझ्याकरिता हे सर्व अगदी स्वप्नासारखंच होतं. तब्बल महिनाभराचा अमेरिकेचा टूर आटोपून नुकताच घरी परतलो. महिना कसा निघून गेला, कळलंदेखील नाही. सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीवर असल्याने विदेशात जाण्याची संधी मिळेलच, याची खात्री होती. पण, एवढ्या लवकर हा "चान्स' मिळेल, असं कदापि वाटलं नव्हतं. कंपनीने दिलेली संधी ही माझ्यासाठी दिवाळीपूर्वीची अविस्मरणीय भेट होती.
- दत्तू हेडाऊ
- दत्तू हेडाऊ
पहिल्या दिवाळीचं वेगळेपण अनुभवणार
दिवाळी असंख्य दिव्यांनी सजलेला आनंदाचा सण होय. दिव्यांच्या या सणाविषयी मला विलक्षण आकर्षण आहे. हा सण मी कुटुंबासोबत घरीच "एन्जॉय' करायची. लग्नानंतर यंदा माझी पहिलीच दिवाळी राहणार आहे. त्यामुळे सासरी दिवाळी साजरा करण्याचा आनंद आणि माहेरी जाण्यासाठीची उत्सुकता असा दुहेरी आनंद यावेळी मी उपभोगणार आहे. मुलींसाठी लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचं वेगळं महत्त्व असते. यावर्षी हा वेगळेपणा मी अनुभवणार आहे. घरात लगबग व आंनदाचे वातावरण आहे. लहानमोठे सर्वच खूष आहेत. दिवाळीच्या एक आठवड्यापूर्वीच सगळ्यासांठी खरेदी नेली. घरच्यांसाठी छान-छान "गिफ्ट' आणलेत. मी माझ्यासाठी नवीन दागिने व कपड्यांची खरेदी केली. तब्बल चार-पाच महिन्यांनंतर मी माझ्या माहेरी जाणार असल्यामुळे खूप आनंद होतोय. माहेरी माझ्या पहिल्या दिवाळसणासाठी तयारी करून ठेवलीय. मी केव्हा आईकडे जाते, त्यांना कधी भेटते, याचीच आता ओढ लागली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच माझ्या आईचा वाढदिवस आल्यामुळे घरी जाण्याची उत्सुकता आणखीनच तीव्र झाली आहे.
- मनाली दाढी (शिंगोरे)
- मनाली दाढी (शिंगोरे)
अखेर पूर्ण झालं कारचं स्वप्न
सायकल असेल तर, दुचाकी आणि दुचाकी असेल चारचाकी हवी, असं प्रत्येकालाच वाटतं. डायमंडनगरात राहणारे व व्यवसायाने अकाउंटंट असलेले हेमंत जोशीही याला अपवाद ठरले नाहीत. त्यांनी लहानपणापासून आतापर्यंत सायकल, लुना, स्कूटी आणि बाइक चालविली. पण आता आपल्याही अंगणात कार उभी राहावी, अशी त्यांची दाट इच्छा होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हतं. शेवटी या दिवाळीत तो योग जुळून आला. नवीन कार आवाक्याबाहेर असल्यामुळे त्यांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून जुनी मारुती 800 कार खरेदी केली. नगदी आणि बाकी "इन्स्टॉलमेंट्स' अशी जुळवाजुळव केली. स्वत:ला कार चालविता यावी, यासाठी त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच "ड्रायव्हिंग'चा कोर्स केला. जुन्या कारवर हात साफ केल्यानंतर आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर भविष्यात नवीन कार घेऊ, असे त्यांनी बोलून दाखविले. वडिलांनी कार घेतल्यामुळे मुलगाही खूप खूश आहे. बाबांनी यंदाच्या दिवाळीची दिलेली ही अविस्मयणीय "गिफ्ट' असल्याचे अथर्वने सांगितले.
अथर्व/ हेमंत जोशी
अथर्व/ हेमंत जोशी
नवीन घरातील पहिली दिवाळी
स्वत:चे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. नीरज गुप्ता यांनीही ते स्वप्न पाहिले होते. आता प्रत्यक्षात ते साकारणार आहे. दिवाळीच्या एक महिन्याभरापूर्वीच त्यांनी भोलेनगर येथील सावली अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केला. त्यामुळे आतापर्यंत भाड्याच्या खोलीत दिवाळी साजरी करणारा गुप्ता परिवार आता पहिल्यांदाच स्वत:च्या घरात पहिली दिवाळी "सेलिब्रेट' करणार आहे. नीरजसोबत त्यांच्या पत्नी संगीता आणि मुलेही नवीन घराबद्दल उत्साहित आहेत. नीरज हे गेल्या पंधरा दिवसांपासून दिवाळीची तयारी करीत आहेत. पती-पत्नीने त्यांचे आवडते रंग निवडून फ्लॅट सजविला. स्वत:च्या घरातील ही पहिलीच दिवाळी, आमच्यासाठी अविस्मरणीय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-नीरज गुप्ता
-नीरज गुप्ता
स्वप्नपूर्तीचा आनंद
पोलिस दलात नोकरी करून देशसेवा करण्याचे मी लहानपणापासूनच स्वप्न पाहिले होते. त्या दिशेने मी तयारी व प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून पोलिस दलात स्थान मिळविले. मेहनतीचे चीज आणि स्वप्न साकारल्याचा खूप आनंद आहे. नागपूर लोहमार्ग ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून पहिलीच "पोस्टिंग' मिळाली. रुजू होण्यापूर्वी येथील वातावरणाबाबत मनात अनेक प्रश्न होते. पण, वरिष्ठांसह सर्वांचेच सहकार्य मिळाल्याने दडपण कमी झाले. मध्यवर्ती रेल्वेस्थानक असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात दररोज नवनवीन अनुभव मिळतात. गुन्हेगारांवर जरब निर्माण करण्याच्या दृष्टीने त्याचा मला स्वत:ला खूप फायदा होणार आहे. पोलिस दलात मोठे पद भूषविण्याचे ध्येय असल्याने काही दिवस स्थिरावल्यानंतर पुन्हा अभ्यासाला लागणार आहे. पोलिस दलातील नोकरीमुळे समाजातून खूप मानसन्मान मिळतो. त्यामुळे भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा मिळते.
-संदीप जाधव
-संदीप जाधव
0 comments:
Post a Comment