23 Jul 2016

तिला वाचविण्यासाठी तलावात घेतली उडी

संतोष मांटे
आत्महत्या करण्यासाठी अंबाझरी तलावात युवतीने उडी घेतली. हा प्रकार पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिस शिपायाच्या लक्षात आली. त्याने जिवाची पर्वा न करता थेट तलावात उडी मारली. गटांगळ्या खात असलेल्या युवतीला पाण्याबाहेर काढून तिचे प्राण वाचविले. त्या बहाद्दर पोलिस शिपायाचे नाव आहे संतोष सुभाष मांटे (ब. 5684).  संतोष मांटे मूळचे बुलडाण्याचे. 


2006 मध्ये ते पोलिस खात्यात भरती झाले. सध्या ते अंबाझरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. वडील पोलिस दलात असल्याने देशसेवेचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. वडिलांची समाजसेवा आणि संरक्षणाची जबाबदारी पाहता बालपणापासूनच त्यांना पोलिस विभागाविषयी आकर्षण वाटत होते. वडील शिस्तीचे पाईक असल्याने घरातसुद्धा नेहमी शिस्त असायची. त्यामुळे वेळेवर उठणे, झोपणे, जेवणे, खेळणे याबाबत कडक नियम असायचे. त्यांच्या याच नियमामुळे जीवनही शिस्तीत जगण्याची सवय पडली. खाकी वर्दीचे आकर्षण असल्याने शिक्षणासोबतच त्यांनी पोलिस भरतीची तयारी सुरू केली. पोलिस दलात रुजू झाल्यानंतर अनेक कामगिरींमध्ये त्यांनी सहभाग घेतला. 10 ऑक्‍टोबरला ते चार्ली म्हणून कर्तव्यावर होते. दुपारच्या सुमारास परिसरात दुचाकीने गस्त घालत असताना क्रेझी कॅसलसमोरून जात असताना अंबाझरी तलावाच्या रॅम्पवर त्यांना गर्दी दिसली. काहीतरी गडबड असल्याची शंका आल्याने त्यांनी दुचाकी खाली ठेवून धावतच रॅम्प गाठले. 19 वर्षीय युवतीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तलावात उडी घेतली होती. तेथे शंभरावर युवक उपस्थित होते. परंतु, आरडाओरड करण्याशिवाय कुणीही काहीच करीत नव्हते. तलावात उडी घेऊन तिला वाचविण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. युवती पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहताच संतोष यांनी तलावात उडी घेतली आणि तिचे प्राण वाचविले. आईशी वाद झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे तिने सांगितले. संतोष यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात फोनवरून माहिती दिली. तिच्या पालकांचा नंबर मिळवून पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करून युवतीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
पाण्यात उडी घेतल्याने त्यांचा मोबाईल, पॉकेट आणि खिशातील कागदपत्रे पाण्यात बुडाली. या कामगिरीमुळे त्यांना पोलिस उपायुक्‍त शैलेश बलकवडे यांनी सन्मानित केले. त्यांना दोन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. पोलिस आयुक्‍त शारदाप्रसाद यादव यांनी संतोष यांचे कौतुक केले. वर्दी अंगावर असल्यामुळे माझ्या प्राणापेक्षा मला त्या युवतीचा जीव वाचविणे जास्त महत्त्वाचे वाटले. तिला वाचविल्याचे समाधान बक्षिसापेक्षा अधिक असल्याचे संतोष मांटे म्हणाले. पोलिस वडिलांचा आदर्श आणि पत्नीने दिलेल्या पाठबळामुळेच कर्तव्यावर सदैव तत्पर असल्याचे ते आवर्जून सांगतात.
 
Blogger Templates