14 Jan 2015

समर्थ हायस्कूलच्या कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक


प्रात्यक्षिक परीक्षेत गुण वाढविण्यासाठी मागितली रक्कम

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 8 : प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्‍यक गुण देण्याकरिता रामटेक येथील समर्थ हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजच्या तांत्रिक निदेशक प्रशांत राम येळणे यास विद्यार्थ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले.

रामटेक येथील समर्थ हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या 2014-15 शैक्षणिक वर्षातील वार्षिक प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्‍यक गुण देण्याकरिता तांत्रिक निदेशक प्रशांत येळणे यांनी एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र, ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने या विद्यार्थ्याने नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी समर्थ हायस्कूलच्या परिसरात सापळा रचण्यात आला. सदर विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना अधिकाऱ्यांनी येळणे यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक वासुदेव डाबरे, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम बावनकर, विलास खनके, संतोश पुंडकर, अजय यादव, चंद्रशेखर ढोक यांनी केली.
---------------
ैमौद्यातील दोन तलाठ्यांना अटक
शेतमालकाकडून घेतली साडेबारा हजारांची लाच
-------------
नागपूर, ता. 8 : विनापरवानगीने माती खोदकाम केल्यामुळे कारवाईची धमकी देऊन शेतमालकाकडून साडेबारा हजारांची लाच घेणाऱ्या मौदा तहसील कार्यालयातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. अरुण महादेव सुटे (वय 47), सुधाकर डी. राठोड (वय 48) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मालकीच्या शेतीतून जे.सी.बी. नी माती खोदून टॅक्‍टरद्वारे घरकामाकरिता नेत असताना एका शेतकऱ्यास मौदा तहसील कार्यालयातील तलाठी अरुण सुटे, मंडळ अधिकारी सुधाकर राठोड यांनी अडविले. शेतातून माती खोदण्याची परवानगी घेतली नाही, त्यामुळे शेतातील टॅक्‍टर व जे.सी.बी. तहसील कार्यालयात जमा करून 48 हजारांचा दंड वसूल करण्याची धमकी दिली. त्यावर सदर शेतकऱ्याने ही कारवाई टाळण्याची विनंती केली. त्यावर दोन्ही कर्मचाऱ्यांनी 15 हजारांची मागणी केली. याविरुद्ध शेतकऱ्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तलाठी अरुण सुटे, मंडळ अधिकारी सुधाकर राठोड यांना तडजोडीनंतर 12 हजार 500 रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांविरुद्ध मौदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, पोलिस निरिक्षक जीवन भातकुले, हेमंतकुमार उपाध्याय, अषोक लुलेकर, सचिन हलमारे, गौतम राऊत, अश्‍विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, मनोज पंचबुद्धे, मनोज चव्हाण यांनी केली.
---------------
ैमौदा तहसील कार्यालयात खळबळ
शेताचे बेकायदेशीररीत्या अकृषक करून भूखंड विक्रीचा प्रकार मौदा तालुक्‍यात जोरात सुरू आहे. त्यात तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी गुंतलेले आहेत. रकमेच्या लालसेपोटी गैरव्यवहाराच्या माध्यमातून भूखंड घोटाळे करणाऱ्या कर्मचाऱ्यांत या कारवाईने खळबळ माजली आहे.
 
Blogger Templates