डझनाला 40 रुपये, विक्रमी उत्पादनाचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 30 ः तीन महिन्यांपूर्वी 150 रुपये डझनपर्यंत भाव खाणारे संत्री आता सरासरी 40 रुपये डझन इतके घसरली आहे. परिणामी, संत्रा उत्पादक देशोधडीला लागला आहे. यंदा विक्रमी उत्पादन झाल्याने आवक वाढल्याने संत्रानगरीतील नागरिक गोड संत्री खाण्याचा आनंद लुटत आहेत. हिवाळी अधिवेशनकाळात येणाऱ्या पाहुण्यांना स्वस्त संत्र्यांचा अस्वाद मोठ्या प्रमाणात घेता येणार आहे.
संत्रानगरी असली तरी पाऊस, किडीचा प्रकोप आदी कारणांमुळे संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे मागणी अधिक आणि आवक कमी असल्याने भाव आकाशाला भिडतात. सर्वसाधारण ग्राहक संत्री खाण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु, यंदा परिस्थितीत बदल झाला आहे. संत्र्याचे उत्पादन विक्रमी झाले आहे. किमतीही घसरल्याने संत्री गरिबापासून सर्वांच्याच आवाक्यात आली आहे. सध्या शहरातील अनेक परिसरात रस्त्याच्या शेजारी संत्र्यांचे ढीग लागलेले आहेत. आकारानुसार 20, 40 आणि 60 रुपये डझन संत्र्याचे भाव आहेत. 20 रुपये डझन मिळणारी संत्रीही 60 रुपये डझन असलेल्या संत्र्याप्रमाणे गोड आहे. याचमुळे यंदा विदर्भातील नागरिक संत्री खाण्याची मजा घेत आहेत. अंबिया बहराच्या या संत्र्यामध्ये गोडपणा आहे. विदर्भातील सर्वांत मोठ्या कळमना बाजारात दररोज 200 ते 250 लहानमोठ्या गाड्यांची आवक सुरू आहे. ठोक बाजारात 8,000 ते 15,000 रुपये टन दर आहेत.
अंबिया बहरामध्ये यंदा गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच विक्रमी उत्पादन झाले आहे. यामुळे आवक वाढली आणि किमतीतही घसरण झाली आहे. बाजारात सध्या काटोल, कळमेश्वर, मौदा, पांढुर्णा, अमरावती, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार आणि नरखेड येथून अधिक माल येत असल्याचे फळविक्रेते दिलीप हरीयाणी यांनी सांगितले.
अंबिया बहराचा संत्री जानेवारीपर्यंत येईल. 15 जानेवारीनंतर मृग बहराच्या संत्र्याची आवक सुरू होईल. त्या काळात उन्ह चांगले असल्याने मृगाचा संत्रा अधिक गोड असतो. संत्र्याला जेवढी जास्त उन्ह लागेल तेवढीच गोडी त्यात वाढत जाते. मृगाचे उत्पादनही चांगले आहे. यामुळे उन्हाळ्यातही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात संत्री खाण्याचा आस्वाद घेता येणार आहे. यंदाचे फळ मोठे असून, स्वादही गोड आहे. हिवाळ्यात संत्र्याला अधिक मागणी नसते. उन्हाळ्यात मात्र ज्यूससाठी चांगली मागणी राहते. त्यामुळे थोडे भाव वधारेल, अशी अपेक्षा संत्रा उत्पादक देवीदास चोपडे यांनी व्यक्त केली.
अधिवेशनासाठी मुंबईवरून येणाऱ्या सर्वच पाहुण्यांना यंदा भाव उतरलेले असल्याने संत्राच्या ज्यूससह फळांचा आस्वाद घेता येणार आहे.
0 comments:
Post a Comment